Tuesday, 04 Aug, 7.59 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri: जिम चालू करण्यास परवानगी द्या, भाडे माफ करा; जिम चालकांचे भर पावसात आंदोलन

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रसार रोख्ण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून बंद असलेल्या जिम अनलॉकमध्ये पुन्हा चालू करण्याची परवानगी द्यावी, जिमचे भाडे माफ करावे, या मागण्यांसाठी जिम चालकांनी आज (मंगळवारी) भर पावसात आंदोलन केले. 5 ऑगस्टपासून जिम चालू करण्यास परवानगी द्यावी; अन्यथा आम्ही आमचा व्यवसाय चालू करु, असा इशारा या चालकांनी दिला आहे.

महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनमार्फत आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात देखील जिम चालकांनी भर पावसात आंदोलन केले.

संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत जाधव, सहसचिव राजेश इरले, हेमंत बागल, प्रसिद्धीप्रमुख कैलास मोरे, गिरिष जैन यांच्यासोबत सर्व जिम ट्रेनर उपस्थित होते.

'व्यायाम करा, कोरोनाशी लढाईची प्रतिकारशक्ती वाढवा', 'व्यायाम कराल तरच फिट इंडिया बनवाल', 'व्यायाम शाळा वाचवा, देश वाचवा' असे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते.

जिम लवकरात लवकर चालू कराव्यात. जिमचे भाडे माफ करावे यासाठी आंदोलन केल्याचे संघटनेचे सरचिटणीस जाधव यांनी सांगितले.

त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची भेट घेऊन जिम चालू करण्यास परवानगी देण्याती विनंती केली. तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जिम चालू करण्याबाबत निवेदन दिले.

पाच महिन्यांपासून जिम व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. महाराष्ट्रातील 15 हजार जिम चालक, मालक, ट्रेनर, हाउसकीपिंग स्टाफ, योगा, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशेन दुकानाचे मालक, त्यांचे कर्मचारी, कंपनीचे कामगार, व्यायाम शाळा साहित्य बनवणारे कामगारासंह अनेक पुरक व्यावसायातील कामगार हे पाच महिन्यांपासून बेरोजगार आहेत.

त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिम व्यावसायिकांना लाखो रुपयांचे थकित भाडे, कर्मचारी पगार, वीज बिल आणि मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे.

गेली अडिच महिने व्यावसायिकांनी संयमाने नियमांचे पालन करुन सरकारला सहकार्य केले आहे. परंतु, अनलॉक तीनमध्ये सुद्धा आमची निराशा झाली आहे.

5 ऑगस्टपासून जिम चालू करण्यास परवानगी द्यावी; अन्यथा आम्ही जिम व्यावसाय चालू करु, त्यातून कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल, असे संघटनेचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top