Tuesday, 19 Jan, 6.25 pm मराठवाडा साथी

होम
आदर्श मुख्याध्यापिका जगदेवी स्वामी यांचे दुःखद निधन

बीड
माजी आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती जगदेवी विवेक स्वामी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 69 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांनी आपल्या राहत्या घरी दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी येळंबघाट येथे आज दुपारी 1 वाजता शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एक मनमिळावू आणि आदर्श, कर्तव्यनिष्ठ शिक्षिका म्हणून त्या सुपरिचित होत्या. त्या शिवाजी विद्यालयातील शिक्षक विकास स्वामी आणि पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या आई होत्या.
मूळ लातूर येथील रहिवासी असलेल्या जगदेवी विवेक स्वामी या विवाह नंतर बीड तालुक्यातील येळंबघाट येथील रहिवासी झाल्या. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने लग्नानंतर सुद्धा त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1970 साली दहावी आणि पुढे 1975 मध्ये डीएड शिक्षण नेकनूर येथे पूर्ण केले. येळंबघाट येथील त्या पहिल्या महिला शिक्षीका ठरल्या.त्यानंतर मागे वळून न पाहता त्यांनी शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून दिले. संस्कार विद्यालय बीड येथे त्या पहिल्यांदा शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर बीड जिल्हा परिषद अंतर्गत 30 डिसेंबर 1976 रोजी त्यांनी जिल्हा परिषद गर्ल्स केंद्रीय प्राथमिक शाळा तलवाडा, तालुका गेवराई येथे पहिल्यांदा जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून शासन सेवेत रुजू झाल्या.सासरची ओढ असल्याने त्यांनी स्वतःच्या सासरी म्हणजे येळंबघाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 22 मे 1977 साली रुजू झाल्या.

1979 पर्यंत त्या येळंबघाट येथे होत्या. पुढे बीड येथील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल कन्या शाळा येथे 1980 साली रुजू झाल्या. तब्बल 13 वर्ष 1993 पर्यंत त्यांनी जिल्हा परिषद गर्ल्स कन्या हायस्कुल बीड येथे अनेक विद्यार्थिनींना घडवले. त्यानंतर 1993 साली त्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळनेर येथे रुजू झाल्या.

पाच वर्ष त्या पिंपळनेर येथे होत्या. याठिकाणी सेवेत असताना 1996 सली जिल्हा परिषदेने त्यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सर्वप्रथम गौरव केला.यानंतर महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा विशेष सन्मान केला. पिंपळनेर येथून पुढे बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोक नगर येथे 1998 ते 1999 पर्यंत त्या गांधीनगर शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा मुख्याध्यापिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर पुढे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मांजरसुंबा येथे 1999 ते 2003 पर्यंत त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून उत्कृष्ट कार्य केले. त्यानंतर 2003 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा अजीसपुरा केंद्र अंतर्गत शिवाजीनगर प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या. तब्बल सात वर्ष या शाळेत आदर्श मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी आपली सेवा केली.दिनांक 21 जून 2010 रोजी वयोमर्यादा नुसार त्या शिवाजी नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. सेवा निवृत्ती नंतर शांत न राहता वाचनाची आवड असल्याने त्यांनी सुखी जीवनाची शिदोरी हे पुस्तक लिहिले.हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस पडल्याने त्याच्या तीन आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या.

दरवर्षी स्वतःचा वाढदिवस हा गाजतवाजत साजरा न करता त्यादिवशी 25 जून रोजी इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेसह जगदविवेक प्रतिष्ठान'च्या माध्यमातून सन्मानपत्र,पेन, वही भेट देऊन गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्याची परंपरा मागील दहा वर्षापासून अखंडपणे सुरू केली. कोरोना कार्यकाळात सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांना घरी बोलावून कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये रोख रकमेसह सन्मानपत्र देऊन गौरव करण्याची परंपरा कायम जपली. दरवर्षी एका गरजवंत पीडिताला शस्त्रक्रियेसाठी पती विवेक स्वामी आदर्श मुख्याध्यापक यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ मागील सहा वर्षापासून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख रकमेची मदत देऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याची परंपरा सुरू केली. सातत्याने वृक्षारोपण, पुस्तक वाटप, रक्तदान अशा परंपरेला प्रोत्साहन देत सामाजिक दायित्व पार पाडण्याची परंपरा अखंडपणे जोपासली.

कायम मितभाषी, सदैव हसतमुख, स्वतःचे दुःख इतरांना कधीही न सांगता केवळ सुख वाटणारी वृत्ती आणि स्वभाव यामुळे त्या ज्यांच्या ही संपर्कात आल्या त्यांच्या कायम आपल्याच झाल्या. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पती आदर्श मुख्याध्यापक विवेक स्वामी असताना त्यांनी शिक्षक संघाच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांवर, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी वेळोवेळी पतीसोबत रस्त्यावर उतरून न्याय हक्कासाठी आंदोलन करत एक कणखर शिक्षिका म्हणून संघटनेत देखील आपली वेगळी आदर्श ओळख निर्माण केली. शिक्षक संघटनेच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी मान मिळवला. शेवटच्या क्षणापर्यंत कायम प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला नावाने हाक मारून गोड स्मित हास्य करत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील दोन महिन्यापूर्वी घरामध्ये पडण्याचे निमित्त झाले आणि अंथरुणाला धरले.

डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली असतानासुद्धा घराच्या घरात कायम फिरत स्वतःची कामे स्वतः शेवटपर्यंत शिस्तीने केली. जेवढे स्वतःला करता येईल तेवढे करायचे आपला इतरांना कोणालाही त्रास होऊ नये हे कायम जपले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन आणि बीड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षिका म्हणून गौरवले होते त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात भाऊ गौरीशंकर गणाचार्य लातूर, बहिण श्रीदेवी, मोठा मुलगा शिवाजी विद्यालयातील माध्यमिक शिक्षक विकास स्वामी आणि दैनिक समर्थ राजयोग चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी तसेच मुलगी आदर्श शिक्षिका वैशाली अशोक पडोळे, धर्माबाद जिल्हा नांदेड, आदर्श शिक्षिका रूपाली श्रीकांत स्वामी लातूर, जावई, नातू नातवंडे, दीर, नणंद, भावजया असा मोठा परिवार आहे. स्वामी परिवारावर कोसळलेल्या दुःखात दैनिक मराठवाडा साथी, सा. लोकप्रणेता परिवार सहभागी आहे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Marathwada Sathi
Top