Maharashtra Day special १ मे हा महाराष्ट्र दिन प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमान, संघर्ष आणि अस्मितेचा दिवस आहे. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दीर्घ लढ्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा दिवस लोकशक्ती आणि एकजुटीचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्राने देशाला सामाजिक सुधारणा, शिक्षण, उद्योग, साहित्य, कला आणि लोकशाही मूल्यांची दिशा दिली आहे. महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय आणि संविधानाची पायाभरणी केली. मुंबईसारखी आर्थिक राजधानी देशाच्या प्रगतीचा कणा ठरली आहे. महाराष्ट्र दिन हा दिवस केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या इतिहास, संघर्ष आणि भविष्याचा संकल्प आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; परंतु त्याआधीच या भूमीने भारताला विचारांची, संघर्षाची आणि परिवर्तनाची अशी परंपरा दिली, ज्याचा केंद्रबिंदू हे मुलींचं शिक्षण.
मुलींच्या शिक्षणाची क्रांती : महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा
भारतातील स्त्री शिक्षणाची खरी पहाट महाराष्ट्रात उगवली. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, तेव्हा समाजात स्त्रियांना शिक्षण देणं म्हणजे धर्मभ्रष्ट होणं, परंपरा मोडणं आणि पाप करणं मानलं जात होतं. स्त्रियांना केवळ घरकाम, विवाह आणि कुटुंबापुरतं मर्यादित ठेवण्याची मानसिकता समाजात खोलवर रुजलेली होती. अशा काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार आहे, हा विचार मांडणं देखील एक प्रकारचं सामाजिक बंड होतं.
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्या रोज शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण आणि गोमूत्र फेकत असत. त्यांचा अपमान केला जात असे, शिवीगाळ केली जात असे; परंतु त्या खचल्या नाहीत. त्या नेहमी आपल्या पिशवीत दुसरी साडी घेऊन जात असत, जेणेकरून शाळेत पोहोचल्यानंतर बदलता येईल. ही घटना केवळ त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची नव्हे, तर शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाची साक्ष देते.
फुले दाम्पत्याने शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन मानलं. त्यांनी मुलींबरोबरच दलित, बहुजन आणि वंचित समाजातील मुलांसाठीही शाळा सुरू केल्या. त्या काळात विधवा स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. बालविवाह, सतीप्रथा, केशवपन आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथा समाजात प्रचलित होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण हे स्त्रियांना आत्मसन्मान, स्वावलंबन आणि स्वतःची ओळख मिळवून देणारं माध्यम बनलं. यानंतर पंडिता रमाबाई यांनी विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठी शिक्षण व पुनर्वसनाचं मोठं कार्य उभारलं. त्यांनी महिलांना धार्मिक आणि सामाजिक बंधनांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा दिली. रामाबाई रानडे यांनी महिलांच्या सार्वजनिक सहभागासाठी आणि शिक्षणासाठी अनेक उपक्रम सुरू केले. त्यांनी महिलांना केवळ साक्षर बनवण्यावर नव्हे, तर त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या या चळवळींनी पुढे संपूर्ण भारताला दिशा दिली. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने शिक्षणाचा अधिकार आणि समानतेची हमी दिली; मात्र सामाजिक स्तरावर बदल घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागले. ग्रामीण भागात आणि शहरी भागात आजही अनेक मुलींना अजूनही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. आर्थिक अडचणी, घरकामाची जबाबदारी, बालविवाह, सुरक्षिततेचे प्रश्न आणि पितृसत्ताक मानसिकता हे अडथळे कायम आहेत. तरीदेखील गेल्या काही दशकांत महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणात मोठी प्रगती दिसून येते. आज मुली वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, संशोधन, संरक्षण, क्रीडा, पत्रकारिता, प्रशासन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींचं प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील अनेक मुली प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलिस, अधिकारी, वैज्ञानिक आणि उद्योजक बनत आहेत. डिजिटल शिक्षणाच्या युगात नवीन संधी निर्माण झाल्या असल्या, तरी डिजिटल दरीही स्पष्टपणे दिसते. अनेक ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये इंटरनेट, स्मार्टफोन आणि तांत्रिक साधनांची कमतरता मुलींच्या शिक्षणावर परिणाम करते. कोविड-१९ काळात अनेक मुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, ही वास्तव परिस्थिती होती. त्यामुळे केवळ शाळेत प्रवेश मिळणं पुरेसं नाही; तर सातत्यपूर्ण, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं महत्त्वाचं आहे.
आज गरज आहे ती शिक्षणाला केवळ पदवी मिळवण्याचं साधन न मानता, सामाजिक समता आणि स्त्री सक्षमीकरणाचं माध्यम म्हणून पाहण्याची. कारण एक शिक्षित मुलगी केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण कुटुंब, समाज आणि पुढील पिढीचं भविष्य घडवते. महाराष्ट्राने सुरू केलेली स्त्री शिक्षणाची ही क्रांती आजही समाज परिवर्तनाची सर्वात मोठी प्रेरणा आहे.
आज स्त्री शिक्षणा समोर असलेली आव्हाने : वास्तवाचा वेध
महाराष्ट्र हे देशातील तुलनेने प्रगत राज्य मानलं जात असलं, तरी स्त्री शिक्षणाच्या बाबतीत अनेक गंभीर आणि बहुआयामी आव्हाने अजूनही कायम आहेत. सरकारी योजनांमुळे शाळांमध्ये मुलींची नावनोंदणी वाढली असली, तरी शिक्षणातील सातत्य, गुणवत्ता आणि समान संधी यांचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. विशेषतः ग्रामीण, आदिवासी, दलित, भटक्या-विमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षणासाठी अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो.
ग्रामीण-शहरी दरी : शिक्षणातील असमान वास्तव
शहरी भागातील मुलींना तुलनेने अधिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल साधने, सुरक्षित वाहतूक आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागात परिस्थिती वेगळी आहे. अनेक गावांमध्ये माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा दूर असल्याने मुलींना दररोज लांब अंतर प्रवास करावा लागतो. सुरक्षित वाहतुकीचा अभाव हा शिक्षण सोडण्यामागील मोठा घटक ठरतो.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) आणि विविध शैक्षणिक अहवालांनुसार, ग्रामीण भागात किशोरवयीन मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत अधिक आहे. विशेषतः आठवी आणि दहावीनंतर शिक्षण थांबवण्याचं प्रमाण वाढताना दिसतं. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबं मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देतात, तर मुलींना घरकाम किंवा शेतीकामात गुंतवलं जातं.
बालविवाह आणि लिंगभेद : शिक्षणातील अदृश्य अडथळे
कायद्याने बंदी असली, तरी बालविवाहाची समस्या अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. ग्रामीण आणि काही पारंपरिक समुदायांमध्ये मुलींचं लवकर लग्न करण्याची मानसिकता कायम आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. लग्नानंतर अनेक मुलींचं शिक्षण कायमचं थांबतं.
NFHS-5 च्या आकडेवारीनुसार, भारतात २० ते २४ वयोगटातील अनेक महिलांचे विवाह १८ वर्षांपूर्वी झालेले आहेत. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये ही समस्या गंभीर स्वरूपात दिसते. लिंगभेदाची मानसिकता देखील मुलींच्या शिक्षणात अडथळा निर्माण करते. 'मुलगी शेवटी दुसऱ्याच्या घरी जाणार' किंवा 'मुलींना जास्त शिक्षणाची गरज नाही' अशा विचारसरणी अजूनही काही भागांत अस्तित्वात आहेत.
यामुळे मुलींना शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या संधींपासून वंचित राहावं लागतं. अनेक मुलींना घरकाम, लहान भावंडांची जबाबदारी आणि कुटुंबातील काळजीवाहकाची भूमिका निभावत शिक्षण करावं लागतं.
डिजिटल दरी : नव्या युगातील नवी विषमता
कोविड-१९ महामारीनंतर शिक्षण व्यवस्थेत डिजिटल माध्यमांचं महत्त्व प्रचंड वाढलं. ऑनलाइन वर्ग, ई-लर्निंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हे शिक्षणाचं नवं वास्तव बनलं. मात्र या बदलाने समाजातील डिजिटल विषमता स्पष्टपणे समोर आणली. ग्रामीण भागातील अनेक मुलींना स्मार्टफोन, इंटरनेट किंवा स्वतंत्र डिजिटल साधनं उपलब्ध नव्हती. अनेक घरांमध्ये एकच मोबाईल असल्याने मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं. काही अभ्यासांनुसार, ग्रामीण भारतात मुलींच्या तुलनेत मुलांकडे डिजिटल साधनांचा अधिक प्रवेश आहे. यामुळे हजारो मुली ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहिल्या. डिजिटल साक्षरतेचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. फक्त इंटरनेट उपलब्ध असणं पुरेसं नाही; तर तंत्रज्ञान वापरण्याचं कौशल्य, भाषेची अडचण आणि सुरक्षित डिजिटल वातावरण देखील आवश्यक आहे. शिक्षणात सातत्य राखण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण अत्यंत महत्त्वाचं असतं. अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ स्वच्छतागृहांची कमतरता आहे. विशेषतः मासिक पाळीच्या काळात योग्य सुविधा नसल्याने अनेक मुली शाळेत गैरहजर राहतात किंवा शिक्षण सोडतात. युनिसेफ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या अहवालांनुसार, मासिक पाळीविषयी जागरूकतेचा अभाव आणि स्वच्छता सुविधांची कमतरता ही मुलींच्या शिक्षणातील मोठी समस्या आहे. ग्रामीण भागात शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि संरक्षणात्मक यंत्रणा नसल्याने पालक अनेकदा मुलींना पुढे शिकू देण्यास कचरतात.
शाळांमधील लैंगिक छळ, मानसिक ताण आणि सामाजिक दबाव यांचाही मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नाकडे केवळ प्रवेश किंवा परीक्षेच्या निकालांच्या दृष्टीने न पाहता, सुरक्षितता, मानसिक आरोग्य आणि सन्मान यांच्याशी जोडून पाहणं आवश्यक आहे. आज गरज आहे ती शिक्षणाच्या संकल्पनेला अधिक व्यापक करण्याची. केवळ शाळेत नावनोंदणी वाढवणं पुरेसं नाही; तर मुलींना दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, डिजिटल साक्षरता, आरोग्य सुविधा आणि आत्मविश्वास देणं महत्त्वाचं आहे. स्त्री शिक्षणाचा प्रश्न हा केवळ सामाजिक विकासाचा मुद्दा नाही, तर आर्थिक आणि लोकशाही विकासाशीही जोडलेला आहे. जागतिक अभ्यास सांगतात की मुलींच्या शिक्षणात वाढ झाल्यास बालमृत्यू कमी होतात, कुटुंबाचं आरोग्य सुधारतं, महिलांचा रोजगार वाढतो आणि समाज अधिक समताधिष्ठित बनतो. म्हणूनच शिक्षणाचा प्रश्न केवळ 'शाळेत प्रवेश' इथपर्यंत मर्यादित न ठेवता गुणवत्ता, सातत्य, सुरक्षितता आणि सक्षमीकरण या व्यापक दृष्टिकोनातून पाहणं ही आजची सर्वात मोठी गरज आहे.
धोरणात्मक दिशा : मुलींच्या शिक्षणासाठी काय आवश्यक?
महाराष्ट्राने स्त्री शिक्षणाची क्रांती सुरू केली, परंतु आजच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक वास्तवात मुलींच्या शिक्षणाकडे अधिक व्यापक आणि ठोस दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. केवळ शाळांमध्ये नावनोंदणी वाढवणं हा विकासाचा अंतिम मापदंड ठरू शकत नाही. शिक्षण मुलींना आत्मनिर्भर, सुरक्षित, तंत्रज्ञानसक्षम आणि निर्णयक्षम बनवत आहे का, हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या शिक्षणासाठी पुढील धोरणात्मक बाबींवर गंभीरपणे लक्ष केंद्रित करणं अत्यावश्यक आहे.
१. गुणवत्तापूर्ण आणि समावेशक शिक्षण : फक्त शाळा नव्हे, भविष्य घडवणारी व्यवस्था
आजही अनेक मुली शिक्षण व्यवस्थेत 'उपस्थित' असतात, पण प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून दूर असतात. शिक्षण केवळ पाठांतर आणि परीक्षा प्रणालीपुरतं मर्यादित राहिल्यास मुलींच्या सक्षमीकरणाचा उद्देश पूर्ण होणार नाही. शाळांमध्ये कौशल्याधारित शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, लैंगिक समानता आणि संविधानिक मूल्यांवर आधारित शिक्षण आवश्यक आहे. ह्या शिक्षणामुळे मुलींमध्ये नेतृत्व, निर्णयक्षमता आणि सामाजिक सहभागासाठी सक्षम करणं हे महत्त्वाचं पाऊल आहे.
ग्रामीण, आदिवासी, दलित, भटक्या-विमुक्त आणि दिव्यांग मुलींसाठी शिक्षण अधिक समावेशक करण्याची गरज आहे. भाषिक अडथळे, सामाजिक भेदभाव आणि संसाधनांची कमतरता दूर केल्याशिवाय 'समान शिक्षण' ही संकल्पना वास्तवात येणार नाही. विशेषतः माध्यमिक आणि उच्च शिक्षणात मुलींचं गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी स्वतंत्र धोरणं आवश्यक आहेत. शिक्षण व्यवस्था मुलींना आत्मविश्वास देणारी आणि त्यांच्या स्वप्नांना संधी देणारी असली पाहिजे.
२. डिजिटल समावेशन : इंटरनेट हा आता अधिकाराचा प्रश्न
आज शिक्षणाचं जग वेगाने डिजिटल होत आहे. ऑनलाइन वर्ग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-लर्निंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्म शिक्षणाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. मात्र ग्रामीण आणि गरीब कुटुंबांतील अनेक मुली अजूनही डिजिटल साधनांपासून वंचित आहेत. कोविड-१९ काळात हजारो मुलींना स्मार्टफोन, इंटरनेट किंवा स्वतंत्र अभ्यासाची जागा नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अनेक घरांमध्ये एकच मोबाईल असल्याने मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं. ही केवळ तांत्रिक दरी नाही, तर सामाजिक विषमता आहे. सरकारने प्रत्येक गावात उच्चगती इंटरनेट, डिजिटल लायब्ररी, मोफत किंवा सवलतीच्या दरात टॅब/लॅपटॉप आणि डिजिटल प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. ग्रामीण मुलींना तंत्रज्ञान वापरण्याचं प्रशिक्षण देणं तितकंच महत्त्वाचं आहे. भविष्यातील रोजगार आणि ज्ञानव्यवस्थेत डिजिटल कौशल्य अत्यंत आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे डिजिटल समावेशन हा आता केवळ सुविधा पुरवण्याचा विषय नसून—समान संधी आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न बनला आहे.
३. सुरक्षित आणि सन्मानजनक शैक्षणिक वातावरण : शिक्षणासाठी सुरक्षितता अनिवार्य
अनेक मुलींसाठी शिक्षणातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे असुरक्षितता. शाळा दूर असणं, सुरक्षित वाहतुकीचा अभाव, सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ आणि शाळांमधील अपुऱ्या सुविधा यामुळे अनेक पालक मुलींना पुढे शिकवण्यास कचरतात. मुलींसाठी सुरक्षित बस सेवा, सायकल योजना, निवासी वसतिगृहं आणि सुरक्षित सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच शाळांमध्ये स्वतंत्र आणि स्वच्छ स्वच्छतागृहांची उपलब्धता हा केवळ आरोग्याचा नव्हे, तर शिक्षणातील सातत्याचा प्रश्न आहे. मासिक पाळीच्या काळात अनेक मुली शाळेत गैरहजर राहतात किंवा शिक्षण सोडतात. त्यामुळे मासिक पाळीविषयी आरोग्य शिक्षण, सॅनिटरी सुविधांची उपलब्धता आणि सामाजिक जागरूकता वाढवणं आवश्यक आहे. शाळांमध्ये लैंगिक छळविरोधी प्रभावी यंत्रणा, समुपदेशन सेवा आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध असलं पाहिजे. मुलींना भीतीमुक्त आणि सन्मानजनक वातावरण मिळाल्याशिवाय शिक्षणाचा अधिकार पूर्ण होऊ शकत नाही.
४. आर्थिक सहाय्य : शिक्षण थांबण्यामागील गरिबीची भिंत तोडणं
गरीबी ही मुलींच्या शिक्षणातील सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक आहे. अनेक कुटुंबांना शिक्षण हा खर्च वाटतो, गुंतवणूक नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी आल्या की सर्वप्रथम मुलींचं शिक्षण थांबतं.
शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण, सायकल योजना, वसतिगृह सुविधा, पौष्टिक आहार योजना आणि प्रवास भत्ता यांसारख्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि स्थलांतरित कुटुंबांतील मुलींसाठी विशेष सहाय्य आवश्यक आहे. उच्च शिक्षणासाठी कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज, संशोधनासाठी अनुदान आणि ग्रामीण मुलींसाठी निवासी शिक्षण सुविधा वाढवणं महत्त्वाचं आहे.कारण अनेक वेळा मुली शिक्षण सोडतात ते क्षमतेअभावी नाही, तर आर्थिक परिस्थितीमुळे.
५. समाज जागृती : मानसिकता बदलल्याशिवाय परिवर्तन अपूर्ण
मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न केवळ शासकीय योजनांनी सुटणार नाही; त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं अत्यंत आवश्यक आहे. आजही अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणाकडे 'लग्न होईपर्यंतची व्यवस्था' म्हणून पाहिलं जातं. करिअर, नेतृत्व आणि स्वतंत्र आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार मुलींना समानतेने मिळत नाही. पालक, शिक्षक, धार्मिक-सामाजिक नेते आणि माध्यमांनी स्त्री शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. बालविवाह, लिंगभेद आणि पितृसत्ताक विचारसरणीविरोधात सातत्याने जनजागृती होणं आवश्यक आहे. मुलींना शिक्षण देणं म्हणजे केवळ एका व्यक्तीचा विकास नव्हे; तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीत गुंतवणूक आहे, ही जाणीव समाजात रुजवावी लागेल.
स्त्री शिक्षण म्हणजे सक्षमीकरणाचा पाया
मुलींचं शिक्षण हा केवळ सामाजिक विकासाचा विषय नाही तो लोकशाही, अर्थव्यवस्था, आरोग्य आणि सामाजिक न्यायाशी थेट जोडलेला प्रश्न आहे. जर महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने प्रगतिशील राज्य म्हणून पुढे जायचं असेल, तर प्रत्येक मुलीपर्यंत सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सन्मानजनक शिक्षण पोहोचणं आवश्यक आहे. कारण शिक्षित मुलगी केवळ स्वतःचं भविष्य बदलत नाही ती संपूर्ण समाजाच्या प्रगतीची दिशा बदलते. मुलींचं शिक्षण हा केवळ विकासाचा विषय नाही; तो सामाजिक न्याय, समान संधी आणि लोकशाही मूल्यांचा पाया आहे. शिक्षणामुळे मुलींना आर्थिक स्वावलंबन, निर्णयक्षमता आणि सन्मानाने जगण्याची ताकद मिळते. महाराष्ट्राने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यातून स्त्री शिक्षणाची जी परिवर्तनवादी परंपरा सुरू केली, ती आज अधिक व्यापक करण्याची गरज आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमधील SDG 4 सर्वांसाठी समावेशक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देण्यावर भर देतो. या उद्दिष्टाचा केंद्रबिंदू म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला विशेषतः मुली, आदिवासी, ग्रामीण आणि वंचित समुदायांना समान शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं. शिक्षणाला रोजगार, आरोग्य, लैंगिक समानता आणि शाश्वत विकासाशी जोडून पाहिलं जात आहे. त्याचप्रमाणे, संयुक्त राष्ट्रांच्या 'Pact for the Future' मध्ये डिजिटल समावेशन, युवा नेतृत्व, विज्ञानाधारित शिक्षण आणि लिंग समानतेला भविष्यातील शांततापूर्ण आणि शाश्वत समाजासाठी अत्यावश्यक मानलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि बदलत्या रोजगारव्यवस्थेच्या युगात मुलींना आधुनिक कौशल्यं आणि डिजिटल साधनांपर्यंत समान प्रवेश मिळणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र दिन हा केवळ ऐतिहासिक अभिमान साजरा करण्याचा दिवस नाही; तो समाज म्हणून आपल्या प्राधान्यांचा आढावा घेण्याची संधी आहे. अजूनही अनेक मुली गरिबी, असुरक्षितता, बालविवाह आणि सामाजिक भेदभावामुळे शिक्षणापासून दूर आहेत. त्यामुळे शिक्षणाकडे केवळ आकडेवारी किंवा योजनांच्या चौकटीत न पाहता, सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पाहणं आवश्यक आहे. प्रत्येक मुलीला सुरक्षित, सन्मानजनक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं, तरच समताधिष्ठित आणि प्रगत समाजाची उभारणी शक्य होईल. कारण शिक्षित मुलगी ही केवळ स्वतःचं भविष्य घडवत नाही, तर पुढील पिढ्यांच्या प्रगतीलाही दिशा देते.
Updated : 1 May 2026 11:46 AM IST
Follow
Next Story
Maharashtra Day special १ मे हा महाराष्ट्र दिन प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमान, संघर्ष आणि अस्मितेचा दिवस आहे. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दीर्घ लढ्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा दिवस लोकशक्ती आणि एकजुटीचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्राने देशाला सामाजिक सुधारणा, शिक्षण, उद्योग, साहित्य, कला आणि लोकशाही मूल्यांची दिशा दिली आहे. महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय आणि संविधानाची पायाभरणी केली. मुंबईसारखी आर्थिक राजधानी देशाच्या प्रगतीचा कणा ठरली आहे. महाराष्ट्र दिन हा दिवस केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या इतिहास, संघर्ष आणि भविष्याचा संकल्प आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; परंतु त्याआधीच या भूमीने भारताला विचारांची, संघर्षाची आणि परिवर्तनाची अशी परंपरा दिली, ज्याचा केंद्रबिंदू हे मुलींचं शिक्षण.
मुलींच्या शिक्षणाची क्रांती : महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा
ग्रामीण-शहरी दरी : शिक्षणातील असमान वास्तव
बालविवाह आणि लिंगभेद : शिक्षणातील अदृश्य अडथळे
डिजिटल दरी : नव्या युगातील नवी विषमता
धोरणात्मक दिशा : मुलींच्या शिक्षणासाठी काय आवश्यक?
२. डिजिटल समावेशन : इंटरनेट हा आता अधिकाराचा प्रश्न
४. आर्थिक सहाय्य : शिक्षण थांबण्यामागील गरिबीची भिंत तोडणं
५. समाज जागृती : मानसिकता बदलल्याशिवाय परिवर्तन अपूर्ण
स्त्री शिक्षण म्हणजे सक्षमीकरणाचा पाया

