Friday, 08 Jan, 6.10 pm Marathi Tech

होम
व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल : सर्व डेटा फेसबुकसोबत शेयर होणार?

तुम्हाला गेल्या काही दिवसात व्हॉट्सॲपवर एक पॉप अप आलेला असेल ज्यावर व्हॉट्सॲप त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय बदल करणार आहे आणि त्याला तुमची संमती आहे का असं विचारण्यात आलं आहे. २०१४ या वर्षी फेसबुकने व्हॉट्सॲप खरेदी करून त्याची पूर्ण मालकी स्वतःकडे घेतली होती. आता ते फेसबुक व्हॉट्सॲपसोबत शक्य त्या मार्गे जोडून व्हॉट्सॲप यूजर्सचा डेटा मिळवणार आहेत असं दिसत आहे. प्रायव्हसी पॉलिसी म्हणजे गोपनीयता किंवा तुमचा खासगी डेटा पुढे कशा प्रकारे शेयर करण्यात येईल हे या नव्या पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं आहे. या नव्या बदलांमुळे जगभर नाराजी व्यक्त करण्यात येत असून अनेक यूजर्स सोशल मीडियावर याबद्दल व्यक्त होत आहेत.

फेसबुक कंपनीने व्हॉट्सॲप यूजर्सचा डेटा कसा वापरला जाईल, बिझनेसेस फेसबुकच्या सेवांचा वापर करुन चॅट्स कसे साठवू शकतील आणि इतर उत्पादनामध्ये वापरू शकतील, मेसेंजरमध्ये कशा प्रकारे शेयर केला जाईल ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला या बद्दल पॉप अप दिसला नसेल तर येत्या काही दिवसात तो दिसेल.

८ फेब्रुवारी २०२१ च्या आत तुम्हाला नवीन नियम Agree बटनवर क्लिक करून मान्य करावे लागतील
अन्यथा त्यापुढे तुम्हाला व्हॉट्सॲप वापरता येणार नाही!

पुन्हा एकदा व्हॉट्सॲपने ते यूजर्सची माहिती गोळा करत असल्याचं सांगितलं आहेच मात्र यावेळी ते नेमकी कोणती माहिती मिळवत आहेत हे जाहीररित्या सांगितलं आहे. फोन नंबर, लोकेशन, आयपी अॅड्रेस, फोन मॉडेल, ओएस, स्टेट्स, प्रोफाइल पिक्चर, ग्रुप्स या सर्व गोष्टींची माहिती साहजिकच त्यांच्या कडे जाणार आहे. यापुढे जर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरायचं असेल तर नवे नियम मान्य करूनच वापरता येईल अन्यथा व्हॉट्सॲप अकाऊंट बंद करून दुसऱ्या ॲपचा वापर सुरू करावा लागेल. थोडक्यात आम्ही डेटा तर घेणारच आहोत फक्त तुमची परवानगी मागतोय असं फेसबुकचं म्हणणं आहे.

यापुढे व्हॉट्सॲप तुम्ही कोणता मेसेज कोणाला फॉरवर्ड करत आहात याची माहिती ठेवणार आहे आणि या सोबतच एखादा मेसेज खूप वेळा फॉरवर्ड झाला असेल तर त्याबद्दल इंटरनेटवर सर्च करण्याचाही पर्याय देणार आहे.

ही माहिती पुढे थर्ड पार्टी व्यवसाय जे फेसबुकची सेवा वापरतात त्यांच्यासोबत शेयर करण्यात येणार आहे. शिवाय व्हॉट्सॲप आता मेसेंजर, इंस्टाग्राम, oculus अशा सेवांसोबत जोडलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

फेसबुक अलीकडे अनेक गोष्टींमुळे वादात सापडत असून प्रायव्हसी बाबत तर यांना सर्व प्रमुख कंपन्यामध्ये सर्वात वाईट म्हणता येईल. आता व्हॉट्सॲप सारख्या मेसेजिंग सेवेचाही व्यावसायिक गोष्टींसाठी वापर करून यूजर्सची खासगी माहिती शेयर करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. त्यांच्या एकूण यूजर्समधील किती जणांना याची जाणीव असेल आणि त्यावर किती जण येणाऱ्या काळात त्यांच्या सेवा वापरणं थांबवतील हे सांगणं अवघडच. फेसबुक आणि व्हॉट्सॲप दोन्ही प्लॅटफॉर्म भारतात बऱ्याच मोठ्या संख्येने वापरले जातात आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना नव्या बदलाद्वारे त्यांची कोणती माहिती कशा प्रकारे वापरली जाईल हे ठाऊक नसणार.

या नव्या बदलांवर अनेकांची नकारार्थी प्रतिक्रिया येत असून टेस्ला व स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी सिग्नल नावाच्या ॲपबद्दल Use Signal असं ट्विट करून अप्रत्यक्षपणे व्हॉट्सॲप वापरू नका असं सांगितलं आहे. त्यांनी यापूर्वीच फेसबुकच्या सेवांवरून त्यांच्या कंपन्याची पेजेस हटवली आहेत!

व्हॉट्सॲपच्या ऐवजी आपल्याला इतर अनेक पर्याय उपलब्ध असून अनेकांना केवळ त्यांच्या संपर्कातील लोक व्हॉट्सॲपशिवाय इतर अॅप्स वापरत नसल्यामुळे नाईलाजाने का होईना व्हॉट्सॲपच वापरावं लागतं. व्हॉट्सॲपला सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे Telegram. टेलिग्राम हा पर्याय सुद्धा अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरला जात असून हे अॅप २०१३ मध्ये Nikolai आणि Pavel Durov या रशियन भावांनी आणलं आहे. या दोघांनीच प्रसिद्ध रशियन वेबसाइट VK सुद्धा तयार केली होती. बऱ्याच बाबतीत व्हॉट्सॲपपेक्षा चांगल्या सुविधा यामध्ये देण्यात आल्या असून चॅनल्स वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे!

व्हॉट्सॲपला काही लोकप्रिय पर्याय

  • Telegram : खऱ्या अर्थाने हा सर्वोत्तम पर्याय म्हणता येईल. बऱ्याच बाबतीत व्हॉट्सॲपपेक्षा चांगल्या सुविधा!
  • Signal : ओपन सोर्स आणि सर्वात सुरक्षित मेसेजिंग ॲप. प्रायव्हसीसाठी सर्वोत्तम.
  • Discord : प्रामुख्याने गेमिंगसंबंधित वापर पण अलीकडे नव्या सोयीमुळे सर्वांना वापरण्यासाठी चांगला पर्याय.
  • Snapchat : आधीपासून लोकप्रिय पण भारतात तुलनेने कमी वापर
  • Skype : ही मायक्रोसॉफ्ट सेवा व्हीडिओ कॉलिंग सारख्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पुरवते
  • Hike : चांगला भारतीय पर्याय जो अलीकडे काही मागे पडला आहे मात्र पुन्हा लोकप्रिय होऊ शकतो. हे ॲप एयरटेलच्या संबंधित मित्तल यांची कंपनीतर्फे बनवण्यात आलं आहे.
  • यासोबत इतरही अनेक पर्याय आहेत. सर्वांचा उल्लेख अशक्य आहे.

Search Terms : WhatsApp updating privacy policy, what is whatsapp privacy policy whatsapp alternatives

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Marathi Tech
Top