Sunday, 25 Aug, 11.47 am MPC News

तळेगाव
Lonavala : युवकांनी वृक्षारोपण अन् वृक्षसंवर्धनाचा ध्यास घ्यावा - प्रा.संपत गर्जे

एमपीसी न्यूज़ - पर्यावरणाचा बिघडणारा समतोल सावरण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन आवश्यक असून युवकांनी यात मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. संपत गर्जे यांनी व्यक्त केले.

मावळ तालुक्यातील शिवणे येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वामी विवेकानंद संस्थेचे सचिव धनंजय टिळे, पत्रकार प्रदीप वाडेकर, शालेय समिती अध्यक्ष संतोष पडवळ, शिक्षण समिती सदस्य संतोष भिवडे, जालिंदर देशमुख, बाळासाहेब रसाळ, ज्ञानेश्वर शिवणेकर, प्राचार्य योगेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा.गर्जे म्हणाले, वृक्षाचे रोपण करणाऱ्या आणि खंडण करणाऱ्या व्यक्तीला वृक्ष समान सावली देतो. मानवाच्या जन्मापासून ते अंतापर्यंत साथ देणारे खरे सन्मिञ वृक्ष आहेत. वृक्ष हे मानव सेवेचे प्रतिक आहेत. मानवाचा व वृक्षांचा संबंध फार पुरातन काळापासून दृढ आहे. म्हणून 'एक व्यक्ती एक झाड' ही कृतिप्रधान घोषणा प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणात आणली पाहिजे.

वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. वृक्षाशिवाय मानवाचे जीवन अधुरे आहे. पर्यावरणाचा व नैसर्गिक संपत्तीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याने हवामानात बदल, तापमानात वाढ, आनियमित पाऊस, वादळे आदि संकटाना सामोरे जावे लागत आहेस. या सर्व गोष्टींमुळे निसर्ग चक्रात बदल होत आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करावे, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.

प्राचार्य योगेश घोडके यांनी याप्रसंगी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी वृक्षलागवड व संवर्धन करण्याची शपथ दिली. त्यानंतर मोकळ्या माळरानावर शिसव, खैर, आवळा, करंज, चिंच, गुलमोहर इ. प्रकारच्या वृक्षांची लागवड विद्यार्थ्यांनी केली. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. आवटे, प्रा. शिवणेकर, प्रा. सौ. कालेकर, प्रा. आडकर, पूनम रसाळ आदींनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top