Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मातंग समाजाला एक आवाहन

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मातंग समाजाला एक आवाहन

Max Maharashtra 3 weeks ago

मी एका बौद्ध मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो. माझे वडील लहान वयातच उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. सुरुवातीला ते शिव (sion) कोळीवाडा परिसरात राहिले. त्यानंतर तेथील संपूर्ण वस्तीचे स्थलांतर करून मुंबई उपनगरातील घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे पुनर्वसन करण्यात आले.

माझे वडील प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठवाडा नामांतर आंदोलनातील जनआंदोलनाचे एक कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या आजूबाजूला आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते पाहत मी मोठा झालो.

माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये मातंग, महार (नवबौद्ध) आणि चर्मकार समाजाची मोठी लोकसंख्या आहे. लहानपणापासून मी या समाजातील अनेक लोकांना आंबेडकरी विचारांच्या आंदोलनांमध्ये, मोर्चांमध्ये आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना पाहिले आहे. मात्र मातंग समाजाकडे पाहताना एक गोष्ट नेहमीच मला खटकते. आजही मातंग समाजातील उच्च शिक्षणाचे प्रमाण इतर काही अनुसूचित जातींच्या तुलनेत कमी असल्याचे माझ्या अनुभवातून जाणवते. शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने आपण अजून मोठा पल्ला गाठणे आवश्यक आहे.

मातंग समाजामध्ये काळूबाई देवीची पूजा, खंडोबाच्या यात्रा, गणपती उत्सव, गोपाळ अष्टमी (दहीहंडी), नवरात्र आणि इतर धार्मिक उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतो. श्रद्धा हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय आहे; मात्र जेव्हा धार्मिक आणि उत्सवी उपक्रम आपल्या शिक्षणाच्या, सामाजिक जागृतीच्या आणि हक्कांच्या प्रश्नांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरतात, तेव्हा आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा मार्ग दाखवला. या मार्गावर चालल्याशिवाय समाजाची खरी उन्नती होऊ शकत नाही.

मला सर्वाधिक दुःख याचे वाटते की, अनेक मातंग कुटुंबांच्या घरात त्यांच्या समाजाचे महान साहित्यिक, लोकशाहीर आणि क्रांतिकारी विचारवंत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा फोटोसुद्धा दिसत नाही अण्णाभाऊ साठे हे केवळ मातंग समाजाचे नव्हे, तर संपूर्ण शोषित-वंचित समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या साहित्यामध्ये स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आहे.

अण्णाभाऊंच्या विचारांचा गाभा समजून घेतला तर एक गोष्ट स्पष्ट होते कि, शिक्षण घ्या, अन्यायाविरुद्ध लढा आणि आपल्या हक्कांसाठी संघटित व्हा. आज माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये माझे अनेक मातंग समाजातील मित्र आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना मला जाणवते की, अनेक कुटुंबांमधून अजूनही फार थोडे विद्यार्थी विद्यापीठीन स्तरापर्यंत पोहोचतात. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही; ती आपल्या समाजाचीही आहे.

आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने माझे मातंग समाजातील प्रत्येक कुटुंबाला मनापासून आवाहन आहे कि, आपल्या मुलांना शिक्षण द्या. मुलींना उच्च शिक्षण द्या. अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य घराघरात पोहोचवा. आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची आणि संघर्षाची जाणीव करून द्या आणि शिक्षणाला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचे सर्वोच्च साधन बनवा.

आज अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मातंग समाजामध्ये मोठी चर्चा आणि आंदोलन सुरू आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने या प्रश्नावर गंभीर आणि तथ्याधारित चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र माझ्या वैयक्तिक मतानुसार, या प्रश्नाचा वापर अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्यासाठी किंवा समाजाचे मूलभूत प्रश्न बाजूला सारण्यासाठी राजकीय पातळीवर केला जाऊ शकतो, याबाबत आपण सावध राहिले पाहिजे.

कोणताही राजकीय पक्ष असो—आपण आंधळेपणाने कोणाच्याही राजकारणाचे साधन बनता कामा नये. आपल्या समाजाने स्वतःचे प्रश्न स्वतःच्या विचाराने आणि संविधानिक मार्गाने मांडले पाहिजेत. आपण एकमेकांशी लढण्यापेक्षा अज्ञान, गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि शैक्षणिक मागासलेपणाविरुद्ध लढले पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या समाजाचे स्वप्न पाहिले, तो समाज केवळ उत्सव साजरा करणारा नसून शिक्षित, संघटित, स्वाभिमानी आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणारा समाज असायला हवा. आज अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. अण्णाभाऊंची जयंती केवळ मिरवणुकीपुरती मर्यादित न ठेवता, प्रत्येक मातंग कुटुंबातील एका मुलाला उच्च शिक्षण देण्याचा संकल्प करूया.

कारण 'अण्णाभाऊंच्या विचारांना खरी मानवंदना म्हणजे शिक्षण, स्वाभिमान आणि संघर्ष!'

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन!

जय भीम!

जय अण्णाभाऊ!

जय संविधान!

राकेश इंद्रेश पाटील

(M.A. LLB)

कार्यकारी सहायक,

विधि विभाग (उच्च न्यायालय - मूळ बाजू),

बृहन्मुंबई महानगर पालिका.

Updated : 1 Aug 2026 11:09 AM IST

Tags: #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #MatangSamaj #LokshahirAnnabhauSathe #Bahujan #SocialJustice #MarathiNews #MaharashtraNews #DrBabasahebAmbedkar #MaxMaharashtra

Follow

(M.A. LLB) कार्यकारी सहायक, विधि विभाग (उच्च न्यायालय - मूळ बाजू), बृहन्मुंबई महानगर पालिका.

Next Story

मी एका बौद्ध मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो. माझे वडील लहान वयातच उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. सुरुवातीला ते शिव (sion) कोळीवाडा परिसरात राहिले. त्यानंतर तेथील संपूर्ण वस्तीचे स्थलांतर करून मुंबई उपनगरातील घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे पुनर्वसन करण्यात आले. माझे वडील प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठवाडा नामांतर आंदोलनातील जनआंदोलनाचे एक कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या आजूबाजूला आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते पाहत मी मोठा झालो.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन!

जय भीम!

जय अण्णाभाऊ!

जय संविधान!

राकेश इंद्रेश पाटील

(M.A. LLB)

कार्यकारी सहायक,

विधि विभाग (उच्च न्यायालय - मूळ बाजू),

बृहन्मुंबई महानगर पालिका.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra