Wednesday, 20 Nov, 8.09 am MPC News

होम पेज
Pimpri : एटीएमच्या सुरक्षेबाबत बँकांचे हात वर; पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

(श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज - अलीकडच्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. या घटनांमधील आरोपींना पकडण्यात काही प्रमाणात यश येत आहे. तर अनेक प्रकरणांमधील चोरटे अद्याप मोकाट आहेत. सबळ पुरावे, घटनेची बँकांकडून मिळणारी माहिती, बँकांचा कामापुरता पाठपुरावा, ढिसाळ सुरक्षा व्यवस्था यामुळे 'एटीएम'ची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. एटीएमचे संपूर्ण व्यवस्थापन एखाद्या त्रयस्थ कंपनीला दिलेले असल्यामुळे बँका एटीएमच्या सुरक्षेबाबत सरळ हात वर करतात. तर एटीएमचा विमा असल्याने त्रयस्थ कंपन्या देखील विमा मिळण्यापुरताच कायदेशीर पाठपुरावा करतात. एकदा विम्याचे पैसे मिळाल्यानंतर एटीएमशी ना बँकांना देणंघेणं असतं, ना त्रयस्थ कंपन्यांना. पण नागरिकांना नाहक त्रास आणि पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढतच जाते.

नोव्हेंबर महिन्यात चिखली, चाकण, देहूरोड, हिंजवडी परिसरात एटीएम फोडण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. नेरे दत्तवाडी येथील आयएमएस कॉलेज समोर असलेल्या सूर्योदय बँकेच्या एटीएमची चोरट्यांनी तोडफोड केली. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकला. मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फसला. त्यानंतर दोन दिवसात देहूगावातील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन मधून 91 हजार 300 रुपये चोरून नेले. हा प्रकार 2 नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. 2 नोव्हेंबर रोजी एका सफाई कर्मचा-याला एटीएम फोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या सफाई कर्मचा-याने पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत बँकेने घटनेची माहिती पोलिसांना देण्याची तसदी घेतली नाही.

चाकणमधील चंदश्री कॉम्प्लेक्स येथे कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेली एचडीएफसी बँकेची एटीएम मशीनच चोरून नेल्याची घटना 3 नोव्हेंबर रोजी समोर आली. स्कॉर्पिओ कार मधून आलेल्या चोरट्यांनी यामध्ये 18 लाख 98 हजार 700 रुपयांचा माल पळवला. याचीही माहिती मिळण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणा-या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली. चोरटे चोरी करत असताना मशीनचा अलार्म वाजला. याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयात समजली. कार्यालयातून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. माहिती मिळताच सतर्क पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून चोरट्यांना अटक केली. या एका घटनेत पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्याने आरोपी पकडण्यात यश आले.

चिखली येथे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून सुमारे 11 लाख रुपयांची रोकड पळवल्याची घटना 11 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. घटना घडल्यानंतर दीड दिवसांनी याची पोलिसांना माहिती मिळाली. एटीएममधून किती रक्कम गेली याचा आकडा मिळण्यासाठी बँक प्रशासनाला तब्बल दोन दिवसांचा कालावधी लागला.

चिखली हद्दीत तळवडे येथे 19 नोव्हेंबर रोजी चिखली पोलीस गस्त घालत असताना एटीएम फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पहाटेच्या वेळी एटीएमचे शटर बंद असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी शटर उघडून बघितल्यानंतर एटीएम गॅस कटरने कापल्याचे निदर्शनास आले. ही घटना घडून तब्बल एक महिना उलटला. पण याची माहिती पोलिसांना देणे बँकेने कर्तव्य समजले नाही. आमची रक्कम चोरीला गेली नाही. त्यामुळे विम्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून पोलिसांना सांगितले नाही, असे अजब उत्तर बँकेकडून देण्यात आले.

बँकेकडून येणारी अजब उत्तरे आणि ढिसाळपणा पोलिसांना चांगलाच भोवत आहे. पोलिसांकडून बँकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. चाकणमध्ये झालेल्या एटीएम चोरीच्या प्रयत्नात एटीएम केवळ एका फरशीवर बोल्ट लावून बसवले होते. त्यामुळे चोरट्यांना ते उचलून न्यायला सोपे झाले होते. पण चोरट्यांचा तो प्रयत्न फसला. अनुचित प्रकार घडल्यास एटीएममध्ये लावलेला अलार्म वाजायला हवा. त्याचा मेसेज संबंधित अधिकारी, पोलिसांना मिळायला हवा. यामुळे तात्काळ उपाय करणे शक्य होते. जवळपास सर्वच बँकांनी सुरक्षा रक्षक ठेवणेच बंद केले आहे. एखाद्या एटीएम बाहेर एखादा सुरक्षा रक्षक असलाच तर तो अतिशय वृद्ध नागरिक, अपंग असतो. यामुळे धोका वाढतो. चोरीच्या गुन्ह्यासह आणखी एखादा गुन्हा होण्याची शक्यता वाढते.

एटीएमची माहिती पोलिसांना दिली जात नाही. पोलीस गस्त घालतात तेंव्हा एटीएम फोडण्याचे प्रकार उघडकीस येतात. चिखली, तळवडे ही त्याची उदाहरणे आहेत. काही एटीएममध्ये कॅमेरे नावालाच असतात. एखादी घटना घडल्यास त्यामध्ये घटना कैद होते. पण चेहेरा तसेच आवश्यक असणा-या मूलभूत बाबी देखील स्पष्ट होत नाहीत. पैसे वाचविण्यासाठी हलक्या दर्जाचे कॅमेरे बसवले जातात. चिखली येथील घटनेत तक्रार करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केली. दिवसभर चिखली पोलीस संबंधितांना फोन करत होते. मात्र, संबंधितांनी पद्धतशीर टाळाटाळ केली.

बँका जबाबदारी घेतच नाहीत. एखाद्या संस्थेला काम दिले जाते. ती संस्था बघून घेईल अशी भूमिका बँक घेते. विमा काढला असल्याने केवळ विमा मंजूर होण्यासाठी आवश्यक असणारीच कायदेशीर फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाते. यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ होत आहे.

एटीएमच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी बँकांना दिलेल्या सूचना -

# एटीएम मशीन पक्के काँक्रीट करून बसवावे
# एटीएम मध्ये अलार्म बसवावा
# प्रत्येक एटीएमला सुदृढ सुरक्षा रक्षक असावा
# एटीएम ची माहिती पोलिसांना द्यावी
# अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
# अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी

जोपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही तोपर्यंत एटीएमची सुरक्षा रामभरोसे असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top