Wednesday, 27 Jan, 6.12 pm माझा पेपर

होम
'युएई'ने शाहिद आफ्रिदीला प्रवेश नाकारला

दुबई - आपल्या कोणत्या ना कोणत्या कारनाम्यामुळे पाकिस्तानचा तडाखेबाज माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी हा कायम चर्चेत असतो. त्याला अनेकदा भारताविरूद्धच्या त्याच्या वक्तव्यांमुळे टीकेचा सामना करावा लागतो. तरीदेखील क्रिकेटविश्वात अजूनही तो फलंदाजीला आला की गोलंदाजांना धडकी भरते. त्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही टी-२० किंवा टी-१० लीग स्पर्धांमध्ये सहभागी होतो. आता आफ्रिदी युएईमध्ये होणाऱ्या अबुधाबी टी१० लीग स्पर्धेतही सहभागी होणार आहे. पण युएईमध्ये दाखल होताच त्याच्यासोबत एक विचित्र प्रसंग घडला.

अबुधाबी टी१० लीग क्रिकेट स्पर्धेत कलंदर्स संघाकडून शाहिद आफ्रिदी खेळणार आहे. शाहिद आफ्रिदी त्यासाठी युएईमध्ये दाखल झाला. पण त्याला विमानतळावरच अडवण्यात आले आणि युएईमध्ये प्रवेश करण्यास नकार देण्यात आला. पाकिस्तानी प्रसारमाध्यम 'द न्यूज'च्या वृत्तानुसार, युएईमधील वास्तव्यासाठी लागणारा आफ्रिदीचा व्हिसा संपला होता. ही बाब आफ्रिदीच्या लक्षात आली नव्हती. पण तो जेव्हा युएईमध्ये दाखल झाला, तेव्हा ही बाब विमानतळावर अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्याला युएईत प्रवेशापासून रोखण्यात आले.

त्याला आता व्हिसा नुतनीकरणासाठी कराचीला माघारी जावे लागेल आणि तिथून परवानगी घेऊन झाल्यानंतर त्याला युएईत प्रवेश करता येईल, असे अधिकाऱ्यांनी आफ्रिदीला सांगितल्यामुळे आफ्रिदी पुन्हा कराचीला आला. आता व्हिसा नुतनीकरण झाल्यानंतर तो दोन दिवसांनी पुन्हा युएईत दाखल होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top