आज 1 ऑगस्टपासून तुमच्या खिशावर, प्रवासावर, बँकिंगवर आणि अगदी आयकर भरण्यापर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत. पण नेमके कोणते नियम बदलले आहेत? LPG सिलिंडरपासून रेल्वे, ITR, बँकिंग आणि पोस्ट ऑफिसपर्यंत कोणते मोठे बदल आजपासून लागू झाले आहेत?
आणि त्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार?
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय नियम बदलत असतात. त्याचप्रमाणे १ ऑगस्ट २०२६ आजपासूनही अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिक, नोकरदार, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांवर होणार आहे.
सर्वात आधी बोलायचं झालं तर LPG सिलिंडरच्या दरांबद्दल. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या नवीन दर जाहीर करतात. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम दिसून आला असून, दिल्लीमध्ये १९ किलोचा व्यावसायिक LPG सिलिंडर तब्बल १९२ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दुसरा महत्त्वाचा बदल आहे रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये. आता आरक्षण केंद्रावर जाणाऱ्या प्रवाशांना सर्वप्रथम टोकन दिलं जाईल. त्यानंतर त्या टोकन क्रमांकानुसार तिकीट बुकिंगची प्रक्रिया होईल. यामुळे गर्दी, गोंधळ आणि रांगेतील वाद कमी होण्याची अपेक्षा आहे.
जर तुम्ही अजूनही आयकर रिटर्न म्हणजेच ITR भरला नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पगारदार आणि नॉन-ऑडिट करदात्यांसाठी ITR-1 आणि ITR-2 भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती. आता त्यानंतर रिटर्न भरल्यास विलंब शुल्क भरावा लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये हा दंड ५ हजार रुपयांपर्यंत असू शकतो.
याशिवाय आजपासून बँका, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये CKYC 2.0 प्रणाली लागू होणार आहे. यामुळे ग्राहकांची KYC माहिती डिजिटल पद्धतीने मिळवता येईल. वारंवार कागदपत्रे जमा करण्याची गरज कमी होणार असून प्रक्रिया अधिक वेगवान होईल.
पोस्ट ऑफिसच्या स्पीड पोस्ट सेवेतही बदल करण्यात आले आहेत. आता आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची कागदपत्रं आणि सरकारी ओळखपत्रं 'डॉक्युमेंट्स' या श्रेणीतसमाविष्ट केली जातील. तर इतर वस्तू पार्सल श्रेणीत पाठवाव्या लागतील.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात बँकांना एकूण १४ दिवस सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार तसेच विविध राज्यांतील सणांचा समावेश आहे. मात्र, या सुट्ट्या प्रत्येक राज्यात सारख्या नसतील. त्यामुळं आरबीआयच्या सुट्टीच्या यादीची माहिती घेणे आवश्यक आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठीही मोठा बदल लागू झाला आहे. SEBI ने कंपन्यांसाठी नवीन बायबॅक नियम लागू केले असून, यामुळं शेअर्स परत खरेदी करण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. तसंच, काही बँका क्रेडिट कार्डचे शुल्क, रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर नियमांमध्ये बदल करू शकतात. यासोबतच FD च्या व्याजदरांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एकंदरीत पाहिलं तर, हे सर्व बदल सामान्य नागरिक, गुंतवणूकदार आणि व्यवसाय क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या नियमांची माहिती घेणे फायदेशीर ठरणार आहे.
Updated : 1 Aug 2026 4:20 PM IST
Follow
Next Story
आज 1 ऑगस्टपासून तुमच्या खिशावर, प्रवासावर, बँकिंगवर आणि अगदी आयकर भरण्यापर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत. पण नेमके कोणते नियम बदलले आहेत? LPG सिलिंडरपासून रेल्वे, ITR, बँकिंग आणि पोस्ट ऑफिसपर्यंत कोणते मोठे बदल आजपासून लागू झाले आहेत? आणि त्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार?

