Friday, 03 Jul, 5.14 am Mumbai Live

सिविक
भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गांवर १५१ धावणार खासगी ट्रेन

केंद्र सरकारनं खासगी कंपन्यांना भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी ट्रेन चालविण्याची परवानगी दिली आहे. खासगी युनिटला आपल्या नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालविण्याची योजना रेल्वेनं बुधवारी औपचारिकरित्या सुरू केली. त्यानुसार भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गांवर १५१ खासगी ट्रेन धावणार असून, प्रत्येक ट्रेनला किमान १६ डबे असणार आहेत.

या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं १०९ मार्गांवर १५१ आधुनिक ट्रेनद्वारे प्रवासी गाड्या चालविण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागिवला आहे. खासगी क्षेत्रातून सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे रेल्वे प्रशासनानं म्हटले आहे. या धावणाऱ्या सर्व गाड्यांचा वेग प्रतिताशी १६० किमी असणार आहे. यापैकी बहुतांश आधुनिक ट्रेन्स मेक इन इंडियाअंतर्गत भारतात तयार केल्या जातील, असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्स्प्रेस रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीनं धावली. त्यानंतर देशभरात खासगी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीनं वेग धरला. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, कमी खर्चात देखभाल करणं, भारतीय रेल्वेमध्ये कमी कालावधीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणं आणि नोकरीच्या संधीमध्ये वाढ करणं, उत्तम सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव घेणं हे या खासगीकरणामागील उद्दिष्ट आहेत.

खासगी कंपन्यांना हा प्रकल्प ३५ वर्षांसाठी देणार असल्याचं समजतं. यासाठी एका खासगी कंपनीला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित शुल्क, वापरावरील ऊर्जा शुल्क आणि निश्चित महसूल यापैकी एक हिस्सा भारतीय रेल्वेला द्यावा लागेल. या सर्व ट्रेन्समध्ये चालक आणि गार्ड हे भारतीय रेल्वेचे असणार असल्याची माहिती समोर येत आहे.


सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi
Top