Monday, 13 Jul, 5.55 pm मुलुख मैदान

होम
महाराष्ट्र सरकारला नख लावणं इतकं सोपं नाही, हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे - संजय राऊत

मुंबई। राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या सरकारवर संकटाचे ढग जमले आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

'महाराष्ट्र सरकारला नख लावणं इतकं सोपं नाही. हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे', असे वक्तव्य राऊत यांनी यावेळी केले आहे. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

"राजस्थानमध्ये सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन कमळ हा सत्तेचा गैरवापर आहे. देशाच्या समस्येवर कुणी बोलत नाही. अशावेळी राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी काडी टाकायची, हे चांगल्या राजकारणाचे लक्षण नाही.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व लालसेतून हे राजकारण होत आहे. मध्य प्रदेश गेल्यानंतर काँग्रेसने आता राजस्थान वाचवायला हवं. अन्यथा वेगळा संदेश जाईल", असे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच "महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारचा कोणताही धोका नसल्याचे राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारला नख लावणं इतकं सोपं नाही. हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे", असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या लांबवण्यात येत असल्याचे राऊत यांनी म्हटले होते.

मात्र, संजय राऊत यांचा हा दावा भाजप नेत्यांनी फेटाळून लावला होता. कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत अशाप्रकारची वक्तव्ये करत असल्याचे भाजपने त्यावेळी म्हटले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mulukh Maidan Marathi
Top