Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ahilyanagar : माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश,  पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील?

Ahilyanagar : माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश, पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील?

विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते, माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथील पक्षकार्यालयात पार पडला.

भाजपमध्ये प्रवेशासोबतच प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषद उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात राज्यमंत्री म्हणून काम केलेले तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्यापर्यंतच्या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

पक्षांतर्गत समन्वय साधत त्यांनी भाजप नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला आणि उमेदवारी निश्चित झाल्यानंतर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची प्रभावी धुरा सांभाळली. तब्बल ११ पेक्षा जास्त सभा घेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधत अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. त्यामुळे कर्डीले यांच्या विजयामागील प्रमुख रणनीतिकार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाहिले गेले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला असून यामागे डॉ. सुजय विखे पाटील हेच खरे सूत्रधार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MarathiPrint