Saturday, 25 Sep, 5.52 pm माझा पेपर

होम
यापुढे कधीही महापुराच्या पाण्यात जाणार नाही पुणे-बंगळुरू महामार्ग; नितीन गडकरींनी दिली ग्वाही

कोल्हापूर : यापुढे कधीही महापुराच्या पाण्यात पुणे-बंगळुरू महामार्ग जाणार नाही, अशी खात्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात दिली. तब्बल 40 हजार कोटी रुपये पुणे-बंगळुरू महामार्गासाठी खर्च करण्यात येणार आहे. यावेळी महापुराचा एक थेंब कोल्हापुरात महामार्गावर येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात झालेल्या गर्दीवरही भाष्य केले. एकाच मंडपात 100 लग्न व्हावी, अशी आज अवस्था झाली आहे. सगळेच आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कामाबाबत एकच कार्यक्रम होत असल्यामुळे गर्दी उसळल्याचे गडकरी म्हणाले.

40 हजार कोटी रुपये खर्च करून पुणे-बंगळुरु दरम्यान नवा महामार्ग विकसित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात केली होती. कोल्हापुरात याच पार्श्वभूमीवर बोलताना पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही याची खात्री देतो, असे आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे पुढच्या सहा महिन्यात भूमिपूजन करून काम सुरू करु, असे आश्वासनही गडकरींनी याच भाषणात दिले आहे.

पुणे-बंगळुरू महामार्ग गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाण्यात जात आहे. महामार्गावर जुलै महिन्यात पाणी आल्यामुळे चार दिवस संपूर्ण वाहतूक ठप्प होती. महामार्ग बंद झाल्यामुळे रस्त्यांवर शेकडो वाहने अडकली होती. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे महत्वाचे आहे. हा महामार्ग दोन राज्यांना जोडणारा असल्यामुळे महत्वाची वाहतूक या रस्त्यावरुन होत असते. त्याचमुळे आता नवीन पुणे-बंगळुरू महामार्ग बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

दिल्ली-मुंबई महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रातील काम अद्याप सुरू व्हायचे आहे. नरिमन पॉइंटजवळ हा महामार्ग संपेल. तेथून बारा तासांत दिल्लीला जाता येईल. माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या जवळचा वांद्रे-वरळी सागरी सेतू वसई-विरारपर्यंत वाढवता येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top