Saturday, 28 Mar, 3.46 pm MPC News

टॉप न्यूज
Pune : 'कोरोना'ग्रस्तांच्या उपचारासाठी गिरीश बापट यांच्याकडून 50 लाख रुपयांचा 'खासदार निधी'

एमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी यासाठी खासदार गिरीश बापट यांनी आपल्या 'खासदार निधी'तून त्यांनी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे त्यांनी आज याबाबतचे पत्र सुपूर्त केले.

खासदारपदाचे एक महिन्याचे वेतनही त्यांनी पक्षाला या उपचारासाठी दिले आहे. यावेळी भाजप युवा प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बापट म्हणाले, ''कोरोना या महाभयंकर आजारामुळे जग थांबले आहे. जगभरात दररोज हजारोजण या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे तसेच राज्य सरकारच्या खबरदारीतून हा आजार आटोक्यात राहण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या जीवघेण्या आजारातून सावरण्यासाठी मोदीजींनी आवाहन केल्याने अनेक मदतीचे पुढे येत आहेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहे.

दररोज प्रशासनाकडून माहिती घेत आहे.सध्या जरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी ही आपत्कालीन स्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क तसेच इतर आवश्यक साधने, रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. यासाठी मी माझ्या 'खासदार निधी'तून 50 लाखाचा निधी देत आहे. संकटातून सावरण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करण्याची आवश्यकता आहे.''

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते, तसेच अनेक स्वयंसेवी संस्था विविध सामाजिक उपक्रमातून मदतीसाठी पुढे येत आहेत. 'लॉकडाऊन' मुळे अडकून पडलेल्या विद्यार्थांना तसेच गरजूंना जेवण देऊन, रक्तदान करून, नागरिकांना औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. याप्रमाणे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अर्थसहाय्य करून माणुसकीचा हात पुढे करावा, असे आवाहन ही बापट यांनी यावेळी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top