Saturday, 23 Nov, 10.00 am मराठीसृष्टी

विशेष लेख
वेक अप कॉल

रात्री उशिरा केबिनच्या पोर्ट होल वर टक टक टक आवाज करत आहे असे वाटत होते . जहाज इस्तंबूल सोडून काळया समुद्रातून रशियाच्या दिशेने निघाले होते. रात्री आठ ते बाराचा वॉच संपवून केबिन मध्ये आल्या आल्या झोप लागली होती. पण पोर्ट होल वरच्या टक टक ने जाग आली. बाहेर बघितले तर काही दिसत नव्हते, समुद्रात जहाज जात असताना नेवीगेशन लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद असतात. चंद्राच्या अंधुक प्रकाशामुळे समुद्राच्या लाटा आणि त्यावर तरंगणारे जहाज एवढंच दिसत होते. टक टक आवाज अजूनही येतच होता. आवाज माझ्या केबिनच्या पोर्ट होल बाहेरून येतोय असाच भास होत होता. केबिनच्या वर नेवीगेशन ब्रीज आणि खाली आणखी चार मजले होते. झोपमोड तर झालीच होती आणि आवाज पण बंद होत नव्हता. नेवीगेशन ब्रिजवर ड्युटी ऑफिसरला फोन करून विचारावेसे वाटले म्हणून ब्रिजवर कॉल केला तर कोणी फोनच उचलला नाही. म्हणून खाली इंजिन रूम मध्ये फोन केला तर खाली सुध्दा कोणी फोन उचलत नव्हते. सेकंड ऑफिसर सोबत एक ए बी रात्री बारा ते चार वॉच मध्ये नेवीगेशन ब्रिजवर असतो आणि त्याचवेळी खाली इंजिन रूम मध्ये थर्ड इंजिनियर सोबत एक मोटर मन वॉच मध्ये असतो . दोन्ही ठिकाणी फोन केले तर चौघांपैकी कोणीच कसा फोन उचलला नाही म्हणून नवल वाटले. केबिन बाहेर पडून वर नेवीगेशन ब्रिजवर गेलो, नेहमीप्रमाणे ब्रिजवर अंधारच होता. ब्रिजच्या काचेवर लाईटचा प्रकाश पडल्याने रात्री काचेपलीकडे दृष्टी जात नाही त्यामुळे नेवीगेशन ब्रीज वर उपकरणांच्या इंडीकेशन लाईट ज्या डिम केलेल्या असतात त्यांचे ठिपके तेवढे दिसत असतात. सेकंड ऑफिसर ला हाक मारली पण सेकंड ऑफिसर किंवा ए बी कोणाकडूनही काहीच प्रतिउत्तर आले नाही. ब्रिजचा दरवाजा उघडून बाहेर गेलो तर अंधारात समुद्राच्या लाटांना कापत जहाज वेगाने जात असताना उडणारे फेसाळ पाणी दिसत होते, जहाज आणि पाण्याच्या घर्षणाने निघणाऱ्या आवाजापेक्षा टक टक हाच आवाज जास्त वाटायला लागला. ब्रीजवरून पुन्हा एकदा खाली इंजिन रूम मध्ये फोन केला पण पुन्हा तोच प्रत्यय, फोन उचलला नाही. ड्युटी एबी आणि सेकंड ऑफिसर कदाचित काही खायला मेस रूम मध्ये गेले असावे म्हणून जास्त विचार न करता खाली इंजिन रूम मध्ये कोणी फोन का उचलत नाही याचा विचार करत करत इंजिन रुमच्या दिशेने पावले वळवली. खाली जाईपर्यंत टक टक आवाज काही कमी होत नव्हता. मेस रूम मध्ये गाण्यांचा आवाज येत होता, मनात आले ब्रिजवर रात्री कोणीच नव्हत आणि ड्युटी एबी आणि ऑफिसर दोघेही ब्रीज सोडून खाली खायला आलेत हे कॅप्टन ला समजले तर त्यांचे काही खरे नाही. इंजिन रूम मध्ये गेलो तरी टक टक आवाज येतच होता. इंजिन कंट्रोल रूम मध्ये गेलो तर तिथेही कोणी दिसेना थर्ड इंजिनिअर नव्हता की मोटरमन नव्हता. दोघेही काही काम करायला गेले असतील म्हणून पाच मिनिटे वाट पाहिली मग कंट्रोल रूम च्या बाहेर येवून खालपर्यंत नजर फिरवली तरी दोघांपैकी कोणाचाच पत्ता नाही. हे दोघे पण काहीतरी खायला गेले असावेत म्हणून मेस रूम कडे त्यांना शोधत निघालो. वर जात असताना पुन्हा टकटक आवाजाने लक्ष वेधून घेतले, कुठून येतोय आवाज? आणि बाकी कोणाला कसा अजून ऐकू येत नाही? मीच कसा काय जागा झालोय या आवाजाने ? आता या आवाजाचा खरोखर त्रास व्हायला लागला होता, त्यात चौघे जण जागेवर सापडले नाही म्हणून अजून वैताग आला होता. मेस रूम मधून अजूनही गाण्यांचा आवाज येत होता. दरवाजा उघडला तर आतले दृश्य बघून आश्चर्याचा धक्का बसला, सगळे खलाशी आणि अधिकारी मेस रूम च्या चारही पोर्ट होल मधून एकमेकांच्या खांद्यावर वाकून वाकून बाहेरचे दृश्य बघत होते. पाठीमागे म्युझिक सिस्टीम वर गाणी सुरूच होती. सगळ्यात मागे थर्ड इंजिनिअर होता त्याला हाक मारली पण त्याने मागे वळून सुध्दा नाही पाहिले. बाहेरून टक टक आवाज येतच होता. सगळे जण हा आवाज ऐकुन आपल्या पहिलेच इथे जमा झालेत आणि आपण सगळ्यात शेवटी आलो असा विचार आला. आता हे सगळे किती वेळापूर्वी आलेत? सगळे असे गप्प का आहेत?? जेव्हा मी पोर्ट होल बाहेर पाहिले तेव्हा काहीच कसे नाही दिसले??? ब्रिजवर गेलो तेव्हा पण फक्त आवाज येत होता ते कसे काय?? आणि आता हे सगळे बघतात तरी काय??? शेवटी न राहवून बाहेर काय दिसतंय का ते बघण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या अंधुक चंद्रप्रकाशात एक पाठमोरी मानवी आकृती जहाजाच्या डेकवर एका हातोड्याने टक टक आवाज करत होती. त्या आकृती मागे वळून पाहिले तर चेहरा पटकन ओळखू सुध्दा येईल असे वाटत असतानाच ती आकृती हळू हळू आम्ही जिथून बघत होतो त्या दिशेला चेहरा वळवायला लागली होती. आता काही क्षणात चेहरा दिसणार तोच केबिनच्या फोनची रिंग वाजली चार ते आठ वॉच मधल्या मोटर मन ने गुड मॉर्निंग बोलून फोन ठेवून दिला आणि स्वप्न तुटले . सकाळचे सात वाजले होते लख्ख सूर्यप्रकाश पडला होता बाहेर पहिले तर सूर्याची सोनेरी किरणे पाण्यावर तरंगत होती. वेक अप कॉल मुळे टक टक आवाजाची कट कट एकदाची संपली होती.

जहाजावर मनाचे, भावनांचे, ईच्छा आकांक्षा आणि कल्पनांचे गुंते सोडवता सोडवता स्वप्नांच्या गुंत्यात गुंतायला कोणालाच वेळ नसतो. वेक अप कॉल आला की निमूटपणे उठायचे आणि आला दिवस घालवायचा. सकाळी अलार्म वाजो न वाजो वेक अप कॉलची रिंग वाजतेच.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर
B. E. (mech), DIM.
कोन , भिवंडी, ठाणे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Marathisrushti
Top