Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इंधन दरवाढीमुळे 250 हून विमाने रद्द

इंधन दरवाढीमुळे 250 हून विमाने रद्द

Mumbai Live 1 week ago

इंधन खर्चात झालेली मोठी वाढ आणि प्रवासाच्या मागणीत आलेली घट यामुळे इंडिगो (indigo), एअर इंडिया (air india) आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्यांनी देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जूनपासून दररोज सुमारे 250 फ्लाइट्स कमी (cancelled) होणार आहेत. तसेच त्याचा परिणाम मुंबई (mumbai), दिल्ली, बंगळुरूंसह अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवाशांवर होणार आहे.

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये ही कपात कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाची मागणी वाढलेली असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.

मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या प्रमुख विमान वाहतूक केंद्रांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक मार्गांवरील फ्लाइट्सची वारंवारता कमी केली जाणार आहे.

मुंबईहून जयपूर, गोवा, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, नागपूर, पाटणा आणि भोपाळ या शहरांकडे जाणाऱ्या उड्डाणांमध्ये कपात केली जाणार आहे.

तसेच दिल्लीहून गोवा, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, लखनऊ, कोची आणि कोलकाता या मार्गांवरील फ्लाइट्समध्येही घट करण्यात येणार आहे.

एअर इंडिया जून आणि जुलै महिन्यांत आपल्या देशांतर्गत उड्डाण वेळापत्रकात तब्बल 22 टक्के कपात करणार आहे.

सध्या कंपनी दररोज सुमारे 500 देशांतर्गत उड्डाणे चालवत असून या कपातीमुळे जवळपास 110 उड्डाणे कमी होणार आहेत.

ही कपात तात्पुरती असून वाढत्या इंधन खर्चामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

बाजारातील मागणी आणि विमानसेवा चालवण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.

इंडिगोकडून सध्या दररोज 2,200 फ्लाइट्स चालवल्या जातात. इंडिगो कंपनी आपल्या देशांतर्गत क्षमतेत 5 ते 7 टक्के कपात करत आहे. त्यामुळे जवळपास 110फ्लाइट्स कमी होणार आहेत.

याशिवाय, एअर इंडिया एक्स्प्रेसनेही आपल्या देशांतर्गत सेवांमध्ये 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी दररोज 340 देशांतर्गत फ्लाइट्स चालवते.

एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ हे या कपातीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार देशांतर्गत जेट इंधनाच्या किंमती जवळपास 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय इंधन दरातही मोठी वाढ झाली आहे. इंधन हा विमान कंपन्यांच्या खर्चातील सर्वात मोठा घटक असल्याने विमानसेवा चालवण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे.

याशिवाय, वाढत्या खर्चामुळे काही प्रवासी अनावश्यक प्रवास टाळत असल्याने मागणीतही काहीशी घट झाली आहे. त्यामुळे खर्च आणि मागणी यामध्ये संतुलन राखण्यासाठी विमान कंपन्यांनी उड्डाण कपातीचा मार्ग स्वीकारला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi