Friday, 03 Jul, 3.46 pm MPC News

टॉप न्यूज
Pune : पुण्यात सध्या लॉकडाऊन वाढविता येणार नाही : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्णवाढ होत आहे. 31 जुलैपर्यंत कोरोनाचे 40 हजार रुग्ण होणार आहेत. त्या प्रमाणात बेडस, आयसीयू, व्हेंटिलेटर, अशा आरोग्य सोयीसुविधा उभारण्याचा पुणे महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सध्या तरी आणखी लॉकडाऊन वाढविण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक होत असते. मुंबई सारखी परिस्थिती पुण्यात नाही. त्यामुळे लॉकडाऊन बाबत त्या त्या वेळची परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासनातर्फे खाजगी हॉस्पिटलच्या ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी शहरातील प्रत्येक मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील काही बेड महापालिकेने करार करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते.

मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत खाजगी हॉस्पिटलमधील बेडही आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार महापालिकेने शहरातील मोठ्या हॉस्पिटलला आदेश देऊन सर्वसाधारण बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन बेड कोविड-१९ रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे खाजगी हॉस्पिटलकडून विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या डॅशबोर्डवर दररोज उपलब्ध खाटांची माहिती दर्शविली जाते, असेही आयुक्तांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top