Tuesday, 17 Sep, 4.00 am MPC News

पिंपरी चिंचवड
Pune : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना.जेवढा आनंद, तेवढीच जोखीम!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन शहरांना जोडण्यासाठी नवीन मार्गाची निर्मिती करण्यात आली. 'यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग' हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग म्हणून ओळखला जाणारा द्रुतगती मार्ग बनला. हा मार्ग 2002 साली पूर्णतः वापरण्यासाठी खुला करण्यात आला आहे. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या या 94.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावरून प्रवास करताना जेवढा आनंद मिळतो, तेवढीच जोखीम देखील आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरून (राष्ट्रीय महामार्ग 48) देहूरोड जवळून सुरु होतो. हा मार्ग नवी मुंबईमधील कळंबोलीजवळ (सायन) शीव, पनवेल महामार्ग आणि 'राष्ट्रीय महामार्ग चार'ला जुळतो. द्रुतगती मार्गावर बाहेर पाडण्यासाठी सोमाटणे, तळेगाव, लोणावळा एक, लोणावळा दोन, खालापूर, चौक, शेडुंग हे सात फाटे आहेत. या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी झाले असून आता तीव्र वळणे आणि खोल उतारांचा सामना करावा लागत नाही. सहापदरी मार्गावर दुचाकी, तीन चाकी, ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि पादचा-यांना प्रवेश नाही.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरु झाल्यापासून या मार्गावर अपघातांचा आलेख वाढतच आहे. वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्याने हे अपघात होतात. मार्ग सुरु झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षात दीड हजार पेक्षा अधिक अपघातांची नोंद झाली आहे. त्यामुळे या द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

द्रुतगती मार्गावर एखादी आगीची घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणा ठिकठिकाणी तैनात असायला हवी. रुग्णवाहिका आणि बंद पडलेल्या वाहनांना ओढून नेण्यासाठी टोईंग व्हॅनची व्यवस्था असायला हवी. तसेच या सुविधा मिळविण्यासाठी ठिकठिकाणी संपर्क क्रमांक लावणे आवश्यक आहे.

द्रुतगती मार्गावर तुरळक ठिकाणी संपर्क क्रमांक आढळतात. त्यामुळे एखादे वाहन ब्रेक डाऊन झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळत नाही. रस्त्याची निगा राखण्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने ब्रेक डाऊन झालेल्या वाहनांना जवळच्या एक्झिटपर्यंत मोफत टोईंग करून देण्याचा नियम आहे. मात्र, वेळेवर कंत्राटदाराचे टोईंग व्हॅन येत नाही, असा या मार्गावरील प्रवाशांचा अनुभव आहे.

वेळेवर कंत्राटदाराचे टोईंग व्हॅन न आल्याने खाजगी टोईंग व्हॅन येतात. गरज असल्याने खाजगी टोईंगवाले सांगेल ती रक्कम देऊन वाहने टो केली जातात. यामुळे या मार्गावर खाजगी टोईंग व्हॅन चालकांचा व्यवसाय जोर धरत आहे. आजवर आयआरबी या कंपनीकडून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे नियमन केले जात होते. मात्र, या कंपनीचे कंत्राट संपल्याने ही जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. महामंडळाकडून नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे.

द्रुतगती मार्गावरून जाणारे प्रत्येक वाहन टोल भरतो. त्यामुळे या सर्व वाहनांना योग्य ती सुविधा द्यायलाच हवी. सध्या प्रशासनाकडून या मार्गावरील मदतीसाठी 9822498224 हा क्रमांक सुरु केला आहे. मात्र, एकाच वेळी अनेक घटना घडण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांना अडचण निर्माण होते.

द्रुतगती मार्गावरील सेवा ही लाईफ सेविंग सर्व्हिस आहे. त्यामुळे ती तात्काळ मिळणे आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक जणांना संपर्क करता येण्याची सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. द्रुतगती मार्गावरील त्रुटी दूर केल्यास हा मार्ग आणखी सुखकर होणार आहे.

नियम सांगतात -:
# पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर जनावरे न येण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी.
# मार्गावर ठिकठिकाणी साइनबोर्ड लावलेले असावेत.
# मार्गावरील गार्डनची निगा राखली गेली पाहिजे.
# अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, टो व्हॅन आदींची सुविधा असायला हवी.
# रस्त्यांची निगा राखली गेली पाहिजे.
# इतर सुविधा आणि मदतीसाठी संपर्क क्रमांक असावा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>