Dailyhunt
​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा 'अ‍ॅक्शन प्लॅन'

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा 'अ‍ॅक्शन प्लॅन'

टीममंगळवेढा टाईम्स।

गायरान वगळता इतर शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नावर मंगळवेढा तालुक्यात प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अतिक्रमण नियमितीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित अतिक्रमणधारकांना दिलासा मिळणार असून पात्र नागरिकांना कायदेशीर हक्क मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन व प्रांताधिकारी बी. आर. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मदन जाधव यांनी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या मोहिमेनुसार १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणेच नियमितीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.

५०० चौ. फुटांपर्यंतचे अतिक्रमण विनामूल्य नियमित करण्यात येणार आहे. १५०० चौ. फुटांपर्यतच्या अतिरिक्त क्षेत्रावर शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे.

पात्र लाभार्थ्यांना भोगवटादार वर्ग-२ दर्जा देण्यात येणार आहे, संबंधित जमिनीच्या विक्री अथवा हस्तांतरणावर पाच वर्षाची बंदी राहणार आहे.

गायरान जमीन, नदीपात्र, पररेषा, सीआरझेड तसेच सार्वजनिक उपयोगाच्या जागांवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी अपात्र ठरणार असून, अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असल्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times