Monday, 21 Oct, 10.01 am MPC News

पुणे
Lonavala : मावळ तालुक्यात 71.27 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - अतिशय चुरशीची आणि अटितटीची लढत असलेल्या मावळ तालुक्यात 71.27 टक्के मतदान झाले. मावळ तालुक्यात एकूण 3 लाख 48 हजार 462 मतदार आहेत यापैकी 2 लाख 48 हजार 349 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळपासून गावोगावी उत्स्फूर्तपणे मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडत होते. सकाळच्या पहिल्या दोन तासात मतदानाचा टक्का कमी होता. त्यानंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मतदानात वाढ झाली.

मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज चांगली उघडीप दिल्याने मतदानांचा टक्का काहीसा वाढला आहे.

मावळ तालुक्यातील 370 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. तालुक्यात एक दोन ईव्हीएम मशीनमध्ये झालेले तांत्रिक बिघाड वगळता सर्वत्र शांततेमध्ये मतदान झाले.

मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, आरपीआय या महायुतीचे उमेदवार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेगडे आळीतील कैकाडीवाडा समाज मंदिरातील केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी रिपाई महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी सहकार्याच्या समवेत नथुभाऊ भेगडे शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासात मावळात 6.74 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासात 20.29 टक्के मतदान झाले.

अकरा ते एक या कालावधीत 35.43 टक्के, एक ते तिन दरम्यान 49.98 टक्के तर सायंकाळी पाच पर्यत 63.38 टक्के मतदान झाले होते. पाच ते सहा ह्या एक तासात 8 टक्के मतदानात वाढ होत 71.21 टक्के मतदान झाले.

ग्रामीण भागात नागरिक सकाळपासून केंद्राबाहेर रांगा ल‍ावून मतदानाकरिता उभे असल्याचे पहायला मिळाले. चुरशीची लढत व सायंकाळी पाऊस येण्याची शक्यता पहाता मावळात दुपारपर्यंत मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त नेमला असून शंभर मीटर व दोनशे मीटरच्या अंतराचे काटेकोरपणे पालन सुरु आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाचा टक्केवारी वाढल्याने हा वाढलेला मताचा टक्का कोणाला विजयाचा शिरपेच घालणार हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top