Wednesday, 05 Aug, 9.44 am Max Maharashtra

होम
Exclusive : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढणार

सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्राला दिलेली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सॅलियन यांच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत नितीशकुमारांनी पंतप्रधानांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. नितीश कुमार यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि मंगळवारी लगेचच बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची प्रक्रिया सुरू केली.

महसूल गुप्तचर संचालनालयातील अति वरिष्ठ सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंहच्या वडिलांनी बिहारमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर बिहार पोलिसांनी तपास सुरू केला. पण मुंबई पोलिसांनी तपासात सहकार्य न केल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात झालेल्या आर्थिक आरोपांमुळे ईडीतर्फे चौकशी केली जाण्याची शक्यता वाढली आहे.

सुशांत सिंहच्या बँक खात्यांमधून किती रुपये काढले गेले?

सुशांत सिंहच्या चार कंपन्यांमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ हे संचालक म्हणून पदाधिकारी होते. या चार कंपन्यांच्या हिशोबाचे काम सीए असलेल्या संदीप श्रीधर यांच्याकडे होते. या कंपन्यांच्या बँक खात्यांमधून गेल्या दीड वर्षात 15 कोटी रुपये काढले गेेले होते. पण काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या माहितीमध्ये सीए श्रीधर यांनी सुशांत सिंहच्या बँक खात्यांमधून खूप कमी पैसे काढले गेले होते असा दावा केला होता. पण ईडीच्या माहितीनुसार सुशांत सिंहच्या खात्यामधून 14 कोटी रुपये काढले गेले आहेत आणि ही वस्तुस्थिती असल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आपल्या सोमवारच्या पत्रकार परिषदेत मान्य केलेले आहे.

सुशांत सिंह हनी ट्रॅपचा बळी?

'सुशांत सिंहच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांची क्रमवारी लावणे आम्हाला शक्य आहे', अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने मॅक्स महाराष्ट्राला दिलेली आहे. त्या सीएची नेमणूकदेखील रिया चक्रवर्तीच्या आग्रहामुळे केली गेली होती आणि या मागे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्ती असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा तपास व्यवस्थित झाला तर सुशांत सिंह राजपूत हनी ट्रॅपमध्ये अडकला होता का आणि त्याला कोणी अडकवलं? हे लवकरच समोर येईल असे देखील या अधिकाऱ्याने सांगितलेले आहे.

2014 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या Money Laundering Act of 2014 (PMLA-14) कायद्यामुळे ईडीला अनेक प्रकरणांचा छडा लवकर लावण्यास मदत होत आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सलियन यांचे फोन आणि लॅपटॉप उपलब्ध नसले तरी तांत्रिक प्रगतीमुळे क्लाऊड स्टोरेजवर या दोन्ही मृत व्यक्तींच्याबद्दल सायबर तज्ञांच्या मदतीने उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

2014 मध्ये कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेमुळे अनेक बँक खात्यांमध्ये गुप्त पद्धतीने किंवा चोरून करण्यात आलेले व्यवहार तपासणे सोपे झालेले आहे. 'PMLA कायद्यानुसार उल्लंघनाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवण्यात आल्याने आम्हाला आता बँकेतील अधिकार्‍यांचा देखील यातील संबंध शोधून काढता येतो. रिझर्व बँक जरी यावर कारवाई करू शकत नसली तरी मात्र यासंदर्भात ईडी कारवाई करू शकते' असे ईडीच्या एका अधिकार्‍याने मॅक्स महाराष्ट्राला सांगितले.

त्यामुळे या तपासाची व्याप्ती वाढली तर सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सॅलियन या दोघांच्या मृत्यूचं गुड उलगडू शकणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra
Top