Saturday, 12 Oct, 9.41 am MPC News

अन्य बातम्या
Talegaon : 'पाडापाडी'चे 'अवगुण' बाजूला ठेवून मावळात सत्तांतर घडवूयात - मदन बाफना

एमपीसी न्यूज - मावळात भाजप त्यांच्या गुणांमुळे नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'अवगुणां'मुळे गेली २५ वर्षे सत्तेवर आहे. यावेळीही भाजप त्याच आशेवर आहे. मात्र, यावेळी 'पाडापाडी'च्या राजकारणाचा 'अवगुण' बाजूला ठेवून मावळात सत्तांतर घडवूयात, असे आवाहन माजी मंत्री मदन बाफना यांनी केले.

मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे जाहीर सभा झाली. त्यात पाडापाडीच्या राजकारणावरून बाफना तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर व माऊली दाभाडे यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली. त्यानंतर सर्वांनी एकदिलाने काम करून सुनील शेळके यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मावळात भाजपची सत्ता येण्यास व्यासपीठावरील मंडळी कारणीभूत आहेत, असे परखड मत मांडत चंद्रकांत सातकर यांनी विषयाला हात घातला. पाडापाडीच्या राजकारणाला आता मावळची जनता कंटाळली आहे. मावळच्या जनतेला परिवर्तन हवे आहे. २५ वर्षे आमचे हाल झाले. आता सुनीलआण्णा पुढची २५ वर्षे तुम्ही त्यांचे हाल करा, असे ते म्हणाले.

माऊली दाभाडे यांनी पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप फेटाळून लावला. 'मी कधी पाडापाडीचे राजकारण केले नाही. उमेदवार पटला नाही तर पक्षाचा राजीनामा देऊन रुपलेखा ढोरे यांचे काम केले', असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सुनील शेळके हा मावळच्या राजकारणातील उगवता तारा आहे. तालुक्याची विकासाची भूक भागविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. काँग्रेसची सत्ता असताना तालुक्यात विकास कामे झाली. गेल्या २५ वर्षात मावळात विकासाचे एकही मूलभूत काम झाले नाही. हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी सुनील शेळके यांच्या पाठीशी सर्व ताकद एकवटली पाहिजे, असे ते म्हणाले.

मदन बाफना म्हणाले की, पक्षाच्या चिन्हावर आपण चार निवडणुका लढवल्या पण एवढी सभा यापूर्वी कधीही झालेली नाही. उमेदवारी अर्ज भरायलाही अभूतपूर्व गर्दी होती. हे सर्व परिवर्तनाचे संकेत आहेत. आता मावळची जनता भाजपच्या भूलथापांना भूलणार नाही.

बापूसाहेब भेगडे यांनीही सर्वांना सुनील शेळके यांना मनापासून साथ करण्याचे आवाहन केले. भूतकाळातील चुकांपासून धडा घेऊन यापुढे चुका टाळाव्यात, असे त्यांनी सांगितले. 'भेगडे एक होतील' या अफवेला बळी पडू नका, हे मी एक भेगडे म्हणून येथे जाहीरपणे सांगत आहे, असेही ते म्हणाले. सुनील शेळके निवडून आल्याशिवाय मुलाला भेटायला अमेरिकेला जाणार नाही, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>