Tuesday, 24 Nov, 10.48 am MPC News

टॉप न्यूज
Pimpri news: प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई; राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवाराला इशारा

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत अपक्ष नशीब आजमावत असलेल्या चिंचवडमधील महिला उमेदवार प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अनधिकृतपणे फोटो वापरत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नुकसान व्हावे, यासाठी मुद्दामून त्या असे करत असल्याचा आक्षेप घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो प्रचारात वापरू नये, अन्यथा राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी संबंधित अपक्ष उमेदवाराला दिला आहे.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्या असलेल्या चिंचवड मधील एका महिला उमेदवाराने बंडखोरी केली आहे. त्यांचा अर्ज भरायला आमदार बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हजर होते. यावरून पक्षात मोठी नाराजी आहे.

या अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या फोटोचा प्रचारात वापर करत आहेत.

त्यांच्या नावाचा अनधिकृतपणे वापर केला जात आहे. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला नुकसान व्हावे. यासाठी आपण मुद्दामहुन बेकायदेशीररित्या नेत्यांचे फोटो आणि प्रचार साहित्यातील राजकीय व्यक्तींचे मार्गदर्शन या सदराखाली वेगवेगळे छायाचित्र वापरत आहात. त्यामुळे बेकायदेशीर केलेल्या बाबींचा प्रचार साहित्य म्हणून उपयोग करू नये. अन्यथा आपल्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपक्ष उमेदवाराला नोटीसद्वारे दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top