मुंबईतल्या दादरच्या समुद्र किनारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे "चैत्यभूमी" हे समाधीस्थळ आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह देखील दादर मध्ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक महापुरुष आहेत.
त्यांचा संबंध असल्यामुळेच दादरची जागतिक पातळीवर ओळख आहे. दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगातील विविध भागातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे लाखो-करोडो अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे येत असतात.
1997 साली तत्कालीन रेल्वेमंत्री रामविलास पासवान जे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानायचे त्यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून व बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांच्या भावनेचा आदर करत दादर रेल्वे स्थानकाचे नाव "चैत्यभूमी" करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पासवान यांना कमी कालावधी मिळाला. संयुक्त मोर्चाचे सरकार जाऊन NDA चे सरकार आले आणि दादर स्थानकाचे नामांतर होऊ शकले नाही. तेव्हापासून दादर रेल्वे स्थानकाचे नाव "चैत्यभूमी टर्मिनस" करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनसेचा प्रामुख्याने विरोध राहिलेला आहे.
18 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाकडून दादर स्थानकाचे चैत्यभूमी असे नामांतर करणार असल्याचे जाहीर केले गेले. त्यानंतर त्यांच्या मंत्री मंडळातील चंद्रशेखर बावनकुळे व इतर मंत्र्यांनी देखील दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करणार असल्याचे प्रसार माध्यमांत जाहीर सांगितले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली. दादर रेल्वे स्थानक नाही तर दादर मेट्रो स्थानकाचे नाव चैत्यभूमी करणार असल्याचा प्रस्ताव असल्याचे जाहीर केले. आधी जाहीर करण्यात चूक झाली असे सांगितले. परंतु ही पलटीच वाटते. कारण एवढ्या मोठ्या शासन यंत्रणेत इतकी क्षुल्लक चूक होणे शक्य वाटत नाही. सरकारला पलटी मारावी लागली मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्याकडून याला विरोध सुरू झाला. शिवसेना (उ.बा.ठा.) च्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील चैत्यभूमी नावास विरोध केला. त्यांनी दादर स्थानिक निवासी व दादर नावाच्या अस्मितेच्या आधारे विरोध सुरू केला. चैत्यभूमी नाव देण्याची मागणी बाहेरच्या लोकांची असून स्थानिकांचा त्याला कठोर विरोध आहे असे वातावरण तयार केले. काही स्थानिकांना देखील त्यांनी यासाठी तयार केले. परंतु मागणी केवळ रेल्वे स्थानकाच्या नामांतराची आहे. दादर उपनगराच्या नामांतराचा कुठलाही विषय आलेला नाही.
दादर हा मुळात फारशी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. हा भाग इंग्रजांनी मुंबईची सात बेटे एकत्रित आणण्याच्या आधी दलदलीचा भाग होता. माहिम ते परळ यांच्या दरम्यान ये जा करण्यासाठी या भागात लाकडी जिने होते. या लाकडी जिन्यांना दादर म्हणत. त्यावरून या भागाचे नाव दादर पडले आहे. कधीकाळी दोनशे वर्ष आधी जी जमीनही नव्हती त्या दलदलीवरून पार करण्यासाठी असलेल्या जिन्याच्या नावाने आज अस्मिता बाळगणे यात काही तर्क नाही.
प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान आणि सन्मान उंचावेल असे उत्तुंग कर्तृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. परंतु स्थानिक लोकांना मराठीच्या नावाने अश्या खोट्या अस्मिता देऊन त्यांच्यात जातीय मानसिकता वाढवणे. प्रत्येक मराठी माणसाला ज्यांच्या मराठी असण्याचा अभिमान वाटावा अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अस्मिता नाकारायला लावणे, मराठी माणसांत जातींच्या आधारे फुट पाडणे हे नीच जातीयवादी राजकारण हे मराठी अस्मितेवाले पक्ष करतात. मुंबईत व्हिक्टोरिया टर्मिनस चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामांतर करण्याची मागणी यांचीच होती. बॉम्बे चे मुंबई यांनीच केले. या बाबतीत इंग्रजांची दिलेली नावे बदलायची आहेत असे कारण दिले जाते. परंतु कुर्ला स्थानकाचे नाव लोकमान्य टिळक टर्मिनस असे यांच्या युती सरकारच्या कार्यकाळात करण्यात आले. त्यावेळी दादर प्रमाणे कुर्लाची स्थानिक अस्मिता का आडवी आली नाही? याचा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेला विरोध करण्यासाठीच दादर अस्मिता पुढे केली जात आहे. जसे मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्यासाठी मराठवाड्याची अस्मिता पुढे केली गेली. मराठी माणसांचे राजकारण करणारे हे पक्ष मराठी माणसांत जातीय आधारे फूट पडतात हेच यातून पुन्हा उघड होत आहे.
Dadar Railway Station Renaming, Chaityabhoomi Name Change Controversy, Dr Babasaheb Ambedkar, Ambedkar Memorial Mumbai, Dadar Station Name Change, Chaityabhoomi Mumbai, Maharashtra Politics, Dadar Identity Politics, Ambedkar Followers, Caste Politics Maharashtra, Marathi Identity Politics, Mumbai Railway Station Renaming, Raj Thackeray, Bal Thackeray, Kishori Pednekar, Yashwant Killedar, Chaityabhoomi Terminus, Ambedkar Mahaparinirvan Din, Mumbai News, Maharashtra News, Max Maharashtra
Updated : 20 Nov 2026 3:38 PM IST
Follow
Next Story
मुंबईतल्या दादरच्या समुद्र किनारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे "चैत्यभूमी" हे समाधीस्थळ आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह देखील दादर मध्ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक महापुरुष आहेत. त्यांचा संबंध असल्यामुळेच दादरची जागतिक पातळीवर ओळख आहे. दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगातील विविध भागातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे लाखो-करोडो अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे येत असतात.

