Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

टीम ​मंगळवेढा टाईम्स । बोराळे (प्रतिनिधी)

श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोराळे नगरीत सध्या अवैध दारू धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून, अनेक निष्पाप युवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत.

या अवैध दारू विक्रीमुळे अनेक सुखी संसार उघड्यावर आले आहेत.

या पार्श्वभूमीवर, बोराळे गाव संपूर्णपणे दारूमुक्त करण्याचा एकमुखी निर्णय घेत पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री कवचाळे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून भव्य रॅली काढली आणि प्रशासनाला थेट इशारा दिला.

​वटपौर्णिमेच्या दिवशीच कोसळले दुःखाचे डोंगर!
​वटसावित्री पूर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून 'सात जन्मी हाच पती मिळो' अशी प्रार्थना सौभाग्यवती महिला करतात.

मात्र, दुर्दैवाने याच वटपौर्णिमेच्या दिवशी गावातील एका तरुण मुलीचा पती दारूच्या व्यसनापायी मयत झाल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेने संतप्त झालेल्या जयश्री कवचाळे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने गावातून दारू हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. त्याला गावातील संपूर्ण महिला भगिनींनी १०० टक्के प्रतिसाद देत रॅलीत सहभाग नोंदवला.

एकाच कुटुंबातील तीन महिला झाल्या विधवा

"आमच्या एकाच कुटुंबातील तीन तरुण मुले दारू पिऊ लागल्याने, दारूच्या व्यसनाने त्यांचे बळी घेतले. आज एकाच घरातील तीन महिला विधवा होऊन त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे," अशी अत्यंत हृदयद्रावक प्रतिक्रिया रॅलीत सहभागी झालेल्या एका पीडित महिलेने व्यक्त केली.

​…तर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची असेल

​या रॅली दरम्यान महिलांच्या हातामध्ये दारू बंदीचे फलक लक्ष वेधून घेत होते. यावेळी महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला:
​शाळेजवळच दारूची विक्री: शाळेच्या अगदी जवळच दारू विकली जात असल्याने लहान मुलांनी काय आदर्श घ्यावा? असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

हप्तेखोरीचा आरोप

पोलीस 'मंथली' (हप्ता) घेत असल्यामुळेच हे दारू धंदे फोफावले असून अनेकांचे संसार रस्त्यावर आल्याचा थेट आरोपही यावेळी करण्यात आला.

​८ दिवसांचा 'अल्टिमेटम'

​पीडित महिलांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बोराळे गावातून अवैध धंदे कायमचे हद्दपार करण्यासाठी गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

​येत्या आठ दिवसांत बोराळे गावातून अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद झाली पाहिजे. तसे न झाल्यास महिलांचा मोर्चा थेट दारू धंद्यांवर धडकेल आणि तिथेच बाटल्या फोडल्या जातील," असा खणखणीत इशारा जयश्री कवचाळे यांनी दिला आहे.

तसेच, पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई न केल्यास या मोर्चाचे पडसाद संपूर्ण मंगळवेढा तालुकाभर उमटतील आणि यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​याप्रसंगी बोलताना कवचाळे यांनी, "यापुढील काळात गावात कोणीही अवैध धंद्यांना थारा देऊ नका, युवकांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आपले कुटुंब सक्षम करण्यासाठी महिलांच्या या लढ्याला सर्वांनी साथ द्यावी," असे आवाहन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times