Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kolhapur : प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच मिळणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Kolhapur : प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच मिळणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

ब्युरो टीम : सीपीआरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे सर्व आवश्यक आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

त्यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे सुमारे २५० कोटी रुपयांच्या विविध अत्याधुनिक सेवा-सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधांमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना दर्जेदार आणि आधुनिक उपचार सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपाराणी निकम उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. अजित लोकरे, स्थानिक नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, १९८५ साली उभारलेल्या इमारतीचा कायापालट करण्याचे भाग्य मला लाभले. सीपीआर रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे आधारवड आहे. येथील सेवा-सुविधांचे आधुनिकीकरण करून रुग्णांना महानगरांप्रमाणे उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नव्याने सुरू झालेल्या सुविधा रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच सामान्य रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच मिळतील. एकही रुग्ण बाहेर जाणार नाही, अशा सुविधा शहरात पूर्णत्वास येतील. सीपीआर येथील पुढील कामांचे भव्य उद्घाटन पुढील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, समाजसेवेची जाण असणारा आरोग्यदूत म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणून आरोग्य सेवेचे वैभव त्यांनी उभे केले आहे. महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्येक रुग्णाला कुटुंबातील सदस्य समजून आरोग्य सेवा देण्याचे आवाहन उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या आरोग्य सेवा ही आनंदाची आणि स्वाभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी पुढील काळात स्वप्नवत उभारलेली ही शासकीय वास्तू जपून निरंतर आरोग्य सेवा देण्याचे आवाहन केले.

लोकार्पण करण्यात आलेल्या सुविधांमध्ये श्वसनविकारांच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी आणि फुफ्फुसासंबंधी आजारांच्या निदान व उपचारांसाठी इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट अंतर्गत आरआयसीयू संलग्न पल्मनरी लॅबोरेटरीचा समावेश आहे. येथे १० बेड, व्हेंटिलेटर सुविधा आणि मल्टीपॅरा मॉनिटर उपलब्ध करण्यात आले आहेत. मेडिकल आयसीयू युनिटमध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठी ४० बेड, व्हेंटिलेटर सुविधा आणि मल्टीपॅरा मॉनिटरची सुविधा करण्यात आली आहे. सर्जिकल आयसीयू युनिटमध्ये अपघातग्रस्त अत्यवस्थ रुग्णांसाठी १६ बेड, व्हेंटिलेटर सुविधा आणि सर्जिकल मल्टीपॅरा मॉनिटर उभारण्यात आले आहेत.

रोबोटिक आर्मयुक्त फिजिओथेरपी लॅबमध्ये पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच शासकीय रुग्णालयात रोबोटिक आर्मद्वारे फिजिओथेरपी सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रोबोटिक गेट ट्रेनिंग सिस्टम तसेच फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारण्यात आली आहे. यासह फार्माकोजेनोमिक लॅब तसेच अत्याधुनिक कान, नाक व घसा विभागाचाही समावेश आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्यानंतर सर्व सुविधांची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. सदानंद भिसे यांनी प्रास्ताविक करून रुग्णालयातील नव्या सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. भूषण मिरजे यांनी केले. त्यानंतर विभागात भरती झालेल्या गट चार मधील कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MarathiPrint