Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईचा समुद्र स्वच्छ होणार? BMCचा आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार!

मुंबईचा समुद्र स्वच्छ होणार? BMCचा आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार!

Max Maharashtra 4 days ago

मुंबई : मुंबईच्या समुद्रात वाहून जाणारा प्लास्टिक आणि अन्य घनकचरा रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. समुद्र प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Cleanup) या संस्थेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारानुसार मुंबईतील आणखी नऊ ठिकाणी आधुनिक 'इंटरसेप्टर' यंत्रणा बसविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ट्रॉम्बे आणि मालाड खाडीत बसविण्यात आलेल्या या यंत्रणेद्वारे सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत तब्बल ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे.

मुंबईच्या सागरी किनारपट्टीवरील प्रदूषण कमी करणे, समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा रोखणे आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुंबईच्या समुद्राचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना अधिक व्यापक करण्यात येणार आहेत.

आणखी नऊ ठिकाणी इंटरसेप्टर यंत्रणा

मुंबईच्या नाल्यांमधून आणि जलप्रवाहांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य तरंगता कचरा समुद्रात जातो. हा कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच अडवण्यासाठी 'द ओशन क्लीनअप' संस्थेच्या सहकार्याने आणखी नऊ ठिकाणी इंटरसेप्टर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामध्ये दादर-धारावी नाला, पिरामल नाला, गजधरबंध नाला, मिठी नदी, ट्रॉम्बे खाडी, कला नगर नाला, राजेंद्र नगर नाला, माहुल नाला आणि मालवणी नाला या ठिकाणांचा समावेश आहे. या यंत्रणांमुळे प्लास्टिक आणि इतर तरंगता कचरा अरबी समुद्रात जाण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे.

आतापर्यंत ११९.५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन

'द ओशन क्लीनअप' या आंतरराष्ट्रीय संस्थेने यापूर्वीच मालाड खाडीतील रामचंद्र नाला आणि ट्रॉम्बे खाडीतील सुभाष नगर नाला येथे ट्रॅश इंटरसेप्टर प्रणाली कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत एकूण ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे. यामध्ये ट्रॉम्बे खाडीतून १०२ मेट्रिक टन, तर मालाड खाडीतून १७.५ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 'प्लास्टिक फिशर' (Plastic Fischer) आणि 'युनायटेड वे मुंबई' (United Way Mumbai) या स्थानिक संस्थांचेही सहकार्य लाभले आहे.

महापालिकेच्या १४ ठिकाणी आधीच ट्रॅश बूम

मुंबईतील सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून यापूर्वीही विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेने शहरातील १४ महत्त्वाच्या ठिकाणी कचरा अडविणारी 'ट्रॅश बूम' यंत्रणा उभारली आहे. याशिवाय दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रकल्प सुरू आहेत. लव्हग्रोव्ह आणि इर्ला येथे 'बॅक रेक स्क्रीन' बसविण्यात आले असून, ११ ठिकाणी ट्रॅश नेटही लावण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून नाले आणि नद्यांमधून समुद्रात जाणारा घनकचरा रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्वच्छ समुद्रासाठी मुंबईकरांनाही आवाहन

या सामंजस्य करारावर मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महापालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम आणि 'द ओशन क्लीनअप'चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बोयन स्लॅट यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी नेदरलँड्स दूतावासाचे महावाणिज्यदूत नबील तौवाती, अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, उपआयुक्त किरण दिघावकर आणि प्रमुख अभियंता मेहुल पेंटर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर रितू तावडे यांनी मुंबईची किनारपट्टी, नद्या आणि समुद्र स्वच्छ व सुरक्षित राखण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. या मोहिमेत स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) सहकार्य करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी नाले, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर कचरा टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, महापालिकेची कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट व्यवस्थापन यंत्रणा तसेच 'द ओशन क्लीनअप' संस्थेचे जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य यांचा समन्वय साधला जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिक आणि पाण्यावर तरंगणारा कचरा समुद्रात जाण्यापूर्वी रोखण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल. मुंबईच्या समुद्राचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ यंत्रणा उभारणे पुरेसे नाही, तर नाल्यांमध्ये आणि जलप्रवाहांमध्ये कचरा जाणारच नाही, यासाठी नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. नव्या नऊ इंटरसेप्टर यंत्रणांमुळे समुद्र स्वच्छतेच्या मोहिमेला कितपत यश मिळते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Mumbai Plastic Pollution, BMC The Ocean Cleanup Agreement, Mumbai Ocean Cleanup Project, Mumbai Marine Pollution, Plastic Waste Management Mumbai, Interceptor System Mumbai, Mumbai Coastal Cleanup, Brihanmumbai Municipal Corporation, The Ocean Cleanup, Mumbai Environment News, Mithi River Cleanup, Malad Creek Plastic Waste, Trombay Creek Cleanup, Mumbai Sea Pollution, Ritu Tawde, Ashwini Bhide, Mumbai News 2026

Updated : 18 Nov 2026 5:43 PM IST

Follow



Next Story

मुंबई : मुंबईच्या समुद्रात वाहून जाणारा प्लास्टिक आणि अन्य घनकचरा रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. समुद्र प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या 'द ओशन क्लीनअप' (The Ocean Cleanup) या संस्थेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार मुंबईतील आणखी नऊ ठिकाणी आधुनिक 'इंटरसेप्टर' यंत्रणा बसविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ट्रॉम्बे आणि मालाड खाडीत बसविण्यात आलेल्या या यंत्रणेद्वारे सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत तब्बल ११९.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे.

आणखी नऊ ठिकाणी इंटरसेप्टर यंत्रणा

आतापर्यंत ११९.५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन

महापालिकेच्या १४ ठिकाणी आधीच ट्रॅश बूम

स्वच्छ समुद्रासाठी मुंबईकरांनाही आवाहन

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra