Dailyhunt
मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

टीम ​मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा ते मरवडे रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळ आज रविवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ६ चाकी टाटा कंटेनरने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नेमकीघटनाकाय?

​मिळालेल्या माहितीनुसार, आसबेवाडी (ता. मंगळवेढा) येथील उमेश गमन खटकाळे (वय ३८) आणि त्यांचा भाचा नारायण रतिलाल आसबे (वय ३५) हे दोघे आपल्या बजाज मोटारसायकलवरून (क्रमांक: MH-13-DG-0119) मंगळवेढ्याहून आपल्या गावाकडे परतत होते.

लक्ष्मी मंदिराजवळ पोहोचले असता, पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ६ चाकी कंटेनरने (क्रमांक: MH-04-JK-1401) त्यांना जोरदार धडक दिली.

जागीच मृत्यू आणि गंभीर दुखापत

​ही धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलच्या मागे बसलेले नारायण आसबे यांचा जागीच मृत्यू झाला. चालक उमेश खटकाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

चालकावर गुन्हा दाखल

​अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत नारायण यांचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी तानाजी विठ्ठल मोरे यांनी फिर्याद दिली असून, कंटेनर चालक मोहम्मद कमरुद्दीन मोहम्मद साब्बीरुद्दीन (रा. झारखंड) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

​या घटनेमुळे आसबेवाडी परिसरात शोककळा पसरली असून, वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times