Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धारावी पुनर्विकासाविरोधात रहिवाशांचे आंदोलन

धारावी पुनर्विकासाविरोधात रहिवाशांचे आंदोलन

Mumbai Live 2 weeks ago

धारावी (Dharavi) पुनर्विकास प्रकल्पाविरोधात वातावरण अधिक तापले आहे. हजारो रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. 500 चौरस फूट घरांच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करत नागरिकांनी अदानी ग्रुप (Adani Group) विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

धारावीतील 90 फूट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. पोलिसांनी सर्वपक्षीय मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन थांबले नाही. उलट, अधिकाधिक नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात रोष व्यक्त केला.

आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे सर्व पात्र रहिवाशांना किमान 500 चौरस फूटांचे घर देण्यात यावे. सध्याच्या योजनेत मिळणाऱ्या घरांच्या आकारावरून नाराजी व्यक्त करत 'अदानी हटाओ, धारावी बचाओ' अशा घोषणा देण्यात आल्या. नागरिकांचा आरोप आहे की, प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव आहे आणि पुनर्वसनाच्या अटींबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही.

या आंदोलनाला वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांसारख्या राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दिला. त्यांनी सरकार आणि प्रशासनाने नागरिकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली.

रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पात्रतेचे निकष, घरांचे वाटप, तसेच भविष्यातील पुनर्वसन प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी प्रकल्पामुळे आपले अस्तित्व आणि उपजीविका धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रशासन आणि विकासकांकडून प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू असताना, वाढता विरोध हा मोठा अडथळा ठरत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मानला जात असून, या आंदोलनामुळे त्याचे भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi