Saturday, 24 Aug, 8.00 am MPC News

पिंपरी चिंचवड
Wakad : वाकड ते मुकाई चौक रस्ता विकसित होणार

एमपीसी न्यूज - वाकड ते मुकाई चौक दरम्यानचा सेवा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात आला असून या रस्त्यासाठी 98 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता विकसित करण्यासाठी शिवसेनेचे महापालिका गटनेते राहुल कलाटे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणतर्फे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्ग हा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विकास आराखड्यानुसार 60 मीटर रूंदीचा विकसित करण्यात आला आहे. हा रस्ता वाकड ते मुकाई चौकादरम्यान महापालिका हद्दीतून जाणारा आणि बेंगलोर व मुंबईला जोडणारा मुख्य महामार्ग आहे. पुढे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा शहरातील मुख्य रस्ता आहे. या रस्त्यालगत हिंजवडी आयटी पार्क तसेच वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत या गावांचा नव्याने विकसित होणारा भाग आहे. या गावांसाठी हा प्रमुख रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. परिणामी, वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होते.

या रस्त्यावरील वाकड ते मुकाई चौक या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूचा पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखड्यात समाविष्ट असलेला 12 मीटर रूंदीचा सेवा रस्ता विकसित करण्याचे नियोजित आहे. हा रस्ता अविकसित असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा रस्ता विकसित करण्याची मागणी करत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन हा सेवा रस्ता लवकरच विकसित करण्यात येणार आहे. वाकड ते मुकाई चौक येथील सेवा रस्त्याचे उर्वरीत काम करण्यासाठी महापालिका सभेने 22 जून 2019 रोजी 98 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली आहे.

रस्ता रूंदीकरणाची कामे करण्यासाठी परिसराचे नियोजन करून आराखडे तयार करणे, निविदा पूर्व आणि निविदा पश्चात इतर कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी अशा प्रकारच्या कामांचा अनुभव असणारे आणि महापालिका सल्लागार पॅनेलवर असणारे इन्फ्राकिंग कन्सल्टींग इंजिनिअर्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना प्रकल्प किमतीच्या दोन टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

वाकड फाटा ते दत्त मंदिर चौकापर्यंतचा रस्त्याचा देखील लवकरच कायापालट होणार आहे. हा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. त्यानुसार, या कामासाठी 'मॅप्स ग्लोबल विळीलटेक प्रायव्हेट लिमिटेड' यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना महापालिका पॅनेलवर समावेश करणे आणि अशा प्रकारच्या कामासाठी महापालिकेच्या प्रचलित दरानुसार शुल्क अदा करण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top