Saturday, 31 Oct, 10.36 am माझा पेपर

होम
उच्च न्यायालयाकडून मुंबई पोलीसांचे कौतुक; जगातील एक उत्तम पोलीस दल, त्यांना सहकार्य करा

मुंबई - मुंबई पोलीस दल गेल्या काही दिवसांत टीका-टिपण्णीद्वारे चर्चेत राहिले आहे. पण, कोणी काहीही म्हणो मुंबई पोलिसांची पाठ मुंबई उच्च न्यायालयाने थोपटली आहे. उच्च न्यायालयाने हे पोलीस दल जगातील एक उत्तम पोलीस दल असल्याचे मत नोंदवले आहे. तसेच मुंबई पोलीसांच्या कोरोनाच्या प्रचंड तणावाच्या काळातील चांगल्या कामगिरीचे कौतुकही केले आहे.

जगातील सर्वाधिक उत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांची गणना केली जाते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. न्या. शिंदे म्हणाले, आधीच मोठ्या तणावाखाली असताना देखील महामारीच्या काळातील कठीण समयी मुंबई पोलिसांचे काम हे खूपच अवघड बनले होते. पोलीस अधिकारी सातत्याने काम करीत होते. ते १२ तासांहून अधिक काळ काम करीत होते. त्यानंतर सुरु झालेले मोर्चे आणि सणवार यांच्यासाठी बंदोबस्तालाही ते तैनात होते.

खंडपीठाने मुंबई पोलिसांबाबत हे मत सुनैना होले यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान व्यक्त केले आहे. होले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजूकर सोशल मीडियातून पोस्ट केला होता. त्यांच्यावर यासाठी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरु असताना खंडपीठाने मुंबई पोलिसांबाबतचे आपले निरीक्षण नोंदवले.

न्यायालयात गुरुवारी ही प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर न्यायालयाला वकिलांनी सांगितले की, बीकेसी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवण्यासाठी होले या हजर राहिलेल्या नाहीत तसेच त्या पोलिसांनी सहकार्यही करीत नाहीत. न्या. शिंदे यावर टिपण्णी करताना म्हणाले, तुम्हाला हे कळायला हवे की शहर पोलीस हे जगातील उत्तम पोलिसांपैकी एका आहेत. मुंबई पोलिसांची तुलना थेट स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. त्यामुळे जनतेकडूनही त्यांना थोडसे सहकार्य होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर होले यांना २ नोव्हेंबरपूर्वी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे आदेश खंडपीठाने दिले. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी निश्चित केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top