Monday, 13 Jul, 12.59 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri: लॉकडाऊन कालावधीत पोलिसांनी नागरिकांबरोबर उदारमतवादी राहावे- प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज- कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार आज (दि.13) मध्यरात्रीपासून पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. या लॉकडाऊन कालावधीत पोलिसांनी नागरिकांबरोबर उदारमतवादी राहावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी केली आहे.

नाईक यांनी याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर व पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे दिले आहे.

या निवेदनात प्रदीप नाईक यांनी असे म्हटले आहे की, दहा दिवसांच्या या लॉकडाऊन कालावधीत पोलिसांनी कडक कायदे, लाठीचार्ज न करता सर्वसामान्य जनता व नोकरवर्ग यांच्याशी उदारमतवादी धोरणाने वागावे. नागरिकांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नये.

सर्वसामान्य जनतेच्या दुचाकी व चारचाकी गाड्या जप्त करू नये तसेच त्यांच्यावर कायद्याचा धाक दाखवून अन्याय करू नये तसेच त्यांच्यावर खोटे खटले भरू नये.

प्रदीप नाईक या निवेदनात पुढे म्हणतात, कामगारांना बसने प्रवास करण्याची सक्ती करण्यात आली असताना ज्यांच्या कंपनीपर्यंत बस सेवा उपलब्ध नाही त्यांना स्वत:ची खासगी वाहने वापरण्याची परवानगी देण्यात यावी.

या कालावधीत बॅचलर व वयोवृद्ध लोकांचे तसेच ज्यांची जेवणाची व्यवस्था नाही त्यांचे जेवणाचे हाल होणार आहेत अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top