Wednesday, 05 Aug, 8.46 am MPC News

टॉप न्यूज
Pune: संरक्षण विभागाच्या ना-हरकत पत्राअभावी अनेक प्रकल्प रखडले- दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका हद्दीमध्ये हवाईदलाचे लोहगाव व एनडीए हे दोन विमानतळ असल्याने शहराचा बहुतांश भाग रेड झोनमध्ये येत आहे. संरक्षण विभागाने किती दिवसांमध्ये ना-हरकत पत्र द्यावे याबाबतचा कालावधी निश्चित नाही. सद्यस्थितीत महानगरपालिकेचे काही महत्वाचे प्रकल्प संरक्षण विभागाच्या ना-हरकत पत्राअभावी सुरू होऊ शकलेले नाहीत, त्यासंदर्भात आपण तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी मंगळवारी (दि.4) आयुक्तांकडे केली आहे.

कोडेड मॅप मधील झोनमध्ये चुका आहेत. त्या दुरुस्तीसाठी संरक्षण विभागाकडे महापालिकेने कळविलेले आहे. संरक्षण विभागाचे उंचीबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र दाखल करण्याबाबत सवलत देउन बांधकाम प्रस्ताव मंजूर करण्याबाबतची कार्यवाही सुरू केल्यास शहरातील संरक्षण विभागाचे एनओसी अभावी चालू न झालेले प्रकल्प सुरू होऊ शकतील.

केंद्र सरकारने सप्टेंबर 2015 मध्ये अधिसूचना काढून विमानतळाभोवतीच्या बांधकामावरती उंचीबाबत निर्बंध आणलेले आहेत. संरक्षण विभागाने एप्रिल 2018 मध्ये केंद्र शासनाच्या आधिसुचनेनुसार पुणे शहरातील लोहगाव व एनडीए येथील हवाईदलाचे विमानतळाभोवतालच्या परिसराचा रेड झोन, ब्ल्यू झोन, पिंक झोन, यलो झोन व ग्रीन झोन दर्शविणारा नकाशा महापालिकेस सादर केलेला आहे.

या नकाशानुसार रेड झोनमध्ये कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी संरक्षण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच ब्ल्यू झोन, यलो व ग्रीन झोन यामध्ये बांधकामाची अनुज्ञेय उंची नमूद करुन त्यावरील उंचीसाठी संरक्षण विभागाचे ना- हरकत पत्र घेणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, असेही दीपाली धुमाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top