Thursday, 07 Nov, 8.04 am MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri : स्थायी समितीने तीन महिन्यातच बदलला निर्णय, पवना जलवाहिनीचे पाईप गोळा करण्यासाठी निविदा प्रक्रिया

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने तीन महिन्यातच आपला निर्णय बदलला आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीचे मावळ तालुक्यातील लोखंडी पाईप गोळा करण्याचा जलसंपदा विभागाला 80 लाखात दिलेल्या कामाचा प्रस्ताव खर्चाचे कारण पुढे करत स्थायी समितीने रद्द केला आहे. यासाठी आता निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परिणामी, या कामाला विलंब होणार असून स्थायीला तीन महिन्यानंतर बचतीचा साक्षात्कार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेचा राज्य सरकारच्या जलसंपदा विभागावर भरोसा नाही काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे निगडी येथील सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाणी आणण्याची योजना मे 2008 मध्ये आखली. 35 किलोमीटर अंतराच्या या योजनेचा मूळ खर्च 234 कोटी होता. जादा दराची निविदा, प्रत्यक्ष काम सुरू होण्यास झालेला विलंब यामुळे हा आकडा 398 कोटीवर पोहोचला.

महापालिकेने पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे सेक्टर क्रमांक 23 जलशुद्धीकरण केंद्र निगडीपर्यंत पाणी आणण्यासाठी थेट पाईपलाईन टाकणे या कामासाठी एनसीसी - एसएमसी - इंदू (जेव्ही) या ठेकेदाराला 30 एप्रिल 2008 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. या कामाअंतर्गत ठेकेदाराने मावळातील कामशेत, कान्हेफाटा, बोऱ्हाडे वस्ती, वडगाव-मावळ, ब्राह्मणवाडी, किवळे आणि गहुंजे या भागात ठिकठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी पाईप आणून ठेवले होते.

या प्रकल्पाला मावळातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रकल्पाविरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या आंदोलनावेळी गोळीबारात तीन शेतक-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे 10 ऑगस्ट 2011 रोजी परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी काम बंद करण्यात आले. काम पुन्हा चालू करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.

25 मार्च 2019 रोजीच्या पत्राद्वारे ठेकेदाराने कामाचे 'टर्मिनेशन' करण्याबाबत नोटीस दिली. मावळातील कामशेत, कान्हेफाटा, बो-हाडेवस्ती, वडगाव, मावळ, ब्राम्हणवाडी, किवळे आणि गहुंजे या भागात ठेवलेले लोखंडी पाईप चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात स्थलांतरित करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. परंतु, या ठिकाणी वनीकरण झाले असल्याने पाईपचे स्थलांतर चिखली येथे करणे शक्‍य होणार नाही. सद्यस्थितीत रावेत येथे सरकारी गायरान असून त्याचे क्षेत्रफळ अंदाजे सात ते आठ हेक्‍टर आहे. परंतु, हे गायरान महापालिकेच्या ताब्यात नाही. त्यासाठी पुणे जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

मावळातील पाईप रावेत येथे आणण्याचे काम दापोडी येथील जलसंपदा विभागाला थेट पद्धतीने देण्यात आले होते. त्यासाठी त्यांना 80 लाख रुपये देण्यास 24 जुलै 2019 रोजी स्थायी समितीने मान्यता दिली होती. तथापी, तीन महिन्यानंतर स्थायी समितीला साक्षात्कार झाला आहे. जलसंपदा विभागाकडून थेट पद्धतीने काम करण्यापेक्षा निविदा काढून काम केल्यास कमी खर्चात होऊ शकेल, असे कारण देत जलसंपदा विभागाला दिलेल्या कामाचा प्रस्ताव रद्द केला आहे. त्याबाबतच्या सदस्य प्रस्तावाला बुधवारी (दि.6) झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. यामुळे पाईप गोळा करण्याच्या कामाला विलंब होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top