Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Day 2026 : महाराष्ट्राला सामाजिक न्यायाच्या लढ्याची भूमी का म्हटलं जातं?

Maharashtra Day 2026 : महाराष्ट्राला सामाजिक न्यायाच्या लढ्याची भूमी का म्हटलं जातं?

Max Maharashtra 2 weeks ago

Maharashtra Din 2026 संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रचंड संघर्षानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना मुंबई प्रांत पुनर्रचना कायद्यान्वये झाली. बॉम्बे प्रांतातून गुजरात वेगळं झालं.

1956 साली मध्य प्रदेश राज्यातून बॉम्बे प्रांतात सामील झालेले विदर्भ व हैदराबाद प्रांतातून सामील झालेल्या मराठवाड्यासह मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. अधिकृत रित्या 1 मे 1960 रोजी आपले महाराष्ट्र राज्य स्थापन झाले असले, तरी या भूभागाचे महाराष्ट्र नाव असल्याचे पुरावे अगदी सातवाहन काळापासून मिळतात. चिनी यात्री ह्वेनसांग च्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राचा सविस्तर उल्लेख आढळतो. महाराष्ट्र सामाजिक न्याय, सामाजिक सुधार व समतेच्या विचारांची भूमी राहिलेली आहे. महाराष्ट्रातूनच हे विचार देशभर गेले आहेत. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या महान कार्यांची पार्श्वभूमी महाराष्ट्राला लाभली आहे.

मध्ययुगात महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत सर्व 18 पगड बहुजन समाजातील मावळ्यांना एकत्रित करत रयतेचं राज्य निर्माण केले. तत्कालीन सरंजामी व सामान्यांचं शोषण करणाऱ्या सत्तेविरुद्ध बंड करत स्वराज्य निर्माण केलं. समाज व्यवस्थेतील सर्वात खालच्या स्तरातील समाज घटकासहीत सर्वांना या स्वराज्यात सामील करून घेत महत्वाची पदे व मान सन्मान दिला. छत्रपती संभाजी महाराजांनीही ती परंपरा सुरू ठेवली. परंतु नंतर हे स्वराज्य पेशवाईत परिवर्तित झाल्यानंतर पेशवाईच्या काळात जातीय विषमता, अनिष्ट रूढी, धर्माच्या आधारे शोषण, स्त्रियांचं शोषण, क्रूर व निर्दयी प्रथा यांनी कळस गाठला. भीमा कोरेगाव येथील 1818 च्या लढाई नंतर पेशवाईची राजसत्ता संपुष्टात आली. परंतु समाजव्यवस्थेत आणि धर्मव्यवस्थेत पेशव्यांच्या काळात लादलेले क्रूर व अमानवी प्रथा परंपरा सुरूच होत्या. महात्मा जोतीराव फुल्यांनी त्यावर प्रहार सुरू केला. पेशवाईची राजधानी असलेल्या पुण्यातून समाज सुधारणेची चळवळ सुरू केली. स्त्रियांवर, विधवा, बाल विधवांवर होणारे अत्याचार थांबवले. अस्पृश्यांसाठी आपली पाण्याची विहीर खुली केली. पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजनांमध्ये शिक्षणाचा प्रसार सुरू केला. धर्माच्या आधारे लादलेल्या गुलामगिरी व थोतांडावर आपल्या लिखाणातुन आणि विचारांतून प्रहार सुरू केला. सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली व सत्यशोधक चळवळ सुरू केली.

कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहु महाराज सुद्धा सत्यशोधक विचारांनी प्रभावित होते. त्यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून सामाजिक समतेची चळवळ जोमाने चालवली. सामाजिक न्यायाच्या चळवळीत शाहु महाराजांचे योगदान खूप मोठे आहे. आरक्षणाचे जनक म्हंटले जाते. 26 जुलै 1902 रोजी म्हणजे भारत स्वतंत्र्य होण्याच्या 45 वर्ष आधी शाहु महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानातील सर्व सरकारी नोकऱ्यांत मागासवर्गीयांना 50% आरक्षण लागू केले. त्याच्या 48 वर्षांनी 1950 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देशभर आरक्षण लागू झाले. आरक्षणाची पहिली मागणी 1869 साली महात्मा फुलेंनी केली. सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर जे मागासवर्गीय आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका महात्मा फुलेंची होती. शाहु महाराजांनी आपल्या राज्यात सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग, हॉस्टेल सुरू केले. जातीव्यवस्था संपवण्यासाठी आणि अस्पृश्यता संपवण्यासाठी स्वतः प्रयत्न केले.

आपल्या संस्थानात त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी 12 जुलै 1919 रोजी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायदा संमत केला. स्वतः च्या घरातुन व परिवारातून त्यांनी याची सुरुवात केली. त्यांनी आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह धनगर समाजाचे असलेले इंदौरचे महाराज तुकोजीराव होळकरांशी लाऊन दिला.

शाहू महाराजांनी कोल्हापुरात अस्पृश्यता निवारणासाठी १९१९ च्या सुमारास गंगाराम कांबळे या दलित समाजातील व्यक्तीला भाऊसिंगजी रोडवर स्वतःचे चहाचे हॉटेल काढून दिले होते, ज्याचे नाव 'सत्यसुधारक हॉटेल' असे होते. या हॉटेलवर खुद्द शाहू महाराज चहा पिण्यासाठी जात असत, हा त्या काळातील एक क्रांतिकारी सामाजिक बदल होता. शाहु महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा मदत केली. विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. बाबासाहेबांच्या चळवळीचे पहिले मुखपत्र मूकनायक सुरू करण्यासाठी सुद्धा शाहु महाराजांनी आर्थिक मदत केली. माणगावच्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शाहु महाराजांनी दलितांचे खरे नेते म्हणून घोषित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदारतळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन करत सामाजिक न्याय व समतेची चळवळ प्रभावीपणे सुरू ठेवली. बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे आणि कर्तृत्वामुळे बाबासाहेबांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलमेज परिषदांमध्ये नेतृत्व करता आले. यामुळे ही सामाजिक न्यायाची व समतेची चळवळ देशभर आणि जगभर गेली. पुढे बाबासाहेबांनी पुणे कराराच्या माध्यमातून 1935 च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये देशभर राजकीय आरक्षण मिळवले. बाबासाहेब स्वतः मुंबई विधान सभेत निवडून गेले. बाबासाहेब विधान सभेचे विरोधी पक्ष नेते सुद्धा झाले. या माध्यमातून बाबासाहेबांनी अनेक सामाजिक न्याय मिळवून देणारे निर्णय घेतले. बाबासाहेबांच्या व्यक्तित्वामुळे आणि कार्यकर्तृत्वामुळे देशभरातील शोषित समाज घटकांत सामाजिक न्यायाची चळवळ देशभर पसरत गेली. देश स्वतंत्र होत असताना बाबासाहेबांना देशाचं संविधान तयार करण्याची संधी मिळाली. संविधानाच्या माध्यमातून कलम 341 व 340 द्वारे बाबासाहेबांनी देशभर अनुसूचित जाती व जमातीला आरक्षण लागू करवले. तसेच कलम 340 द्वारे ओबीसी साठी मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा कायदा केला. यामुळे शाहु महाराजांनी महाराष्ट्रात सुरू केलेले आरक्षण बाबासाहेबांमुळे देशभर लागू झाले. तसेच संविधानाद्वारे अस्पृश्यता कायद्याने गुन्हा ठरवण्यात आली. संविधानात कायद्याने सर्व नागरीकांना एकसमान ठरविण्यात आले. जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेला संपवण्यासाठी समानतेचे कायदे करण्यात आले. अशा प्रकारे महाराष्ट्रातून सुरू झालेल्या या सामाजिक न्यायाच्या, समतेच्या, सुधारणेच्या चळवळीला आणि विचारांना बाबासाहेबांनी देशभर पोहोचवले. हे महाराष्ट्राचे देशासाठी महत्वाचे योगदान आहे.

Maharashtra social justice history, Maharashtra contribution to India, Samyukta Maharashtra Movement, Maharashtra formation day, Maharashtra state formation, Maharashtra equality movement, Social reform movement Maharashtra, Mahatma Jyotiba Phule contribution, Rajarshi Shahu Maharaj reservation, Dr Babasaheb Ambedkar social justice, Maharashtra reservation history, Maharashtra reformers, Maharashtra progressive movement, Maharashtra history article

Updated : 30 April 2026 4:59 PM IST

Follow

Next Story

Maharashtra Din 2026 संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रचंड संघर्षानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना मुंबई प्रांत पुनर्रचना कायद्यान्वये झाली. बॉम्बे प्रांतातून गुजरात वेगळं झालं. 1956 साली मध्य प्रदेश राज्यातून बॉम्बे प्रांतात सामील झालेले विदर्भ व हैदराबाद प्रांतातून सामील झालेल्या मराठवाड्यासह मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. अधिकृत रित्या 1 मे 1960 रोजी आपले महाराष्ट्र राज्य स्थापन झाले असले, तरी या भूभागाचे महाराष्ट्र नाव असल्याचे पुरावे अगदी सातवाहन काळापासून मिळतात. चिनी यात्री ह्वेनसांग च्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राचा सविस्तर उल्लेख आढळतो. महाराष्ट्र सामाजिक न्याय, सामाजिक सुधार व समतेच्या विचारांची भूमी राहिलेली आहे. महाराष्ट्रातूनच हे विचार देशभर गेले आहेत. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या महान कार्यांची पार्श्वभूमी महाराष्ट्राला लाभली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra