Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'थाला'पती फॉर ए रिजन!

'थाला'पती फॉर ए रिजन!

Max Maharashtra 2 weeks ago

विवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४. स्थळ तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातल्या विक्रवंडी इथलं मैदान. वेळ रणरणत्या उन्हात दुपारची. एका नव्याने स्थापन झालेल्या पक्षाची जाहीर सभा. १०० एकरांच्या मैदानात पाय ठेवायलाही जागा नाही.

साधारण २ लाख लोक या नव्या पक्षाच्या नव्या नेत्याला ऐकण्यासाठी जमले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. चौफेर घोषणाबाजी होतेय. जोश भरण्यासाठी गाणी वाजवली जातायत. जबरदस्त माहोल बनलाय. तेवढ्यात या गर्दीचा नेता अवतरतो. स्टेजवरून अभिवादन करतो. ते बघून समोरच्या लाखो लोकांचा उत्साह आभाळाला भिडतो. हा नेता स्टेजसमोरच्या रॅम्पवरून चालत येत लोकांमध्ये जातो. कार्यकर्ते उत्साहाच्या भरात गळ्यातले पक्षाचे गमछे नेत्याकडे भिरकावतात. तो नेताही हे सगळे गमछे एकत्र करत स्वतःच्या गळ्यात घालतो. गर्दीचे हात जोडून आभार मानतो. हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यावर त्याचं पाऊण तासाचं आक्रमक भाषण होतं. या भाषणात चेन्नईपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचीच चिरफाड केली जाते. ही सभा होती 'तमिळगा वेत्री कळघम' या नव्या पक्षाची आणि हा नेता आहे 'टीव्हीके'चा संस्थापक आणि तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार थलपती विजय!

जोसेफ विजय चंद्रशेखर, अर्थात चाहत्यांचा थलपती विजय. तमिळनाडूत गेल्या ६ दशकांपासून चालत आलेली DMK आणि AIADMK ची भक्कम राजकीय मक्तेदारी विजयने मोडून काढलीय. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने १०० हून अधिक जागांवर मुसंडी मारत तमिळ राजकारणाचा सारीपाटच उलटवून टाकलाय. हे दमदार यश केवळ त्याच्या सुपरस्टार प्रतिमेवर अवलंबून नाहीय. तर या ऐतिहासिक विजयामागे एक अत्यंत सूक्ष्म, नियोजनबद्ध आणि पारंपारिक तमिळ राजकारणाला छेद देणारी रणनीती होती. बूथ स्तरापार्यंत पक्ष संघटना उभी करण्यापासून ते उमेदवारांची निवड, प्रचारयंत्रणा राबवणं, आक्रमक भाषणं, प्रचारातील मुद्दे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर या सर्वांमुळे विजयला त्याच्या चाहत्यांचं रुपांतर मतदारांमध्ये करता आलं.

२ फेब्रुवारी २०२४ ला विजयने आपल्या 'टीव्हीके' या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि ऑक्टोबरमधल्या पक्षाच्या पहिल्या 'मन्नाडू' (तमिळमध्ये परिषद किंवा सभा) मध्ये पक्षाची विचारधारा धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाची असल्याचं जाहीर केलं. या सभेच्या ठिकाणी प्रवेशद्वार आणि स्टेजवर लावलेले कटआऊट्सही बोलके होते. डावीकडे आंबेडकर, उजवीकडे पेरियार आणि या दोन महापुरुषांच्यामध्ये विजय. या माध्यमातून टीव्हीकेनं आपली वैचारिक बैठक स्पष्ट केली होती. यासोबतच तमिळ स्वातंत्र्यसेनानी अंजलाई अम्मल, राणी वेळू नाचियार, सी. एन. अन्नादुराई आणि के. कामराज यांचे विचार घेऊन तमिळनाडूची सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक अस्मिता विजयने बरोबर हेरली होती. त्या पहिल्याच जाहीर सभेत विजय 'ऑप्टिक्स'च्या खेळात यशस्वी झाला होता. त्यादिवशी त्याने जे 'नरेटिव्ह' सेट करायला घेतलं होतं, त्याचा परिणाम आज ईव्हीएममधून बाहेर आला आहे.

१९६० च्या उत्तरार्धात तामिळनाडूचं राजकारण द्रविड राजकारणानं व्यापून टाकलं. स्वातंत्र्यानंतर १९४७ ते ६७ अशी २० वर्ष सोडली तर काँग्रेसला त्यानंतर इथे आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही. गेली ६ दशकं तामिळनाडूचं राजकारण द्रविड म्हणजे DMK आणि AIADMK यांच्याच भोवती फिरतंय. या काळात इतर पक्षांना उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. तामिळनाडूची सत्ता DMK आणि AIADMK या दोन पक्षांना फिरत्या चषकासारखी आलटून पालटून मिळलीय. अशी पार्श्वभूमी असताना पक्षात तमिळ नाव, भाषिक अस्मिता आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन विजयने राजकारणात उडी घेतली आणि मतदारांना आणि पारंपरिक द्रविड राजकारणाला एक लोकप्रिय पर्याय तयार झाला.

२०२४ मध्येच विजयने DMK हा राजकीय विरोधक तर भाजप हा वैचारिक विरोधक असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार टीव्हीकेने कोणत्याही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाशी युती न करता, विधानसभेच्या सर्वच्या सर्व २३४ जागा स्वबळावर लढवल्या. तमिळनाडूमध्ये तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय होती. हे मतदार जुन्या, पारंपारिक आणि घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले होते. त्यांना विजयच्या रूपाने एक नवा, आश्वासक आणि त्यांच्या भाषेतील तरुण चेहरा मिळाला. विजयनेही 'मास हिरो' म्हणून मिळवलेल्या लोकप्रियतेचं अत्यंत अचूकपणे राजकीय मतपेढीत रूपांतर केलं. विजयचे फॅन क्लब्स अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय होते. रक्तदान शिबिरं, अन्नदान आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेली मदत यामुळे विजयची प्रतिमा केवळ एका पडद्यावरील अभिनेत्याची न राहता एका सामाजिक जाणीव असलेला कलाकार अशी बनली होती. निवडणुकीत याच फॅन क्लब्सचं अत्यंत शिस्तबद्ध राजकीय कार्यकर्त्यांमध्ये रूपांतर झालं आणि ते पक्षाच्या यशाचा पाया ठरले.

दुसरीकडे DMK आणि AIADMK यांच्याविरोधात जनतेत सूप्त नाराजी होती. त्याला अधोरेखित करत राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचार, बेरोजगारी या मुद्द्यांवरून विजयने सरकार आणि विरोधकांनाही घेरलं. त्याची भाषणं अत्यंत आक्रमक, अभ्यासपूर्ण आणि जनतेला थेट भिडणारी होती. आपल्यातला कसदार अभिनेता त्यानं प्रत्येक सभेत समोर आणला. त्याच्या दमदार डायलॉगबाजीनं प्रचारात मोठी रंगत आणली होती. पैसे आणि वस्तू वाटून मते मिळवण्याच्या द्रविडी राजकारणाच्या परंपरेला फाटा देत विजयनं मतदारांचा आत्मसन्मान आणि राज्याचा शाश्वत विकास यावर लक्ष केंद्रित केलं आणि स्वतःला प्रस्थापित पक्षांसाठी एक सक्षम आणि स्वच्छ पर्याय म्हणून उभं केलं.

दक्षिणेच्या राज्यांमध्ये राजकारण करण्यासाठी अभिनेता असणं किंवा अभिनेता असलेल्यांनी राजकारणात येणं हा आता अलिखित नियम बनलाय. एखाद्या अभिनेत्याला पडद्यावर पाहणं आणि निवडणुकीत त्याला मत देणं हे मतदारांसाठीही सवयीचं झालंय. २०२४ मध्ये आंध्र प्रदेशात अभिनेता पवन कल्याणनं आपल्या जनसेना पक्षाची ताकद दाखवून देत भाजप आणि टीडीपीसोबत सत्तेची समीकरणं जुळवली आणि उपमुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. आता पवन कल्याण दक्षिणेत (किमान आँध्रात तरी) हिंदुत्वाचा पोस्टर बॉय आहे. त्याचप्रकारे विजयनेही तमिळनाडूमधल्या द्रविड राजकारणातली स्पेस ओळखून तिथे स्वतःला व्यवस्थित बसवून घेतलं. द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अखिल भारतीय अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन्ही पक्ष द्रविड अस्मिता घेऊन अभिनेत्यांनी स्थापन केले होते. याच इतिहासाची पुनरावृत्ती विजयने केली आणि तो यशस्वीही झालाय.

थाला, थलपती, थलैवा या शब्दांचा अर्थ तमिळमध्ये नेता, लीडर किंवा नेतृत्व असा होतो. विजय आपल्या चाहत्यांसाठी थलपती आहेच. आता त्याला सिनेमाच्या रंगीत पडद्यातून बाहेर येत वास्तवात लोकांचं नेतृत्व करायचंय. ही त्याच्या 'थलपती' असण्याची खरी कसोटी असेल.

~ अजिंक्य गुठे सालेगांवकर

Updated : 5 May 2026 12:05 PM IST

Tags: Thalapathy Thalapathy Vijay TVK Tamil Nadu Elections Elections

Follow

Next Story

रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४. स्थळ तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातल्या विक्रवंडी इथलं मैदान. वेळ रणरणत्या उन्हात दुपारची. एका नव्याने स्थापन झालेल्या पक्षाची जाहीर सभा. १०० एकरांच्या मैदानात पाय ठेवायलाही जागा नाही. साधारण २ लाख लोक या नव्या पक्षाच्या नव्या नेत्याला ऐकण्यासाठी जमले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. चौफेर घोषणाबाजी होतेय. जोश भरण्यासाठी गाणी वाजवली जातायत. जबरदस्त माहोल बनलाय. तेवढ्यात या गर्दीचा नेता अवतरतो. स्टेजवरून अभिवादन करतो. ते बघून समोरच्या लाखो लोकांचा उत्साह आभाळाला भिडतो. हा नेता स्टेजसमोरच्या रॅम्पवरून चालत येत लोकांमध्ये जातो. कार्यकर्ते उत्साहाच्या भरात गळ्यातले पक्षाचे गमछे नेत्याकडे भिरकावतात. तो नेताही हे सगळे गमछे एकत्र करत स्वतःच्या गळ्यात घालतो. गर्दीचे हात जोडून आभार मानतो. हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यावर त्याचं पाऊण तासाचं आक्रमक भाषण होतं. या भाषणात चेन्नईपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचीच चिरफाड केली जाते. ही सभा होती 'तमिळगा वेत्री कळघम' या नव्या पक्षाची आणि हा नेता आहे 'टीव्हीके'चा संस्थापक आणि तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार थलपती विजय!

~ अजिंक्य गुठे सालेगांवकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra