Wednesday, 04 Sep, 3.00 am MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri : भोसरीतील उड्डाणपुलाखालील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते 'अर्बन स्ट्रीट डिझाईन'नुसार विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पादचा-यांना पदपथावरुन चालणे सुलभ होणार आहे. नियोजनबद्ध वाहनतळ, शहर, एसटीबस थांबे, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र नियोजनबद्ध आराखडा केला जाणार आहे. त्यामुळे पुलाखालील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. याबाबतची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने महापालिकेमार्फत या रस्त्यास शितलबाग ते धावडेवस्ती पर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलामुळे वाहतूक कोंडी सुटले अशी अपेक्षा होती. तथापि, भोसरी गावठाणातील वाहतूक सेवेचा थांबा, आळंदीकडे, दिघीकडे जाणारा रस्ता, विविध व्यावसायिक, एसटी बसचा थांबा, खासगी वाहने यामुळे पुलाखालील वाहतूक कोंडी कमी झाली नाही.

उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग, पथारीवाले, हातगाड्या, व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. फुटपाथवर व्यावसायिक, पथारी, हातगाड्यांनी अतिक्रमण केले असल्याने पादचा-यांना चालणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या वाढीस लागत आहे.

पुलाखाली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिका-यांना दिले होते. त्यानुसार आता या भागातील पादचा-यांचा, नागरिकांच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहेत.

महापालिका हद्दीतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचा वेग पाहता रस्त्यावर पादचा-यांचा वापर अधिक असल्याने अशा ठिकाणी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता वाढते. याबाबींचा विचार करता हे रस्ते पादचा-यांची सुरक्षितता विचारात घेऊन 'अर्बन स्ट्रीट डिझाईन'नुसार विकसित केल्यास अपघातांची संख्या कमी होणार आहे. तसेच पादचा-यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. या कामाची निविदा लवकरच उघडण्यात येणार आहे.

असे होणार फायदे :
पदपथ समपातळीत व विनाअडथळा असल्याने शहरातील सर्व घटकांसाठी सुरक्षित
विशेषत: लहान मुले, दिव्यांग व वयोवृद्धांसाठी सुरक्षित
नागरिकांसाठी सार्वजनिक बैठक व्यवस्था असल्याने आनंदमयी वातावरण
वाहन व्यवस्था, स्थानिक व शहराशी जोडणारी सुलभा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे कमीत कमी वायू, ध्वनी प्रदूषण.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top