Monday, 20 Jan, 8.00 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri: सत्ताधा-यांना सभा संचलन जमेना!; मतभेदामुळे गोंधळात भर, 'व्हीप'च्या उल्लंघनाची नामुष्की

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गोंधळात गोंधळ सुरु आहे. सत्तेला तीन वर्ष होवूनही सभासंचलन करता येत नाही अशी परिस्थिती आहे. सत्ताधा-यांमधील मतभेद, एक वाक्यतेचा अभाव, सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेत वावर मात्र सभागृहातील गैरहजेरी याचा पुरेपूर फायदा आज राष्ट्रवादीने घेतला. राष्ट्रवादीने कोंडीत पकडल्याने सत्ताधा-यांवर दोन विषयाच्या 'व्हिप'चे उल्लंघन करण्याची नामुष्की ओढाविली. विषयाला अगोदर मंजुरी दिल्यानंतर चर्चा करण्याची नवीन प्रथा सत्ताधा-यांनी सुरु केली आहे. दरम्यान, सभागृह नेते एकनाथ पवार महासभेला गैरहजर होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (सोमवारी) पार पडली. नवीन महापौर उषा ढोरे यांची आजची दुसरी सभा होती. पहिली सभा गोंधळात पार पडल्यानंतर आजची सभाही नियमांचे, पक्षादेशाचे उल्लंघन करतच पार पडली. सभेची वेळ दुपारी दोन वाजताची होती. परंतु, सभा कामकाजाची वेळ झाली. तरी, सत्ताधारी आयत्यावेळच्या (वन-के) खालच्या विषयांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांची स्वाक्षरी घेण्यात दंग होते.

सत्ताधा-यांनी पंतप्रधान आवास योजना, पाणीपुरवठ्याच्या विषय आयत्यावेळी दाखल करुन घेतले. आणखीन एक प्रस्ताव आयत्यावेळी दाखल करुन घेण्याचा इरादा असलेल्या सत्ताधा-यांना आयुक्तांनी त्यात दुरुस्ती सुचविली. सव्वा दोन वाजल्या तरी सभाकामकाज सुरु होत नसल्याने राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेतला. सभा होणार आहे की नाही? असा सवाल कदम यांनी करताच महापौर ढोरे आसणावर बसल्या आणि सभा कामकाजाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच आज आक्रमक भुमिका घेतली.

महासभेच्या अगोदर भाजपची पार्टी मिटिंग होते. त्यामध्ये विषयपत्रिकेवरील विषयांवर सविस्तर चर्चा होते. कोणते विषय मंजूर करायचे? कोणते तहकूब करायचे? हे ठरते. त्यानंतर सभागृह नेते पक्षाच्या नगरसेवकांना विषय मंजुरीचा पक्षादेश जारी करतात. परंतु, स्वपक्षाच्या नगरसेवकांना कोणतीही पूर्वकल्पना नसताना पंतप्रधान आवास योजना, पाणीपुरवठ्याच्या 50 कोटीचा विषय आयत्यावेळी दाखल करुन घेण्यात आला.

गोंधळाला पहिल्याच खासगी वाटाघाटीच्या विषयावरुन सुरुवात झाली. भाजपचे सागर अंगोळकर यांनी खासगी वाटाघाटीचा विषय तीन महिने तहकूब करण्यास महापौरांना सांगितले. परंतु, त्याला कोणाचे अनुमोदन न घेताच त्यांनी तीन महिने तहकूब करण्याची सूचना केल्याने त्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हारकत घेतली. त्यानंतर भाजपच्या अंबरनाथ कांबळे यांनी अनुमोदन दिल्यानंतर महापौरांनी हा विषय तीन महिने तहकूब केल्याचे जाहीर केले. परंतु, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विषय मंजुरीचा आग्रह केला. विषय तहकूब केल्यानंतर देखील महापौरांनी नगरसेवकांना त्या विषयावर बोलू दिले.

विषयपत्रिकेवरील चौथ्या क्रमांकाचा समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्याकडे दिव्यांग बांधवांचे विषय हातळण्याचे जबाबदारी सोपविण्याचा विषय विधी समितीने फेर सादर करावा असा सभागृह नेत्याचा पक्षादेश होता. परंतु, महापौरांनी तो विषय मंजूर केला. त्यानंतर स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी हा विषय मागे घ्यायचा होता असे सांगितले. परंतु, विषय अगोदरच मंजूर झाला होता.

सत्ताधा-यांमधील मतभेदामुळे घोळ सुरु असल्याचे विरोधातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हेरले आणि सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्रमक भुमिका घेतली. विविध आयुधे वापरुन सत्ताधा-यांची कोंडी सुरु केली. त्यात भाजपचे अनेक नगरसेवक महापालिकेत होते मात्र सभागृहात नव्हते. आयत्यावेळी दाखल केलेला पंतप्रधान आवास योजनेचा विषय भाजपच्या काही नगरसेवकांनी मंजूर करण्याचा आग्रह केला.

तथापि, राष्ट्रवादीच्या साने यांनी त्याला हारकत घेतली. विषयाला आमचा विरोध नाही. एवढी घाई करण्याची गरज नाही. सर्वांना तो विषय व्यवस्थित समजला पाहिजे. आयुक्तांचा आयत्यावेळीचा विषय मंजूर करण्याचा आग्रह कशासाठी आहे?, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे विरोधकांपुढे हतबल झालेल्या सत्ताधा-यांवर मंजुरीचा 'व्हीप' असूनही हा विषय तहकूब करण्याची नामुष्की ओढाविली.

जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी 50 कोटीच्या खर्चाला मंजूरी देण्याच्या विषयाची सत्ताधारी भाजप नगरसेवकांना कोणतीही पुर्वकल्पना नव्हती. त्याबाबतचा तहकूब किंवा मंजुरीचा व्हीप देखील भाजप नगरसेवकांना नव्हता. मात्र, पाणीपुरवठ्याचा विषय असल्याने राष्ट्रवादीने माघार घेत, कोणतीही हारकत घेतली नाही. महापौरांनी विषय मंजूर केला. यावेळी देखील विषय मंजुरीनंतर महापौरांनी नगरसेवकांना बोलून दिले.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे हल्ले सत्ताधा-यांना परतविता आले नाहीत. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भाजपमधून हकालपट्टी केलेल्या सीमा सावळे यांनी विरोधकांच्या हल्ल्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृह नेते एकनाथ पवार महासभेला गैरहजर होते. त्यांच्या अनुउपस्थित सत्ताधा-यांवर दोन 'व्हिप'चे उल्लंघन करण्याची नामुष्की ओढाविली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top