Wednesday, 20 Jan, 8.47 am MPC News

टॉप न्यूज
Gram Panchayat Election: निवडणुकीतील राजकीय स्वार्थासाठी नातेसंबंधांचा कडेलोट

एमपीसी न्यूज -(श्रीपाद शिंदे) नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले. ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीत अनेकांनी जोरदार प्रचार केला. कुणी विकासकामांची यादी वाचली, कुणी टीका टिपण्णी केली, कुणी राजकीय पुढा-यांचा आशीर्वाद घेतला, तर कुणी नातेसंबंधांचा गळा घोटला. हे सगळं करून अनेकांनी विजय ओढून आणला खरा. पण रोज ज्यांच्यासोबत उठबस करायची, ज्या समाजासाठी आपल्याला राजकारण केलं जातं; त्याच समाजाचा भाग असलेल्या एका घटकाला असुरी वेदना देऊन मिळवलेला हा विजय खरोखर गावाच्या विकासासाठी पोषक असेल का, हा मोठा प्रश्न आहे.

कोरोना काळात मुदत संपलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर काही गामपंचायतीमधील काही सदस्यांची बिनविरोध निवड झाली. 12 हजार 776 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी उडाली. राज्यात 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध निवडून आले. एकूण एक लाख 25 हजार 709 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या रिंगणात दोन लाख 15 उमेदवार उतरले होते. 46 हजार 921 प्रभागांमध्ये ही निवडणूक झाली.

ही आकडेवारी देण्याचे कारण असे की या निवडणुकांच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र गुलालात न्हाऊन निघाला. हलगी, डीजे, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पाळू या गावात विजयी पतीला खांद्यावर घेऊन पत्नीने मिरवणूक काढली. या मिरवणुकीची राज्यात जोरदार चर्चाही झाली. विजयी उमेदवारांचे स्वागत करावे, मिरवणूक करावी यापुढे जाऊन हत्तीवरून साखर वाटावी, एवढी प्रौढी मिरविण्याची ही निवडणूक मानली जाते. हे सगळं व्हावं, पण….

हे सगळं करत असताना जे अपयशी उमेदवार आहेत, त्यांना डिवचणे, त्यांना राग येईल असे जाणीवपूर्वक वर्तन विजयी उमेदवारांचे समर्थक करतात. विजयाच्या उन्मादात आसपासच्या वातावरणाचे गांभीर्य राहत नाही. जे उमेदवार विजयी झाले आहेत, त्यांना गावात काम करताना सर्वांसाठी करायचे असते. जे उमेदवार अपयशी झालेत त्यांच्याही गावाच्या विकासाच्या बाबतीत काही संकल्पना असतील. त्या उमेदवारांकडे जे चांगलं आहे, ते स्वीकारून अपयश मिळालेल्या उमेदवारांना विश्वासात घेऊन त्यांचे आभार मानून हा जल्लोषाचा कार्यक्रम केला जावा, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य गावक-यांची असते. शेवटी गावाचा विकास महत्वाचा असतो.

निवडणूक ही औपचारिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत ज्याला विजय मिळेल त्याने पुढे येऊन गावाचा कायापालट करण्यासाठी झटायचे असते. निवडणुकीत एकाची जीत तर दुस-याची हार हे समीकरण असतेच. जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या गडाला देखील आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुरुंग लागले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यातील येनकूल गावात भाजप समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत. या दिग्गजांच्या पुढे आपली हार-जीत कितीशी असेल, हा विचार सर्वांनी करायला हवा. ही मंडळी निवडणुक निकाल कधीच मनाला लावून घेत नाहीत. उलट पुढील निवडणुकीची संधी शोधून चांगले काम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करतात.

आदर्शगाव हिवरे बाजार येथे मागील 30 वर्षांपासून बिनविरोधात निवडणूक होत होती. या तीन दशकांच्या परंपरेला यंदा ब्रेक लागला असून 30 वर्षानंतर गावात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पोपटराव पवार यांचाच पॅनल विजयी झाला असला तरीही परंपरा खंडित झाली हे यातले विशेष आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना तर अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण त्यांच्या कन्येला गावातल्या लोकांनी निवडणुकीत थेट घरचा रस्ता दाखवला आहे. विकासाचे राजकारण करताना आपापसातील द्वंद्वाला कुठेही थारा नसतो. आपापसातील द्वंद्व गावाच्या शिवेवर टाकून हातात हात घालून काम झाल्यास त्याला विकासाचे राजकारण म्हणता येईल. असे राजकारण राज्यात अपवादानेही सापडणे कठीण आहे.

तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी बसून एखादा नेता गावच्या राजकारणाची दिशा ठरवत असतो. गावक-यांच्या शहाणपणाने सापडली तर 'दिशा' नाहीतर शहरात बसलेल्या या सल्लागारांमुळे गावाची 'दशा' होऊन जाते. ग्रामपंचायत कुठल्याही पक्षीय चिन्हावर लढवता येत नाही, तरीही अमुक पक्ष विजयी झाला. तमुख पक्षाचा दारुण पराभव, असे निकष कसे लावले जातात. कारण गावातलं राजकारण तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल्या पक्षीय नेत्यांच्या तालावर खेळलं जातं. हे तालावर नाचणं सोडलं तर…. हा केवळ विचारच बरा असं म्हणण्याची सध्या वेळ आहे.

ग्रामपंचायतीची असली तरीही निवडणुकच ती. त्यामुळे निवडणुकीचे आर्थिक नियोजन जिथे होते, तिथूनच सत्तेच्या नाड्या एकवटल्या जातात. 100-200 रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत मतांचे भाव केले जातात. आता नाही तर कधीच नाही, असे म्हणून काहीजण कामाला लागतात. त्यात साम, दाम, दंड, भेद ही सगळी अस्त्र-शस्त्र वापरली जातात. एकाच गावात दोन गट तयार होतात आणि मग पुढे ते एकमेकांसमोर येऊन वितुष्ट निर्माण होते. बाहेरच्या व्यक्तीच्या तालावर नाचून गावातील नातेसंबंधांवर थेट पाणी ओतले जाते.

नातेसंबंधांतील व्यक्ती उमेदवार म्हणून असतील तर तोरा काही औरच असतो. तो असायलाच हवा. पण एकाच घरातील दोघेजण उमेदवार असतील तर त्यांच्यात असे विभाजन होते, की ते थेट गाव वाटून घेतात. प्रत्यक्ष जरी शक्य नसले तरीही अनेक निकषांवर मतांची विभागणी, जुळवाजुळव केली जाते. इकडची 5-10 मते फोडा, तिकडची दोन घरं वळवा असे प्रकारही होतात. जिथे काहीच चालत नाही, तिथे 'रुपये'श्वर महाराजांचे दर्शन देऊन मते वळविण्याचा प्रयत्न होतो.

उमेदवार जर लायक असेल, तर या सगळ्याची गरज आहे का ? हा आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर बघताना दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल. काही लोकांना आता 'रुपये'श्वर महाराजांचे दर्शन झाल्याशिवाय, मांसाहार आणि मदिरेच्या डोहात बुडाल्याशिवाय मतदान करू वाटत नाही, एवढी मानसिक पातळी खालावली आहे. तर दुसरीकडे माझ्याकडे पैसे आहेत, तर मी काहीही करू शकतो, हा उमेदवारांमधील अहंकार वाढीस लागल्याने शुद्ध, विकास कामांवर आधारित प्रचारात इतर मुद्द्यांचा समावेश आपसूकच केला जातो.

हे सगळं टाळायचं असेल तर उमेदवार एकमताने निवडला गेला पाहिजे. लोकमत महत्वाचं आहे. जनाधाराशिवाय उमेदवाराला भविष्य नाही. केवळ आर्थिक ताकद असून उपयोग नाही. त्यासाठी गावातील प्रश्नांची जाण, सर्वोत्तमाचा ध्यास असणं फार गरजेचं आहे. विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक व्हायला हवी. हा अमक्याचा तमका म्हणून त्याला मतदान करा, हा भ्रष्टाचार संपत नाही तोपर्यंत हे सगळं अवघड आहे. तोपर्यंत, उमेदवार एवढे सुज्ञ होतील का ? गावच्या विकासाला केंद्रस्थानी ठेऊन निवडणुका प्रत्यक्षात लढल्या जातील का ? सत्तेच्या नाड्या कुठेतरी एकवटणं थांबेल का ? राजकारणासाठी नातेसंबंधांचा कडेलोट करणं थांबेल का ? असे अनेक प्रश्न घेऊन आपण थांबलेलंच बरं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top