Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हाण की बडीव! नवरदेवाच्या बुटांसाठी भर लग्नात राडा, आपापसात भिडले वधू आणि वरपक्ष; झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी

हाण की बडीव! नवरदेवाच्या बुटांसाठी भर लग्नात राडा, आपापसात भिडले वधू आणि वरपक्ष; झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी

मंगळवेढा टाईम्स न्युज वृत्तसेवा ।

लग्न म्हटलं की मजामस्ती, धम्माल, डान्स आणि विविध परंपरा या गोष्टी आल्याच. यातील सर्वाधिक चर्चेत असणारी परंपरा म्हणजे नवरदेवाचे बुट चोरणे. वधु पक्षातील लोक नवऱ्याचे बुट चोरतात.

अन् या बुटांच्या बदल्यात ते पैशांची किंवा भेट वस्तूंची मागणी करतात. खरं तर हा प्रकार केवळ गंमत म्हणून खेळला जातो. परंतु काही वेळेस या गंमतीचं भांडणात रुपांतर होतं.

असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडला. नवऱ्याच्या बुटांसाठी चक्क दोन्ही बाजूचे वऱ्हाडी मंडळी आपापसात भिडले. जालन्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील नांदी परिसरात हा विवाह सोहळा पार पडत होता. लग्नाचे विधी सुरू असताना नवरीकडील मुलींनी आणि नातेवाईकांनी लग्नातील परंपरेनुसार नवरदेवाचा बूट लपवला.

विधी संपल्यानंतर बूट परत करण्याच्या बदल्यात मानपानावरून आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. सुरुवातीला ही केवळ गंमत वाटत होती, मात्र थोड्याच वेळात या वादाचे रूपांतर मोठ्या वादात झाले.

वधू-वरांचे वऱ्हाडी एकमेकांना भिडले

दोन्ही बाजूंचे म्हणजे वधू- वरांचे वऱ्हाडी एकमेकांना भिडले. रागाच्या भरात मंडपात महिलांनी ऐकमेकांची केल धरून मारहाण केली.

इतकेच नाही तर दोन्ही गट एकमेकांना भिडले. मंगल कार्यालयात उपस्थित असलेल्या महिला आणि मुलांची या प्रकारामुळे मोठी धांदल उडाली.

हाणामारीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद

या हाणामारीचा व्हिडिओ उपस्थित असलेल्या काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वऱ्हाडी मंडळी एकमेकांवर तुफान प्रहार करताना दिसत असून, काही लोक वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही जण संतापून एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत.

पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव

या राड्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून, या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

अद्याप कुणालाही ताब्यात घेतलं नसल्याची माहिती अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांची माहिती दिली आहे.

परंपरेच्या नावाखाली झालेला हा वाद दुर्दैवी असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times