Tuesday, 04 Aug, 3.00 pm MPC News

महाराष्ट्र
Maharashtra Politics : 'ठाकरे-पवार' पॅटर्न भाजपसाठी ठरणार डोकेदुखी!

सध्या तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यापेक्षा आपल्या पक्षातील दिग्गजांना सांभाळणे हाच पर्याय भाजपपुढे आहे. शेवटी एकच म्हणता येईल. 'ठाकरे-पवार' पॅटर्न भाजपला डोकेदुखी होणार आहे… वाचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी केलेले राजकीय विश्लेषण!

———————————————————————————-

'ठाकरे-पवार' पॅटर्न भाजपसाठी ठरणार डोकेदुखी!

आगामी सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात 'ठाकरे-पवार' पॅटर्न निर्माण करुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात भाजपपुढे प्रचंड मोठे राजकीय आव्हान उभे ठाकणार असून डोकेदुखी ठरणार आहे. तर, काँग्रेस पक्षाची चिंता वाढणार आहे.

मागील निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' अशी डरकाळी फोडत दोन्ही काँग्रेसला खुले आव्हान दिले. तर, घटक पक्ष असणा-या शिवसेनेला गारद केले. त्यामुळे सबका मालिक एक (देवेंद्र फडणवीस) अशी प्रतिमा निर्माण करण्यात त्यांना यश आले.

राज्यात पवारच कायं, सेना नेतृत्व देखील आपल्या इशाऱ्यावर चालणार, 'आपण बांधेल तेच तोरण आणि पक्षात केवळ फडणवीस हेच धोरण' असे इशारा स्वकीयांना देखील देण्यास फडणवीस यशस्वी ठरले. त्यामुळे 'सगळीकडे, चोहिकडे केवळ फडणवीसांची हवा गडे' असे वातावरण निर्माण केले.

शरद पवार यांचे वाढते वय, अजितदादा पवार यांची सावध भूमिका आणि काँग्रेस पक्षात पडलेले गटतट यामुळे राज्याच्या राजकारभारात गेल्या सहा वर्षांपूर्वी केवळ देवेंद्र असाच नारा होता. फडणवीसांनी विरोधी पक्षाला तर राजकीय भगदाड पाडलेच. शिवाय आपल्या पक्षात प्रतिस्पर्धी असणारे एकनाथराव खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांना घरी बसवले.

त्यामुळे चंद्रकातदादा पाटील सोडले. तर, फडणवीसांच्या समोर पक्षात कोणी बोलण्याची हिंमत करत नव्हते. हे आज पक्षातीलच नव्हे. तर, विरोधी पक्षातील नेते देखील खासगीत बोलताना मान्य करतात. राजकारण तर फडणवीस यांनी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्यासारखे करण्याचा प्रयत्न केला.

त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश देखील आले, मात्र ज्यावेळी पक्षातील दिग्गजांनाच घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हाच त्यांची लोकप्रियता सर्वसामान्य नागरिकांमध्ये घटत चालली. नव्हे तर फडणवीस हे 'हम करे सो कायदा, कोणालाच मिळणार नाही, आपल्या कृपेशिवाय राजकीय फायदा' असे तंत्र अवलंबित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहनजी भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन भाजपा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा असणारा पाठिंबा यामुळे फडणवीस यांच्यापुढे उघड-उघड बोलण्याची हिंमत कोणी करत नव्हते.

एकनाथराव खडसे यांनी उघड भूमिका घेतली. तर, त्यांची उमेदवारी कट केली. सध्या ते शेती करत आहेत. पंकजा मुंडे यांनी 'डरकाळी' फोडली. तर, त्यांचा परळीत दारुण पराभव घडवून आणला, असा आरोप भाजपची मंडळी करीत आहेत. बीडमधील जनसामान्यांमध्ये हीच भावना आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे नितीन गडकरी यांच्याशिवाय कोणाचे ऐकत नव्हते. तर, त्यांची उमेदवारीच कट केली आणि विनोद तावडे मराठा नेतृत्व म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनाही उमेदवारी दिली नाही. हे उभ्या महाराष्ट्राला अवगत आहे.

त्यामुळेच दोन्ही काँग्रेस पक्षातील अनेक 'सरंजामदार' मावळे फडणवीस यांच्या दरबारी हजर होऊन जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देऊ लागले व भाजपमय झाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह भीष्म म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे शरद पवार यांनी फडणवीस संकट आत्ताच थांबले नाही. तर, पुढील 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर करणे अशक्य आहे हे जाणले आणि सेना-भाजप संबंध 'संजयउवाच' यांच्या मध्यस्थीने ताणले. तिथेच फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येणार' या घोषणेला 'ब्रेक' बसला होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भाजपच्या वाढत्या ताकदीची कल्पना देऊन आता खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वधर्म समभावाची भूमिका घेण्याची गरज आहे, असे पवारांनी अवगत केले. त्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि देवेंद्र फडणवीस 'मी पुन्हा येणार नाही' म्हणत विरोधी पक्षनेता झाले. हाच पवारांचा 'मास्टर स्ट्रोक' ठरला आणि 'जय श्रीराम' म्हणत भाजप शांत झाला.

आघाडीत बिघाडीच्या बातम्या अनेक वेळा आल्या. परंतु, पवारांनी वेळोवेळी इंजिनमध्ये योग्य ऑईल टाकून सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भाजपने कितीही ताकद लावली. तरी, राज्यातील आघाडी सरकारमध्ये बिघाडी होणे अशक्य आहे. नव्हे तर काँग्रेसचा भाजप नंबर एक दुश्मन असल्यामुळे आणि 80 टक्के आमदारांना आघाडी सरकार हवे आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात 'लोटस' नव्हे. भाजपाचा भविष्यात कडेलोट करण्यासाठी शरद पवारांनी राज्यात नवा 'ठाकरे-पवार पॅटर्न' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात आघाडीला नव्हे. तर भाजपालाच भगदाड पडल्याशिवाय राहणार नाही.

राज्यात सर्वात मोठी व्होट बँक मराठा आहे. त्यापाठोपाठ 'माधव' पॅटर्न म्हणजेच माळी-धनगर-वंजारी-वाणी होय. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक मराठा समाज आहे. तर, शिवसेनेकडे मराठा अधिक ओबीसी, तर काँग्रेस पक्षाकडे दलित-मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर असून काही नेते स्वत:च्या ताकदीवर निवडून येतात. त्यामुळे भविष्यात भाजपाला 'ठाकरे-पवार' पॅटर्नची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

फडणवीस यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपातील 'माधव' पॅटर्नचे प्रमुख नेते पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर यांच्यासह अनेक दिग्गज प्रचंड नाराज आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपात गेलेले अनेक दिग्गज पुन्हा पक्षात आणण्यासाठी कोरोना संकटानंतर 'मिशन बिगीन अगेन' पवार सुरु करणार आहेत.

त्यामुळे भविष्यात भाजपाला आपल्या पक्षात आयात केलेले. राजे-महाराजे, सरदार, सरंजामदार, मावळे यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी सरकार पाडण्यापेक्षा आपल्या पक्षातील दिग्गजांना सांभाळणे हाच पर्याय भाजपपुढे आहे. शेवटी एकच म्हणता येईल. 'ठाकरे-पवार' पॅटर्न भाजपला डोकेदुखी होणार आहे.

काँग्रेसची चिंता वाढणार

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष आहेत, तर काँग्रेस सर्वांत जुना आणि राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्र राज्य कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होते, पण पवारांनी काँग्रेसची साथ सोडून स्वत:चा पक्ष निर्माण केल्यानंतर काँग्रेसची एकहाती सत्ता आली नाही. त्यांनी राष्ट्रवादीसोबत 15 वर्ष राज्य केले. आज महाविकास आघाडीत काँग्रेस तिस-या क्रमाकांचा पक्ष आहे. शिवसेनेकडे सरकारचे नेतृत्व तर राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती आहेत. या दोन पक्षांचे गुळपिट चांगलेच जुळलेय. भविष्यात होऊ घातलेला 'ठाकरे-पवार' पॅटर्न काँग्रेसचीही चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे सरकारमध्ये राहून राज्यात आपली ताकद वाढविण्याचे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे.

- गोविंद घोळवे

जेष्ठ पत्रकार तथा मा. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top