Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रद्धेच्या वातावरणात विवेकाचा जागर; महालक्ष्मी मंदिरात अंनिसचा अनोखा उपक्रम

श्रद्धेच्या वातावरणात विवेकाचा जागर; महालक्ष्मी मंदिरात अंनिसचा अनोखा उपक्रम

Max Maharashtra 1 week ago

नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणातच अंधश्रद्धेविरोधी विचारांची मांडणी करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महा. अंनिस) परळ पूर्व येथील महालक्ष्मी मंदिरात 'जागर स्त्रीशक्तीचा' हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला.

१४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात 'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' या विषयावर मांडणी करण्यात आली. चमत्कारांचे प्रात्यक्षिक प्रयोग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या विवेचनाच्या माध्यमातून भाविकांमध्ये चिकित्सक विचार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धार्मिक स्थळांवर अंधश्रद्धेच्या नावाखाली घडणाऱ्या प्रकारांवर चर्चा करणे आणि त्यामागील वास्तव लोकांसमोर आणणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला सहभाग विभागाच्या वतीने 'फुलेंच्या विचारांची ज्योत, स्त्री मुक्तीची वाट' या अभियानांतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात आला. महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या परिसरातच हा कार्यक्रम झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक कशी ओळखायची?

अंधश्रद्धा अनेकदा श्रद्धेच्या नावाने सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण करते. विशेषतः महिलांच्या बाबतीत देवी अंगात येणे, भूतबाधा, करणी अशा समजुतींचा वापर करून त्यांची दिशाभूल केली जाते. याच मुद्द्यांवर कार्यक्रमात लक्ष केंद्रित करण्यात आले.

रुपेश आणि नंदकिशोर यांनी चमत्कारांचे काही प्रात्यक्षिक प्रयोग सादर केले. तथाकथित बाबा-बुवा, भगत आणि इतर व्यक्ती चमत्कारांच्या नावाखाली लोकांची दिशाभूल कशी करतात, हे प्रयोगांमधून दाखवण्यात आले.

'देवी अंगात आल्यावर जळता कापूर खाल्ला जातो, मग हात भाजत नाहीत का?', 'भूत उतरवण्याच्या नावाखाली नेमके काय घडते?' आणि 'देवळातील नारळातून करणी कशी झाली?' असे प्रश्न उपस्थित करून भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात आली. या प्रश्नांच्या माध्यमातून चमत्कारांच्या दाव्यांकडे डोळसपणे पाहण्याची आणि त्यांची चिकित्सा करण्याची गरज अधोरेखित झाली.

कार्यक्रमाला एका वेळी प्रत्यक्ष बसून ऐकणारे सुमारे २० ते २५ लोक उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाचे महत्त्व केवळ उपस्थितांच्या संख्येपुरते मर्यादित नव्हते. महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला, पुरुष, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि नवविवाहित जोडपी काही वेळ थांबून प्रबोधनात्मक मांडणी ऐकत होती.

अनेक भाविक उभे राहून कार्यक्रम ऐकत होते. काही वेळासाठी का होईना, त्यांनी या विषयाकडे लक्ष दिले आणि मांडणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. धार्मिक स्थळाच्या परिसरात प्रोजेक्टरच्या माध्यमातून 'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' हा विषय थेट भाविकांसमोर मांडणे, हा या उपक्रमाचा वेगळेपणा ठरला.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या महा.अंनिसच्या बॅनरकडेही भाविक कुतूहलाने पाहत होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक समजून घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी संवाद घडवून आणण्याची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.

अंनिसच्या कामाशी जोडले जाण्याची इच्छा

कार्यक्रम संपल्यानंतर काही महिला आणि पुरुषांनी आपले अनुभव मांडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी जोडून घेण्याची आणि कार्यकर्ते म्हणून काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांपैकी एका महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वर्गणीदार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना पत्रिकेचा एक अंक भेट देण्यात आला. कार्यक्रमाला मिळालेला हा प्रतिसाद अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांशी अधिक लोकांना जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी म्हटलं आहे.

मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने कार्यक्रम

महालक्ष्मी मंदिर परिसरात काही व्यक्तींकडून अंधश्रद्धेशी संबंधित प्रकार केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टनेच हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आयोजकांनी दिली. अंनिसचा कार्यक्रम असल्याचे समजल्यानंतर अशा प्रकारांशी संबंधित असल्याचे सांगितले जाणारे काही लोक आणि त्यांचे साथीदार मंदिर परिसरात फिरकले नाहीत, असेही आयोजकांनी सांगितलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव विजय परब उपस्थित होते. धार्मिक स्थळाच्या परिसरात अंधश्रद्धेविरोधी प्रबोधन करणे, महिलांच्या अनुभवांशी संबंधित प्रश्न उपस्थित करणे आणि चमत्कारांच्या दाव्यांची चिकित्सा करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, या दृष्टीने 'जागर स्त्रीशक्तीचा' हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.

Mahalaxmi Temple Mumbai, Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti, ANiS, Anti-Superstition Campaign, Women and Superstition, Navratri 2026, Jagar Stree Shakticha, Scientific Temper, Superstition Awareness, Social Awareness Programme, Mumbai News, Parel East News, Women Empowerment, Rational Thinking, Maharashtra News, Anti-Superstition Movement

Updated : 15 Oct 2026 2:31 PM IST

Follow



Next Story

नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणातच अंधश्रद्धेविरोधी विचारांची मांडणी करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महा. अंनिस) परळ पूर्व येथील महालक्ष्मी मंदिरात 'जागर स्त्रीशक्तीचा' हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात 'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' या विषयावर मांडणी करण्यात आली. चमत्कारांचे प्रात्यक्षिक प्रयोग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या विवेचनाच्या माध्यमातून भाविकांमध्ये चिकित्सक विचार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक कशी ओळखायची?

अंनिसच्या कामाशी जोडले जाण्याची इच्छा

मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने कार्यक्रम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra