Saturday, 25 Sep, 5.34 am Mumbai Live

सिविक
खड्डे बुजवण्यासाठी एकनाथ शिंदे रस्त्यावर, दिलं 'हे' आश्वासन

गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांमुळे संपूर्ण ठाणे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व रस्त्यांची पाहणी करून पुढील आठ दिवसात खड्डे बुजवले जातील असं आश्वासन दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात मुलुंडच्या आनंद नगर टोल नाका येथून झाली. त्यानंतर पुढे तीन हात नाका इथं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली. हे काम करत असलेल्या कंत्राटदाराला त्यांनी चांगलं काम करण्याची समज दिली.

पुढे हा दौरा पुढे आनंद नगर नाका, घोडबंदर रोड वर पोहोचला. या ठिकाणी देखील रस्त्याची दुर्दशा पाहून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

तिथून पुढे घोडबंदर रोडवरील गायमुख जवळ ज्याठिकाणी खड्ड्यामुळे एका तरुणाचा जीव गेला त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी केली. तिथे जे डांबरीकरण सुरू होते ते निकृष्ट दर्जाचे असल्यानं ठेकेदाराला शिंदेंनी झापलं.

घोडबंदर रोडवरून पुन्हा यु टर्न घेऊन दौरा मुंबई नाशिक हायवे वरून थेट पडघा इथं पोहचला. तिथं देखील रस्त्यावर मोठमोठे खड्डे दिसून येत होते. याठिकाणी टोल घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने हात जोडून सर्वांची माफी मागितली आणि पुढील पंधरा दिवसात हा रस्ता व्यवस्थित करून देण्याचे आश्वासन त्यानं दिलं.

या रस्ते पाहणी दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुढील 8 दिवसात सर्व रस्ते दुरुस्त होतील असं आश्वासन दिलं आहे. तर सर्व सरकारी संस्थांच्या समन्वयाची जबाबदारी एका नोडल ऑफिसारला देऊन हे काम पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले.

तसंच मुंबई नाशिक हायवेच्या समस्येबद्दल थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी स्वतः चर्चा करणार असल्याचं शिंदे म्हणाले. पून्हा ८ दिवसांनी याच रस्त्यांची पाहणी करून कामे झाली नसल्यास त्या अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करणार असं त्यांनी जाहीर केलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Live Marathi
Top