Tuesday, 17 Sep, 8.48 am MPC News

टॉप न्यूज
Nigdi : राष्ट्रध्वजाच्या चालन, देखभालीकरिता आठ महिन्यांसाठी 35 लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे चालन आणि देखभाल दुरूस्तीचे काम ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे. साडेचार वर्षे कालावधीसाठी देण्यात येणारे हे काम सध्या प्रायोगिक तत्वावर आठ महिने कालावधीसाठी ठेकेदाराला देण्यात येणार आहे. त्यासाठी 35 लाख रूपये खर्च होणार आहेत. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या वतीने देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात आला आहे. मुंबईहून निगडी येथे उद्योगनगरीत प्रवेश करतानाच 90 बाय 60 आकाराचा हा राष्ट्रध्वज नजरेस पडतो. पावसाळा ऋतु व्यतिरिक्त आठ महिने हा राष्ट्रध्वज फडकविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या राष्ट्रध्वजाचे चालन आणि देखभाल दुरूस्तीचे तसेच इतर अनुषांगिक यंत्रणेच्या चालन आणि देखभालीचे काम ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे.

या कामामध्ये जनित्र संच, सर्व प्रकारच्या लाईट, राष्ट्रध्वज चढविणे आणि उतरविणे याकरिता लागणा-या मनुष्यबळाचा 24 तास पुरवठा करणे तसेच नवीन तीन राष्ट्रध्वज उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. साडेचार वर्षे कालावधीच्या या कामासाठी महापालिकेने 2 कोटी 5 लाख रूपये दर अपेक्षित धरला होता. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यापैकी फिलविक्स हॉबी सोसायटी यांनी निविदा दरापेक्षा सुधारीत दर 25 टक्के कमी सादर केला. हे काम विशेष प्रकारचे तसेच देशहिताचे संवेदनशील असल्याने त्यांना प्रायोगिक तत्वावर आठ महिन्याच्या कालावधीकरिता हे काम देण्यात येणार आहे.

त्यासाठी 46 लाख 85 हजार रूपये या रकमेवर 25 टक्के कमी म्हणजेच 35 लाख 14 हजार रूपये या सुधारीत दराने काम करून घेण्यात येणार आहे. महापालिका विद्युत विभागाचे सहशहर अभियंता यांनी 9 सप्टेंबर रोजी निविदा स्वीकृत करण्यास मान्यता दिली आहे.

.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top