Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Groundwater Science : बंद बोअरवेल चालू करण्यापासून नदी पुनरुज्जीवनापर्यंत!

Groundwater Science : बंद बोअरवेल चालू करण्यापासून नदी पुनरुज्जीवनापर्यंत!

Max Maharashtra 2 days ago

पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पावसाची अनिश्चितता वाढल्याने भूजलावरील अवलंबित्व वाढते, विहिरी आणि बोअरवेलची पाणी देण्याची क्षमता कमी होते, शेतकरी दरवर्षी पाण्याच्या नवनव्या संकटाला सामोरा जातात.

अशा परिस्थितीत पाण्याच्या प्रश्नावर काहीतरी करून दाखवण्याची समाजाची आणि शासनाची इच्छा स्वाभाविक आहे. याच भावनेतून जलसंधारणाच्या असंख्य कामांना चालना मिळते. बंधारे निर्माण, नाले खोदाई, समोच्च चर, शोषखड्डे, पुनर्भरणाच्या रचना उभ्या राहतात. बरेचदा नद्यांमध्ये खोदकाम केले कि दुष्काळमुक्ती आणि बंद किंवा कमी पाणी देणाऱ्या बोअरवेलला रासायनिक उपचार करून पुन्हा भरपूर पाणी मिळवून देण्याचे दावेही मोठ्या प्रमाणावर पुढे येतात. अशा काही प्रयत्नांमध्ये अल्पसा तांत्रिक धागा व उपयुक्तता पकडून त्यांच्याभोवती निर्माण केल्या जाणाऱ्या अतिरंजित दाव्यांचा खरा प्रश्न आहे. सामान्यांच्या वेदनांचा बाजार मांडून केल्या जाणाऱ्या अशा दुष्काळमुक्ती, सीसीटी, नदी पुनरुज्जीवन, शोषखड्डे आणि रासायनिक उपचारांसारख्या अनेक दाव्यांकडे डोळे उघडून पाहण्याची वेळ आली आहे. सहज जलबोध अभियान हे वेळोवेळी करत आहे आणि करत राहणार.

आज जलक्षेत्रात एक विचित्र प्रवृत्ती वाढताना दिसते. एखादी जलसंधारणाची रचना केली की गाव दुष्काळमुक्त झाले, काही सीसीटी केल्या की भूजलसाठा वाढला, नदीपात्र खोदले की नदी पुनरुज्जीवित झाली, शोषखड्डा केला की परिसरातील पाणीप्रश्न सुटला, बोअरवेलमध्ये रासायनिक उपचार केले की बंद बोअरवेलला जीवदान मिळाले अशा स्वरूपाची सरसकट विधाने केली जातात. काही ठिकाणी एखादा स्थानिक अनुभव खरा असतो; एखाद्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा झालेला असतो; एखाद्या गावात पाणी उपलब्धतेत सुधारणा झालेली असते. पण त्या एका अनुभवाला संपूर्ण प्रदेशासाठी लागू होणारा वैज्ञानिक नियम समजणे ही मोठी चूक आहे. जलसंधारणाची रचना म्हणजे परिणामाची हमी नव्हे; ती परिणाम साधण्याचे एक साधन आहे.

याच कारणामुळे सीसीटी अर्थात सलग समोच्च चरांकडे पाहतानाही अंजन घालण्याची गरज आहे. समोच्च रेषांवर योग्य ठिकाणी चर केल्याने पावसाच्या पाण्याचा वेग कमी होऊ शकतो, मातीची धूप कमी होऊ शकते, पाणी जमिनीत मुरण्यास काही प्रमाणात वेळ मिळू शकतो आणि काही परिस्थितीत स्थानिक पुनर्भरणास मदत होऊ शकते. परंतु 'सीसीटी केल्या आणि गाव दुष्काळमुक्त झाले' हा निष्कर्ष केवळ सीसीटीच्या अस्तित्वावर आधारित असू शकत नाही. त्या रचना कोणत्या उतारावर आहेत, मातीची पारगम्यता किती आहे, खाली कोणत्या प्रकारचा खडक आहे, पाणी कुठे आणि किती प्रमाणात मुरते, त्याचा जलधारक खडकाच्या थराशी संबंध आहे का, त्या पाण्याचा पुढे काय प्रवास होतो आणि त्या परिसरातील पाण्याची मागणी किती आहे, याचा विचार करावा लागतो. पाणी जमिनीत मुरणे आणि ते उपयुक्त भूजलसाठ्यात रूपांतरित होणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत.

त्याहून महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा प्रश्न हा केवळ पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रश्न नाही. एखाद्या गावात पावसाचे पाणी काही प्रमाणात अधिक जमिनीत मुरले, पण त्याच वेळी शेतीसाठी पाण्याचा उपसा वाढला, पिकांची पाण्याची गरज वाढली, ऊसासारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढले किंवा नवीन बोअरवेल खोदल्या गेल्या, तर भूजलसाठ्यावरचा ताण कायम राहू शकतो. म्हणूनच पुनर्भरण वाढविणे आणि पाण्याची मागणी नियंत्रित करणे ही दोन्ही चाके एकाच वेळी फिरली पाहिजेत. भारतातील कृत्रिम भूजल पुनर्भरणावरील अभ्यासही स्थळनिवड, स्थानिक भूजलविज्ञान, पाण्याचा स्रोत, पाण्याची गुणवत्ता आणि कामानंतरच्या परिणाममापनाला महत्त्व देतो; केवळ रचना उभारणे पुरेसे नाही.

शोषखड्डा किंवा तथाकथित 'जलतारा' याबाबतही हीच गोष्ट लागू होते. शोषखड्डा हा पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचे एक साधन आहे. पण प्रत्येक ठिकाणी केलेला प्रत्येक शोषखड्डा भूजल पुनर्भरण करेलच असे नाही. केंद्रीय भूजल मंडळाच्या तांत्रिक मार्गदर्शिकेतही पुनर्भरण खड्डा उभारण्यापूर्वी खालील थराची पारगम्यता तपासण्यासाठी झिरपण चाचणी करण्याचे महत्त्व सांगितले आहे. तसेच पाणी गाळमुक्त असणे, खड्ड्याची योग्य रचना असणे आणि वेळोवेळी गाळ काढणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. काही ठिकाणी खड्ड्याखाली अभेद्य थर असेल, भूजलाचा योग्य जलधारक थर उपलब्ध नसेल किंवा पाण्याचा स्रोतच अपुरा असेल, तर मोठ्या संख्येने खड्डे करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाही. उलट दूषित पाणी थेट जमिनीत सोडल्यास भूजलप्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 'शोषखड्डा केला म्हणजे पाणी वाचले' हे गणित इतके सोपे नाही.

नदी पुनरुज्जीवनाच्या नावाखाली नदीपात्र खोदण्याची प्रवृत्ती तर विशेष तपासण्यासारखी आहे. नदी म्हणजे केवळ वाहून जाणाऱ्या पाण्याची अरुंद वाट नाही. नदी म्हणजे तिचे जलसंधारण क्षेत्र, उपनद्या, नाले, पूरमैदान, नदीपात्रातील गाळाची हालचाल, भूजलाशी असलेला संबंध, पावसाळ्यातील प्रवाह, उन्हाळ्यातील आधारप्रवाह, नदीकाठची परिसंस्था आणि संपूर्ण पाणलोट क्षेत्र यांची एकत्रित व्यवस्था आहे. त्यामुळे नदीपात्रातील गाळ काढणे किंवा खोली वाढवणे हे काही विशिष्ट परिस्थितीत आवश्यक ठरू शकते; परंतु नदी खोदली म्हणजे नदी पुनरुज्जीवित झाली, असा सरसकट निष्कर्ष काढणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही नदीतील गाळ काढण्याचे काम सर्वत्र करावे असे म्हटलेले नाही. उलट गाळ काढण्याची गरज तांत्रिक अभ्यासातून सिद्ध झाली पाहिजे, नदीच्या आकाररचनेचा आणि गाळाच्या वहनाचा अभ्यास झाला पाहिजे आणि अशा कामामुळे नदीच्या वरच्या व खालच्या भागावर होणारे परिणाम तपासले पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे. काही परिस्थितीत अनियंत्रित खोदकामामुळे नदीकाठ अस्थिर होण्याची शक्यताही नमूद करण्यात आली आहे. म्हणजेच नदीला फक्त खोल करणे आणि नदीला पुनर्जीवित करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

नदी उन्हाळ्यात कोरडी पडत असेल तर तिच्या पात्रात पुन्हा पुन्हा खोदकाम करण्यापेक्षा प्रथम प्रश्न विचारला पाहिजे. उन्हाळ्यात नदीत पाणी येते कुठून? तिचा आधारप्रवाह कुठून येतो? जलसंधारण क्षेत्रात पावसाचे किती पाणी उपलब्ध होते? त्यातील किती वाहून जाते, किती जमिनीत मुरते आणि किती उपसले जाते? नदीच्या उगमक्षेत्रात आणि उपनद्यांमध्ये काय घडते? नदीकाठच्या भूजलपातळीचा नदीच्या प्रवाहाशी काय संबंध आहे? या प्रश्नांची उत्तरे न शोधता केवळ नदीपात्र खोदणे म्हणजे तापाचे कारण न शोधता थर्मामीटरची जागा बदलण्यासारखे आहे.

नदी पुनरुज्जीवनाच्या काही यशस्वी उदाहरणांतही केवळ नदीपात्र खोदण्यावर भर नसून संपूर्ण जलसंधारण क्षेत्रात पाणी अडविणे, पुनर्भरण वाढविणे, गाळ नियंत्रण, भूजलपातळी सुधारणा आणि आधारप्रवाह वाढविणे अशा अनेक उपायांचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका नदी पुनरुज्जीवनाच्या उदाहरणातही जलसंधारण क्षेत्रातील विविध जलसाठा आणि पुनर्भरण रचनांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविण्यावर भर दिल्याचे दिसते. यावरून एक मूलभूत धडा मिळतो. नदीचे पुनरुज्जीवन नदीपात्रात सुरू होत नाही; ते जलसंधारण क्षेत्रात सुरू होते.

आता सर्वांत आकर्षक आणि सर्वाधिक प्रश्न निर्माण करणाऱ्या दाव्याकडे येऊया कमी किंवा बंद पडलेल्या बोअरवेलला रासायनिक उपचार करून पुन्हा भरपूर पाणी मिळवून देणे. येथेही वास्तव आणि दावा यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करणे आवश्यक आहे. बोअरवेलच्या आसपास खनिजांचे साठे, गाळ, जैविक वाढ किंवा अन्य कारणांमुळे पाण्याचा प्रवेश अडथळलेला असेल, तर विशिष्ट परिस्थितीत योग्य रासायनिक उपचारामुळे बोअरवेलची कार्यक्षमता सुधारू शकते. परंतु रासायनिक उपचाराने जलधारक खडकात नवीन भूजल तयार होत नाही. रसायन बोअरच्या आसपासचा मार्ग मोकळा करू शकते; पण पाऊस निर्माण करू शकत नाही. ते बंद झालेली भेग काही परिस्थितीत खुली करू शकते; पण संपूर्ण परिसरातील भूजलसाठा वाढवू शकत नाही. म्हणून बोअरवेलचा पाण्याचा प्रवाह वाढला म्हणजे भूजलसाठा वाढला, असे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य आहे.

बोअरवेलची समस्या नेमकी काय आहे, हे प्रथम शोधणे गरजेचे आहे. पाणी कमी होण्याचे कारण बोअरभोवतीचा अडथळा आहे की भूजलपातळी खाली गेली आहे? पाणीवाहक भेगांची क्षमता कमी झाली आहे की परिसरात पाण्याचा उपसा वाढला आहे? बोअरवेलने चांगला जलधारक खडक गाठला आहे की अत्यल्प पाणी देणारा थर? उपचारापूर्वी आणि उपचारानंतर पाण्याचा प्रवाह, पाणीपातळीतील घट, पाणीपातळी पूर्ववत होण्याचा वेग आणि दीर्घकालीन पाणी देण्याची क्षमता यांची तुलना झाली आहे का? पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी झाली आहे का? या प्रश्नांची उत्तरे नसतील तर 'पाणी वाढले' हा अनुभव असू शकतो; पण तो वैज्ञानिक निष्कर्ष ठरत नाही.

याहून मोठी गोष्ट म्हणजे जलसंधारणाच्या सर्व रचनांना एकच चमत्कारी परिणाम जोडण्याची आपली मानसिकता. 'इतके बंधारे म्हणजे इतके टीएमसी पाणी', 'इतके चर म्हणजे इतका भूजलसाठा', 'इतके शोषखड्डे म्हणजे गाव दुष्काळमुक्त', 'नदी इतकी फूट खोल केली म्हणजे नदी कायम वाहणार' किंवा 'इतक्या बोअरवेलवर उपचार म्हणजे इतके नवीन पाणी निर्माण' अशी गणिते ऐकायला आकर्षक असतात; परंतु जलचक्राला जाहिरातीच्या गणितात बसवता येत नाही.

कारण प्रत्येक थेंबाचा हिशेब वेगळा आहे. पाऊस किती पडला, किती क्षेत्रावर पडला, किती पाणी वाहून गेले, किती बाष्पीभवन झाले, किती जमिनीत मुरले, किती खोल गेले, किती उथळ थरात राहिले, किती खोल जलधारक थरात पोहोचले, किती पाणी वनस्पतींनी घेतले, किती पाणी विहिरी-बोअरवेलमधून उपसले गेले आणि वर्षाच्या अखेरीस जलधारक थरात प्रत्यक्ष किती पाणी शिल्लक राहिले. हा संपूर्ण जलहिशेब केल्याशिवाय दुष्काळमुक्तीचा दावा करता येत नाही. भारतातील भूजल पुनर्भरणाच्या अभ्यासांमध्येही पुनर्भरणाच्या अंदाजावर भूगर्भीय रचना, हवामान, उपलब्ध माहिती आणि मोजमापाच्या पद्धतींचा मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्हणूनच 'दुष्काळमुक्त गाव' या शब्दाकडेही अत्यंत सावधपणे पाहायला हवे. एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला, विहिरी भरल्या आणि गावात पाणी उपलब्ध झाले, तर ते गाव त्या वर्षी पाणीसमृद्ध झाले असे म्हणता येईल; परंतु दुष्काळमुक्ती हा त्यापेक्षा मोठा दावा आहे. त्यासाठी अनेक वर्षांच्या पावसाची अनिश्चितता, भूजलपातळीतील बदल, जलसाठ्यांची स्थिती, पिकांची पाण्याची गरज, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, उपशाची मात्रा आणि दुष्काळी वर्षातील पाणीव्यवस्था यांचा विचार करावा लागतो. एका चांगल्या पावसाळ्यानंतर घेतलेला छायाचित्रांचा संच दुष्काळमुक्तीचा वैज्ञानिक पुरावा होऊ शकत नाही.

खरे तर जलसंधारणाच्या प्रत्येक कामाला एक साधा प्रश्न विचारला पाहिजे 'यातून नेमके किती पाणी निर्माण झाले?' नव्हे; तर 'उपलब्ध पाण्यातून किती पाणी साठवले, किती पाणी मुरवले, किती पाणी वाहून गेले, किती पाणी पुन्हा उपसले गेले आणि वर्षअखेरीस जलधारक खडकाच्या थरात प्रत्यक्ष किती निव्वळ वाढ झाली?' हा प्रश्न विचारला पाहिजे. केंद्रीय भूजल मंडळाच्या मार्गदर्शिकांमध्ये कृत्रिम पुनर्भरणाच्या रचनांच्या परिणाममापनासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत. म्हणजेच रचना बांधणे ही प्रक्रिया आहे; परिणाममापन हा तिच्या यशाचा खरा पुरावा आहे.

आणखी एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे पाणी वाढले, पण त्याचा उपसा किती वाढला? पुनर्भरणामुळे एखाद्या परिसरात भूजलपातळी वर आली आणि त्यानंतर अधिक बोअरवेल खोदल्या गेल्या, अधिक पंप बसवले गेले आणि अधिक पाणी उपसले गेले, तर काही काळाने पुन्हा तीच समस्या निर्माण होऊ शकते. काही अभ्यासांनी पुनर्भरणाच्या उपाययोजनांचा परिणाम मोजताना पुरवठा वाढविण्याबरोबरच पाण्याच्या मागणीचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे 'पाणी वाढवा' एवढेच धोरण पुरेसे नाही; 'पाणी किती वापरायचे' हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

हे सर्व सांगण्यामागचा उद्देश कोणत्याही जलसंधारणाच्या प्रयत्नाची खिल्ली उडवणे नाही. उलट जलसंधारणाच्या कामांना अधिक विश्वासार्ह बनवणे हा उद्देश आहे. सीसीटी उपयुक्त आहे. पण योग्य ठिकाणी आणि योग्य रचनेने. शोषखड्डा उपयुक्त आहे पण योग्य जलधारक थर, योग्य पाण्याचा स्रोत आणि योग्य रचना असेल तर. पुनर्भरण रचना उपयुक्त आहे. पण स्थानिक भूजलविज्ञान समजून घेतली तर. नदीतील गाळ काढणे काही परिस्थितीत आवश्यक आहे. पण नदीच्या संपूर्ण प्रवाहव्यवस्थेचा अभ्यास करून. बोअरवेलचे रासायनिक पुनर्विकसन काही परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते पण बोअरवेलच्या समस्येचे निदान करून आणि परिणाम मोजून.

समस्या तंत्रज्ञानात नाही; समस्या तंत्रज्ञानाला चमत्कार बनवण्यात आहे. गेल्या काही काळात समाजमाध्यमांवर या प्रकारच्या विविध दाव्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे. कारण जलक्षेत्रातील चुकीचा दावा हा केवळ बौद्धिक चूक नसतो. त्यामागे शेतकऱ्याचा पैसा असतो, शासनाचा निधी असतो, समाजाचा विश्वास असतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाण्यासारख्या मर्यादित नैसर्गिक साधनाचा प्रश्न असतो. एखाद्या चुकीच्या उपचारावर शेतकऱ्याने पैसा खर्च केला तर तो परत मिळवणे कठीण असते. एखाद्या अयोग्य ठिकाणी जलसंधारणाची रचना केली तर अपेक्षित परिणाम न मिळता सार्वजनिक निधी खर्च होतो. एखाद्या नदीचे अवैज्ञानिक खोदकाम केले तर नदीच्या नैसर्गिक प्रवाहव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि चुकीच्या पद्धतीने भूजल पुनर्भरण केले तर भूजलप्रदूषणाचाही धोका संभवतो.

म्हणून आता जलक्षेत्रात 'काम झाले का?' या प्रश्नाबरोबर 'परिणाम झाला का?' हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्यापुढे 'परिणाम नेमका किती झाला?', 'तो किती काळ टिकला?', 'तो मोजला कोणी?', 'त्याचा स्वतंत्र पुरावा काय?' आणि 'त्या परिणामामागे खरोखर कोणती प्रक्रिया कार्यरत होती?' हे प्रश्न विचारले पाहिजेत. जलसंधारणाच्या क्षेत्राला भक्तीची नव्हे, वैज्ञानिक चिकित्सेची गरज आहे. प्रत्येक रचनेला विरोध करणे हे विज्ञान नाही आणि प्रत्येक रचनेची स्तुती करणेही विज्ञान नाही. विज्ञान म्हणजे प्रश्न विचारणे, मोजमाप करणे, तुलना करणे, परिणाम तपासणे आणि चुकीचा निष्कर्ष आढळल्यास तो दुरुस्त करण्याचे धैर्य दाखवणे.

आज गरज आहे ती पाण्याच्या नावाने उभ्या राहिलेल्या चमत्कारांच्या बाजाराला थांबवण्याची नाही, तर त्यात मोजपट्टी घेऊन प्रवेश करण्याची. कारण पाण्याच्या प्रश्नावर भावनिक भाषणे, आकर्षक चलचित्रफिती आणि मोठमोठे दावे काही काळ लोकांना प्रभावित करू शकतात; पण पावसाळा संपल्यानंतरही विहिरीत पाणी टिकवून ठेवण्यासाठी शेवटी भूजलविज्ञानच निर्णायक ठरते. आणि म्हणूनच एक प्रश्न प्रत्येक जलसंधारणाच्या कामासमोर उभा केला पाहिजे.

'तुम्ही पाण्याचे छायाचित्र दाखवत आहात की पाण्याचा हिशेब?' कारण पाणी दिसणे हा परिणामाचा पुरावा नाही; पाणी टिकणे हा परिणामाचा पुरावा आहे. बोअरवेलला रसायनाने तात्पुरते बळ मिळू शकते; पण जलधारक खडकाचा थर त्यातून निर्माण होत नाही. नदीपात्र खोदल्याने नदी जन्माला येत नाही; तिच्या जलसंधारण क्षेत्राला जिवंत करावे लागते. शोषखड्डा खोदल्याने भूजलसाठा तयार होत नाही; पाणी योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात आणि सुरक्षितपणे जलधारक थरात पोहोचले पाहिजे. सीसीटीची संख्या वाढल्याने दुष्काळ संपत नाही; पाण्याचा ताळेबंद सुधारला पाहिजे. जलसंधारणात चमत्कार शोधण्यापेक्षा जलचक्र समजून घेऊया. कारण पाण्याला प्रसिद्धीची नाही. भूजलविज्ञानाची गरज आहे.

.... उपेंद्रदादा धोंडे, भूजलवैज्ञानिक, पुणे

(या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या मतांशी 'मॅक्स महाराष्ट्र सहमत असेलच असे नाही.)

water conservation, groundwater science, groundwater recharge, borewell chemical treatment, borewell water revival, river rejuvenation, riverbed excavation, check contour trenches, CCT, soak pits, drought-free villages, water conservation Maharashtra, groundwater recharge methods, water management, water crisis, groundwater depletion, scientific water management, river restoration, groundwater geology, water conservation claims, India water crisis

Updated : 14 Sept 2026 3:10 PM IST

Follow



Next Story

पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पावसाची अनिश्चितता वाढल्याने भूजलावरील अवलंबित्व वाढते, विहिरी आणि बोअरवेलची पाणी देण्याची क्षमता कमी होते, शेतकरी दरवर्षी पाण्याच्या नवनव्या संकटाला सामोरा जातात. अशा परिस्थितीत पाण्याच्या प्रश्नावर काहीतरी करून दाखवण्याची समाजाची आणि शासनाची इच्छा स्वाभाविक आहे. याच भावनेतून जलसंधारणाच्या असंख्य कामांना चालना मिळते. बंधारे निर्माण, नाले खोदाई, समोच्च चर, शोषखड्डे, पुनर्भरणाच्या रचना उभ्या राहतात. बरेचदा नद्यांमध्ये खोदकाम केले कि दुष्काळमुक्ती आणि बंद किंवा कमी पाणी देणाऱ्या बोअरवेलला रासायनिक उपचार करून पुन्हा भरपूर पाणी मिळवून देण्याचे दावेही मोठ्या प्रमाणावर पुढे येतात. अशा काही प्रयत्नांमध्ये अल्पसा तांत्रिक धागा व उपयुक्तता पकडून त्यांच्याभोवती निर्माण केल्या जाणाऱ्या अतिरंजित दाव्यांचा खरा प्रश्न आहे. सामान्यांच्या वेदनांचा बाजार मांडून केल्या जाणाऱ्या अशा दुष्काळमुक्ती, सीसीटी, नदी पुनरुज्जीवन, शोषखड्डे आणि रासायनिक उपचारांसारख्या अनेक दाव्यांकडे डोळे उघडून पाहण्याची वेळ आली आहे. सहज जलबोध अभियान हे वेळोवेळी करत आहे आणि करत राहणार.

.... उपेंद्रदादा धोंडे, भूजलवैज्ञानिक, पुणे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra