कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण खूप महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते.
कॅपॅसिटर बसविल्यानंतर अंदाजे कमी होणाऱ्या भाराचा तपशील
उपरोक्त तकत्यानुसार कॅपॅसीटर वापरल्यास मोठ्या प्रमाणावर वीज भार कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर पंप जळण्याचे प्रमाण कमी होते, पंपाला लागणारी वीज (करंट) कमी लागते व पुरेसे व्होल्टेज मिळते. रोहित्रावरील 30 टक्के भार कमी झाल्यामुळे त्यावर अधिक भार देता येऊ शकतो व त्यामुळे जास्त कृषिपंप चालवणे सहज शक्य होते. तसेच वितरण हानी कमी होऊन वीजबिल कमी येण्यास मदत मिळते.
ऑटोस्विचचा वापर टाळा
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. राज्यात सुमारे 42 लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच' लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच' लावू नये.
कृषिपंपासाठी कॅपॅसिटर हा एखाद्या देवदुतासारखे काम करतो तर ऑटोस्विच हे मारक ठरू शकते. त्यामुळे कृषिपंपधारकांनी त्यांच्या पंपावर असलेले ऑटोस्विच तात्काळ काढून टाकावे. गरजेप्रमाणे कृषिपंप स्वत: चालू व बंद करावा. यामुळे रोहित्र अतिभार येण्याचे प्रमाण कमी होते. रोहित्र जळून अथवा नादुरुस्त होऊन महावितरणचे पर्यायाने स्वत:चे रोहित्र नादुरुस्तीपोटी होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल. ऑटोस्विच काढणे काही कारणास्तव शक्य नसल्यास अतिभारित रोहित्रावरील कृषिपंपधारकांनी एकाच वेळी वीजपुरवठा सुरू करू नये. आपापसात ठरवून टप्प्याटप्प्याने कृषिपंप सुरू करावे. त्याचबरोबर मंजूर असलेल्या भार क्षमतेपेक्षा जर संलग्न वीज भार जास्त असेल तर अधिकृतरित्या वीज भार मंजूर करून घ्यावा, जेणेकरून कृषिपंपधारक वापरत असलेल्या क्षमतेच्या एच.पी.च्या अनुषंगाने महावितरणला रोहित्राची क्षमता वाढवण्यास किंवा नवीन रोहित्र मंजूर करण्यास व बसविण्यास मदत होईल.
- ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, औरंगाबाद परिमंडल
vdnyan@gmail.com

