Friday, 18 Oct, 10.51 am MPC News

तळेगाव
Talegaon - तळेगावच्या 'होम पिच' वर सुनील शेळके यांची जोरदार 'बॅटींग'

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तळेगाव दाभाडे या 'होम पिच' वर मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज जोरदार 'बॅटींग' केली. तळेगावातील हजारो मतदारांनी शेळके यांच्या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत त्यांना विधानसभा निवडणुकीची 'मॅच' जिंकण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

मावळ विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावांचा प्रचार दौरा केल्यानंतर शेवटचे दोन दिवस त्यांनी तळेगावकर मतदारांसाठी राखीव ठेवले आहेत. शेळके यांनी कडोलकर कॉलनी, पंचवटी कॉलनी, राव कॉलनी, तुकाराम नगर, काळोखेवाडी, श्रीनगरी, लक्ष्मीबाग कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, जिजामाता चौक, सुभाष चौक, शाळा चौक, चावडी चौक, डोळसनाथ मंदिर, कुंभार वाडा चौक, भेगडे आळी चौक, गणपती चौक, राजेंद्र चौक, तेली आळी चौक, मारुती मंदिर चौक या भागातून पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला.

पदयात्रेच्या मार्गावर घड्याळाच्या चिन्हाच्या, 'आमचं ठरलंय…'असं सांगणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ढोल-ताशांच्या दणदणाटात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. बँडच्या संगीतावर महिला देखील ठेका धरून नाचत होत्या. दारोदारी औक्षण करून शेळके यांचे स्वागत करण्यात येत होते.

पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष छबुराव भेगडे, नगरसेविका मंगलाताई भेगडे, नगरसेविका वैशालीेताई दाभाडे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष तळेगाव दाभाडे सुनीताताई काळोखे, माजी नगराध्यक्षा मायाताई भेगडे, नगरसेविका हेमलता खळदे तसेच तुषार भेगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तळेगावमध्ये सुनील शेळके यांनी घरोघरी जाऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद तसेच मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तळेगावमधून शेळके यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास मतदारांनी शेळके यांना दिला. तालुक्यातील परिवर्तनाची सुरूवात नेहमीच तळेगावमधून झाली आहे, असे शेळके म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top