Sunday, 25 Aug, 8.59 am MPC News

पुणे
Pune : वाघोली आणि हडपसर येथील गोडाऊनला आग; गोडाऊन जळून खाक, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

एमपीसी न्यूज़ - वाघोली, वाघेश्वर मंदिराजवळ एका चारचाकी वाहनांच्या गोडाऊनला आग लागली. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून गोडाऊन जळून खाक झाले आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी सुजित पाटील यांनी दिली आहे. हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी सुजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ असलेल्या मारुती सुझुकी शोरूमच्या साई सर्व्हिस सेंटर या चारचाकी वाहनांच्या गोडाऊनला रविवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला रात्री 1.21 वाजता मिळाली त्यानुसार अग्निशमन दल घटनास्थळी दोनच्या सुमारास पोहचले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या, सहा चालक, एक सब ऑफिसर आणि 12 फायरमन घटनास्थळी दाखल झाले. काही तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून गोडाऊन जळून खाक झाले आहे.

तर, दुसऱ्या घटनेत, हडपसर, हंडेवाडी-होळकरवाडी रस्ता येथे प्लॅस्टिकच्या गोडाऊनला आग लागली होती. यावेळी वाघोली येथील आग विझविल्यानंतर अग्निशमन दल हडपसर, हंडेवाडी-होळकरवाडी येथे दाखल झाले. पहाटे 4.29 वाजता हडपसर, हंडेवाडी-होळकरवाडी येथे आग लागल्याची अग्निशमन दलाला मिळाली होती.

यावेळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, तीन चालक, एक सब ऑफिसर आणि दहा फायरमन घटनास्थळी दाखल झाले. काही तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. यावेळी पुणे अग्ऩिशमन दलाच्या २, पीएमआरडीए २,एमआयडीसी १ आणि खासगी ४ टँकर आग विझविण्याकरिता घटनास्थळी दाखल होते. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून गोडाऊन जळून खाक झाले आहे.हि कामगिरी पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याचेही अग्निशमन दलाचे अधिकारी सुजित पाटील यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top