Thursday, 27 Jun, 1.07 am MPC News

होम पेज
MpcNews Exclusive : लग्न आणि ईद साजरी करण्यासाठी चिखली येथून गावी गेलेल्या 'तबरेज'ची सामूहिक हत्या

(हृषीकेश तपशाळकर व श्रीपाद शिंदे )

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळी श्रमाची कामे करून आपले पोट भरणारा तबरेज स्वतःच्या लग्नासाठी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झारखंड येथील आपल्या गावी गेला. लग्नानंतर पत्नीसह तो पुन्हा पुण्याला परतणार होता. दरम्यान, ईद आल्याने ईदचा सण साजरा करूनच कामासाठी जायचे ठरले. पुण्याला जाण्यापूर्वी नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या तबरेजची 'सामूहिक हत्या' (मॉब लिंचिंग) झाली. चोर समजून त्याच्यावर एका गावातील लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तबरेज मागील सात ते आठ वर्षांपासून चिखली येथे वास्तव्याला होता.

काळीज हादरवून टाकणारी घटना झारखंड मधील धतकीडीह गावात 18 जून रोजी घडली. गावातील नागरिकांनी चोर समजून एका तरुणाला बेदम मारहाण केली. घटनेत मृत्यू झालेल्या तबरेजचे पालनकर्ता आणि चुलते 'मकसुर आलम' यांनी त्या घटनेची थरारक आठवण सांगितली. 'तबरेज अन्सारी'चे सामूहिक हत्या प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'एमपीसी न्यूज'च्या प्रतिनिधीने तबरेजच्या झारखंड येथील परिवाराशी याप्रकरणी चर्चा केली.

कदमडिहा, जिल्हा - सरायकेला-खरसांवा, राज्य - झारखंड येथील मयत तबरेज अन्सारी हा तरुण पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे फॅब्रिकेशनच्या कारखान्यात वेल्डर म्हणून काम करत होता. त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तबरेजचे पालनपोषण त्याचे चुलते मकसुर आलम यांनी केले.

मकसूर आलम सांगतात, 'तबरेज मागील सात ते आठ वर्षांपासून पुण्यात काम करतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळेल ती श्रमाची कामे करून तो त्याचा उदरनिर्वाह करीत असे. कधी गरज पडल्यास गावी देखील पैसे पाठवत असे. २४ एप्रिल रोजी त्याचे लग्न होते. त्यासाठी तो एप्रिल महिन्यात गावी आला. त्याचा 'शाईस्ता परवीन' या तरुणीशी त्याचा विवाह झाला. लग्नानंतर तबरेज कामासाठी पुण्याला परत जाणार होता. जाताना तो त्याच्या पत्नीला देखील सोबत घेऊन जाणार होता. कारण त्याच्या घरी केवळ त्याची पत्नी एकटीच होती.

तबरेजच्या आई-वडिलांविषयी सांगताना मकसूर म्हणाले, 'तबरेजच्या वडिलांचा २००७ साली मृत्यू झाला. त्यांचा खून झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर तबरेजच्या आईचे देखील निधन झाले. त्यामुळे तबरेज एकटा होता. तबरेज लहान असल्याने त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी माझ्यावर आली. मी त्याचा माझ्यापरीने सांभाळ केला. शिक्षण झाल्यानंतर तो पुणे शहरात कामासाठी गेला'

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात त्याने अनेक ठिकाणी काम केले. मागील सात ते आठ वर्षांपासून तो पुण्यात काम करत आहे. दरम्यान, त्याचा विवाह ठरला. विवाहासाठी तबरेज एप्रिल महिन्यात गावी आला. २४ एप्रिल रोजी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर तबरेज आणि त्याची पत्नी शाईस्ता दोघेही खूप आनंदी होते. काही दिवस गावी संसार केला. त्यानंतर रोजीरोटीसाठी तबरेजने पुन्हा पुण्याला जाण्याचे ठरवले होते. पण यावेळी पुण्याला जाताना तो शाईस्ताला देखील सोबत घेऊन जाणार होता.

मकसूर सांगतात, 'लग्नानंतर ईद चा सण आला. त्यामुळे तबरेजने गावीच ईद साजरी करण्याचे ठरवले. तबरेज, शाईस्ता, त्याचे चुलते आणि त्यांचे कुटुंबाने मिळून शाईस्ताची पहिली ईद साजरी केली. पहिली ईद साजरी करताना शाईस्ता खूप आनंदी होती, मकसूर सांगतात. त्यातच ती तिच्या पतीसोबत पुण्याला जाणार होती. तिथे दोघेजण मिळून नवा संसार सुरु करणार होते. यामुळे तिचा आनंद दुप्पट वाढला होता.

ईदचा सण झाल्यानंतर तबरेजने २२ जूनच्या आसपास पुण्याला जाण्याची तारीख निश्चित केली. त्यानुसार घरात तयारी सुरु झाली. कपडे, लागणारे साहित्य आणि अन्य गोष्टींची गडबड सुरु होती. एकदा पुण्याला गेल्यानंतर खूप दिवस गावी जाता येत नाही. म्हणून तबरेजने त्याच्या जमशेदपूर येथे राहणा-या आत्याला भेटून यायचे ठरवले. शाईस्ताला सांगून तबरेज त्याच्या नुमेर अली आणि इरफान शेख या दोन मित्रांसोबत जमशेदपूरला गेला.

आत्याला भेटून परत घरी येत असताना १८ जून रोजी रात्री ते तिघे धतकीडीह गावात आले. तबरेज धतकीडीह गावात येण्यापूर्वी गावात चोर आल्याची चर्चा सुरु होती. गावातील कमल महतो यांच्या घरासमोर गावातील नागरिकांनी तबरेजला पकडले. त्यावेळी त्याचे दोन्ही मित्र घाबरून पळून गेले. गावक-यांनी 'कमल महतो' यांच्या घरची दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय घेत तबरेजला बेदम मारहाण केली.

या मारहाणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडिओमध्ये गावातील एकजण तबरेजला काठीने मारत आहे. गावातील नागरिक केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत. तबरेज खाली बसला आहे. तो बचावासाठी विनवणी करत आहे. मात्र गावातील नागरिक काठी तुटेपर्यंत त्याला मारत आहेत. दुस-या व्हिडिओमध्ये तबरेजला विजेच्या खांबाला बांधले आहे. गावातील नागरिक त्याला बेदम मारहाण करत आहेत. तबरेज विवश होऊन बचावासाठी याचना करत आहे, ही आठवण सांगताना मकसूर यांचा कंठ दाटून आला.

हा प्रकार १८ जूनच्या मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास घडला. पोलिसांनी माहिती मिळताच खरसांवा पोलीस घटनास्थळी पहाटे पाचच्या सुमारास दाखल झाले. गावक-यांच्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांनी तबरेज याला चोरीच्या संशयाखाली ताब्यात घेतले. तबरेजला पोलिसांनी जेलमध्ये ठेवले. त्यापूर्वी तबरेजने त्याच्या पत्नीला फोन केला. 'शाईस्ता बचा लो मुझे, ये लोग मुझे मार डालेंगे' एवढेच बोल शाईस्ताच्या लक्षात आहेत.

फोनवर कापरं भरलेला आवाज ऐकून शाईस्ताच्या पायाखालची जमीन सरकली. अवघा एक महिन्याचा संसार झाला आणि पतीवर एवढे मोठे संकट आले. तिने तबरेजच्या सुटकेसाठी त्याला भेटण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरायकेला जेलमध्ये असताना २२ जून रोजी तबरेजची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली. पोलिसांनी त्याला 'सदर रुग्णालयात' दाखल केले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता. घरच्यांच्या आग्रहाखातर पोलिसांनी तबरेजला जमशेदपूर येथील 'टाटा मुख्य रुग्णालयात' येथे दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

केवळ चोर असल्याच्या संशयावरून त्याला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत खरसांवा पोलीस ठाण्यात धतकीडीह गावातील शंभर लोकांवर गुन्हा नोंदवला. काही लोकांना अटकही झाली. पण तबरेज याचा जीव यामुळे परत येणार नाही. असे असले तरी गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी मकसूर करत आहेत.

घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनेची दखल घेत खरसांवा थानेदार चंद्रमोहन उरांव आणि थाना प्रभारी विपिन बिहारी सिंह यांना निलंबित केले आहे. या घटनेचा तपास 'एसआयटी'कडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा उल्लेख करत दोषींना कठोर शासन व्हायला हवे, असे सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top