Dailyhunt
BARTIला संवेदनशील महासंचालकांची गरज

BARTIला संवेदनशील महासंचालकांची गरज

Max Maharashtra 2 weeks ago

Need for visionary leadership in BARTI महाराष्ट्रातील वंचित आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उभारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था 'बार्टी'.

ही केवळ एक सरकारी यंत्रणा नाही. ती हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला बळ देणारी महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या संस्थेच्या महासंचालक पदावर कोण येते, हा प्रश्न केवळ प्रशासकीय नसून सामाजिक जबाबदारीशी जोडलेला आहे. अशा वेळी निखिल मेश्राम (IRS) यांचे नाव चर्चेत येते. या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. माझा त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. ना त्यांच्याशी परिचय, ना कोणतेही पाहुणे ना भावकी नाते. तरीही त्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यामागे एकच कारण आहे.

सामाजिक क्षेत्रात काम करताना जाणवलेली त्यांची संवेदनशीलता आणि वंचित समाजाप्रती असलेली बांधिलकी. प्रशासकीय क्षेत्रात अनेक अधिकारी चर्चेत राहतात; काही वादांच्या भोवऱ्यात सापडतात. परंतु निखिल मेश्राम सर यांची ओळख यापेक्षा वेगळी आहे. अभ्यासू वृत्ती, शांत स्वभाव आणि विनम्रतेतून काम करणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. वस्तू व सेवा कर (GST) या गुंतागुंतीच्या आणि तांत्रिक क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षणीय आहे. परंतु केवळ प्रशासकीय कौशल्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा हा प्रामाणिकपणा आणि आंबेडकरी विचारांशी असलेल्या नात्यात दिसतो.

मेश्राम यांच्याबाबत विशेषत्वाने जाणवणारी बाब म्हणजे विद्यार्थ्यांविषयीची त्यांची आस्था. तरुण पिढीच्या क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास आहे. समाजातील वंचित घटक प्रगल्भ आणि सक्षम होण्यासाठी वाचन संस्कृती अत्यावश्यक आहे, ही जाणीव त्यांना आहे. म्हणूनच विविध ठिकाणी अभ्यासिका उभारण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले, मदत केली. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर उभे राहण्यासाठी त्यांनी शांतपणे हातभार लावला आहे. परिवर्तनाची भाषा केवळ घोषणांमध्ये नसते; ती कृतीतून प्रकट होते. बार्टीसारख्या संस्थेला आज अशाच संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. कारण ही संस्था केवळ योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ आहे. तिची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवणे ही मोठी जबाबदारी आहे.

जर निखिल मेश्राम यांच्यासारंख्या अधिकाऱ्याची बार्टीच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली, तर या संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळू शकते. अनेक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील.विद्यार्थ्यांसाठी अधिक परिणामकारक आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण होऊ शकते. बार्टीचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता अशा नेतृत्वात आहे. म्हणूनच सामाजिक भान जपणाऱ्या,आंबेडकरी विचारांची कास धरणाऱ्या आणि विद्यार्थ्यांविषयी खरी आस्था असलेल्या निखिल मेश्राम यांची बार्टीच्या महासंचालकपदी नियुक्ती व्हावी,ही अपेक्षा व्यक्त करणे आवश्यक वाटते.

Updated : 4 April 2026 2:59 PM IST

Follow

संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हॅंडस

Next Story

Need for visionary leadership in BARTI महाराष्ट्रातील वंचित आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उभारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था 'बार्टी'. ही केवळ एक सरकारी यंत्रणा नाही. ती हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला बळ देणारी महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या संस्थेच्या महासंचालक पदावर कोण येते, हा प्रश्न केवळ प्रशासकीय नसून सामाजिक जबाबदारीशी जोडलेला आहे. अशा वेळी निखिल मेश्राम (IRS) यांचे नाव चर्चेत येते. या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. माझा त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. ना त्यांच्याशी परिचय, ना कोणतेही पाहुणे ना भावकी नाते. तरीही त्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यामागे एकच कारण आहे.

संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हॅंडस

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra